esakal | रत्नागिरीत 764 खांब कोलमडलेले, तरी घरे प्रकाशमान
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरीत 764 खांब कोलमडलेले, तरी घरे प्रकाशमान

रत्नागिरीत 764 खांब कोलमडलेले, तरी घरे प्रकाशमान

sakal_logo
By
राजेश शेळके

रत्नागिरी : महावितरण कंपनीच्या कामाला खरोखर दाद दिली पाहिजे. तौक्ते वादळात (tauktae cyclone) कंपनीला मोठा फटका बसला. दोन आठवडे महावितरण कंपनी युद्धपातळीवर काम करून अंधारात गेलेल्या गावांना प्रकाशात आणण्यात व्यस्त आहे. जिल्ह्यात (ratnagiri district) बहुतेक खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत झाला आहे. महावितरणच्या (MSDCL) या कामाचे वैशिष्ट्य म्हणजे अजूनही 764 विद्युत खांब कोलमडले आहेत. पर्यायी व्यवस्था करीत महावितरण कंपनीने अंधारलेली गावे प्रकाशमय केली आहेत.

विद्युत पुरवठा सुरळीत ठेऊन येत्या काही दिवसांमध्ये कोलमडलेले खांब उभे करणार आहे. या काळात दुरुस्तीचे साहित्य बाहेरील जिल्ह्यातून तातडीने आणून वीज पुरवठा सुरळीत करून दिलासा दिला. सोमवारपर्यंत (24) सायंकाळपर्यंत 6 पर्यंत बाधित झालेल्या 1 हजार 239 गावापैकी 1 हजार 236 गावातील वीज पुरवठा सुरू करण्यात आला आहे. आता अत्यंत दुर्गम, डोंगराळ भागातील केवळ 3 गावे शिल्लक आहेत. एकूण 55 उपकेंद्रांपैकी सर्वच्या सर्व सुरू आहेत. 7 हजार 548 रोहित्रापैकी 7 हजार 536 सुरू झाले असून केवळ 12 रोहित्र दुरुस्त होणे बाकी आहेत. जिल्ह्यातील एकूण 5 लाख 54 हजार 921 वीज जोडणीपैकी 5 लाख 52 हजार 611 जोडणी सुरू झाल्या आहेत. केवळ 2 हजार 310 जोडणीधारक अजून अंधारात आहेत.

हेही वाचा: अबब! दीडशे किलोचा ‘वाघळी’ मासा सापडला जाळ्यात

जिल्ह्यात उच्च दाब वाहिन्या असलेले 519 विद्युत खांब बाधित झाले होते. त्यापैकी 392 उभे करण्यात आले आहेत. 127 खांब अजून कोलमडलेले आहेत. लघुदाब वाहिन्यांचे 1 हजार 410 विद्युत खांब बाधित झाले. त्यापैकी 773 खांब उभे करण्यात आले. अजूनही 637 विद्युत खांब कोलमडलेले आहेत. म्हणजे जिल्ह्यात अजूनही 764 विद्युत खांब कोलमडलेले आहेत. ते उभारण्यासाठी काही दिवस जाण्याची शक्यता असल्याचे महावितरण कंपनीने सांगितले.

"जिल्ह्यात अजूनही वादळाच्या तडाख्यातील 764 खांब कोलमडलेले आहेत. तिथे आम्ही सर्व्हिस वायर देऊन पुढे वीज दिली आहे. एखादे रोहित्र बंद पडले असेल तर दुसर्‍या रोहित्रावरून वीज दिली आहे, अशा पद्धतीने ग्राहकांची गैरसोय दूर करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे."

- देवेंद्र सायनेकर, मुख्य अभियंता, महावितरण कंपनी

हेही वाचा: पैशापेक्षा माणसं, फॅमिली जपूया! 24 तासांत आम्ही आई-वडिल गमावलेत