esakal | 'सेनेला संपवण्याची भाषा कराल तर शिवसैनिक बारा वाजवतील'
sakal

बोलून बातमी शोधा

'सेनेला संपवण्याची भाषा कराल तर शिवसैनिक बारा वाजवतील'

'सेनेला संपवण्याची भाषा कराल तर शिवसैनिक बारा वाजवतील'

sakal_logo
By
तुषार सावंत

कणकवली : शिवसेनेला (shivsena) कोकणातून हद्दपार करण्याची भाषा कोणी करू नये. कोकणचा (kokan) पंतप्रधान जरी दिला तरी कोकणातून शिवसेना कधीच संपणार नाही असा ठाम विश्वास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत (uday samant) यांनी आज येथे दिला. तसेच शिवसेना ही संघटना काय चीज आहे हे अनेकांना कळून चुकले आहे. त्यामुळे कुणी सेनेला संपविण्याची भाषा करत असेल तर शिवसैनिक त्याचे बारा वाजवल्याशिवाय गप्प बसणार नाहीत असा इशाराही त्‍यांनी दिला.

राज्‍यात १२ ते २४ जुलै दरम्यान राज्यभर शिवसंपर्क अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ कणकवलीतील मातोश्री मंगल कार्यालयात आज झाला. यावेळी श्री.सामंत बोलत होते. या कार्यक्रमावेळी जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर, युवा सेना जिल्हाप्रमुख गितेश कडू, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, डॉ. प्रथमेश सावंत, समन्वयक राजू राठोड, अ‍ॅड. हर्षद गावडे, संदेश सावंत-पटेल, जि. प. सदस्य संजय आग्रे, नगरसेवक सुशांत नाईक, शहरप्रमुख शेखर राणे, सचिन सावंत, आदी सेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

हेही वाचा: Kokan - राजापूरातील रिफायनरीला शिवसैनिकांचे वाढते समर्थन

सामंत म्हणाले, 'राज्यात महाविकास आघाडीचे सरकार (mahavikas aaghadi) असले तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यात शिवसेनेचे बळ वाढवण्यासाठी १२ ते २४ जुलै दरम्यान राज्यभर शिवसंपर्क अभियान राबवण्यास सांगितले. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात हे अभियान राबविले जात आहेत. या अभियनाअंतर्गत घर तिथे शिवसैनिक, गाव तिथे शाखा सुरू केली जाणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मागील दीड वर्षांत सरकारने केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा शिवसैनिकांनी जनतेपर्यंत मांडला पाहिले. त्याचप्रमाणे कोरोना काळात सरकारने आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी जे काम केले, त्याची माहिती जनतेला सांगितली पाहिजे.'

वैभव नाईक म्हणाले, 'कोकण आणि शिवसेनेचे जिव्हाळ्याचे नाते. त्यामुळे कोणीही सेना संपविण्याची भाषा करू नये. ज्यांनी सेनेला संपविण्याचा विडा उचलला त्याची अवस्था काय झाली, हे जनतेला ज्ञात आहे. शिवसैनिकांनी जिल्ह्यात पक्षाचे बळ वाढण्यासाठी स्वतःहून पुढाकार घ्यावा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी ९६६ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याचा जिल्हा प्रशासन व पालकमंत्र्यांचा प्रयत्न आहे.'

हेही वाचा: "राज्यात कोरोना रुग्णवाढीचा दर कमी, पण निर्बंधांत सूट नाही"

फुकटच्या कामांचे श्रेय घेऊ नये

सिंधुदुर्गात सेट व नीट परीक्षा केंद्र सुरू करण्यासाठी मी आणि खासदार विनायक राऊत यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार हे केंद्र सुरू झाले आहे; पण भाजपचे काही नेते फुकटच्या कामांचे श्रेय घेत असल्‍याची टीका पालकमंत्री उदय सामंत यांनी केली.

loading image