तुम्हाला वाहतुक करायची आहे मग हा पर्याय वापरा...

मयुरेश पाटणकर
गुरुवार, 26 मार्च 2020

जीवनावश्यक वस्तुच्या वहातुकीसाठी पास उपलब्ध..तहसीलदार : तालुक्यातील व्यापाऱ्यांनी इमेल द्वारे अर्ज करावेत

गुहागर (रत्नागिरी) : तालुक्यातील जीवनावश्यक वस्तु विकाणाऱ्या सर्व छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना माल वहातुकीचे पास तहसीलदार कार्यालयाद्वारे उपलब्ध करण्यात आले आहेत. अशी माहिती तहसीलदार सौ. लता धोत्रे यांनी दिली. 

संपूर्ण देश लॉकडाऊन झाल्यानंतर पोलीसांनी रस्त्यावरील तपासणी अधिक कडक केली. त्यामुळे गुहागर चिपळूण मार्गावरील मालवहातूकही बंद झाली. ग्रामीण भागातील छोटे व्यापारी जीवनावश्यक वस्तुंचा साठा करुन ठेऊ शकत नाहीत. ते जास्तीत जास्त आठवडाभर पुरेल एवढाच माल खरेदी करतात. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला जीवनावश्यक वस्तु मिळणे मुश्कील झाले आहे. गुहागर पोलीसांकरवी माल वहातुक करणाऱ्या गाड्यांना पास दिला जात आहे. मात्र आडगावातील व्यापारी किंवा माल वहातुक दारांना गुहागरपर्यंत पोचण्यातही समस्या येत आहेत. अशी माहीती तहसीलदारांना  देण्यात आली.

हेही वाचा- रत्नागिरीत 8 मार्च नंतर पुणे मुंबईतून आलेल्यांना घरातच राहण्याचा सक्तीचा आदेश..

अधिक माहितीसाठी यावर संपर्क
त्यावेळी तहसीलदार सौ. लता धोत्रे म्हणाल्या की, माल वहातुक परवाना काढण्यासाठी तहसीलदार कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. ज्या व्यापाऱ्यांना बाहेरून माल आणायचा आहे अशा व्यापाऱ्यांनी थेट गुहागर तहसीलदार कार्यालयाच्या इमेलवर मेल (tah_guhagar@rediffmail.com)  करावा. या मेलमध्ये जीवनावश्यक वस्तू कोठे खरेदी करणार,  कोणत्या गावापर्यंत नेणार, कोणत्या गाडीने नेणार (वाहनाचा प्रकार व क्रमांक) नमुद करावा. तसेच इमेल करणाऱ्या व्यापाऱ्याने त्यांचा व्हॉटस्अप क्रमांकही द्यावा. सदर व्यक्तीला वहातुकीचा पास इमेल द्वारे पाठविला जाईल.

जे व्यापारी गुहागर तालुक्यांतर्गत खरेदी करतात त्यांनी त्यांच्या व्यापाऱ्याकडे मालाची यादी फोनवरुन कळवावी. माल तयार झाल्यावर संबंधित व्यापाऱ्यांनी तशी सूचना द्यावी. त्यानंतर सर्व माल नेण्यासाठी त्या व्यापाऱ्यापर्यंत जावे म्हणजे सदर व्यापाऱ्याकडे गर्दी होणार नाही. थांबून रहावे लागणार नाही. गर्दी झाल्यास नाईलाजाने सदर व्यापाऱ्याचे दुकान आम्हाला बंद करावे लागेल. तेवढी काळजी सर्वांनी घ्यावी. 

हेही वाचा- एप्रिलनंतर सुरू होणाऱ्या परीक्षांचे काय ? वाचा ​
गावपातळीवर कृतिदल तयार

प्रशासन जनतेची गैरसोय होणार नाही याची काळजी घेत आहे. तालुक्यातील एखाद्या गावात काही अडचण असेल तर सरपंच, उपसरपंच, तलाठी, ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकारी यांचे गावपातळीवर कृतिदल तयार करण्यात आले आहे. त्यांच्यामार्फत होणारी गैरसोय प्रशासनापर्यंत पोचवावी. त्यावर योग्य कार्यवाही केली जाईल. जनतेने स्वत:ची, कुटुंबाची, गावाची काळजी घेण्यासाठी स्वयंशिस्तीने कोरोना संदर्भातील सर्व सूचनांचे पालन करावे. 
 सौ. लता धोत्रे, तहसीलदार, गुहागर
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Passes available for essential commodity traffic kokan marathi news