गणरायाच्या आगमनाची चाहूल; मूर्ती शाळांमध्ये लगबग, वाचा...

जॉन्सन फर्नांडिस
Tuesday, 18 August 2020

जिल्ह्यामध्ये गणेश चतुर्थीचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो. वर्षातून एकमेव असणारा हा आनंदोत्सव जिल्ह्यातील सर्वांसाठी एक पर्वणीच असते.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - गणेश चतुर्थी सणाला अवघे पाच दिवस शिल्लक राहिल्याने जिल्ह्यातील सर्वच मूर्ती शाळांमध्ये मूर्तीकारांची लगबग वाढली आहे. मूर्तीकाम पूर्ण झाल्यानंतर आता मूर्तीचे रंगकाम अंतिम टप्प्यात आले आहे. आता मूर्तिकार गणेश मूर्तीवर शेवटचा हात फिरविण्यात दंग झाला आहे. 

वाचा - मिर्‍या बंधार्‍याचे दुखणे होणार नाहीसे ; ‘नरीमन’च्या धर्तीवर प्रकल्प अहवाल तयार

जिल्ह्यामध्ये गणेश चतुर्थीचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो. वर्षातून एकमेव असणारा हा आनंदोत्सव जिल्ह्यातील सर्वांसाठी एक पर्वणीच असते. या उत्सवाला अवघे पाच दिवस शिल्लक असल्याने आता अनेक मूर्ती शाळांमध्ये मूर्ती रंग कारागिरांची लगबग वाढली आहे. दिवस-रात्र मेहनत करून बाप्पांच्या मूर्तीचे मूर्तीकाम पूर्ण झाल्यानंतर आता मूर्तींना रंगकामाचे वेध लागले आहेत.

गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला अंतिम टप्प्यातील हे काम पूर्णत्वास कसे येईल? यासाठी सर्वच मूर्तिकारांची धावपळ सुरू आहे. बाप्पांच्या आगमनाचे वेध लागल्याने गणेश भक्तांना कोरोनाचा विसर पडू लागला आहे. बाप्पांची मूर्ती रंगवण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याने गावा गावातील नागरिक, लहान मुले आबालवृद्ध मूर्ती शाळांमध्ये रंगविलेल्या बाप्पांच्या मूर्ती पाहण्यासाठी गर्दी करत आहेत; मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक मूर्तीकारांकडून गर्दी न होण्याविषयी खबरदारी घेतली जात आहे.

हेही वाचा - सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागात कोरोनाचा शिरकाव

बरेच काम शिल्लक असलेल्या मूर्ती शाळांमध्ये मूर्तिकार दिवसाचे रात्रीही जागवून मूर्ती रंगकाम पूर्ण करण्यासाठी प्रयत्नरत आहेत. जिल्ह्यातील अनेक गावातील मूर्ती शाळेत मूर्तिकार रंगकामास वेग देत आहे. दोन-चार दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने अधून-मधून विजेचा लपंडाव सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर रंगकाम जलदगतीने व्हावे, यासाठी मूर्तिकारांकडून शासनाने महावितरणच्या कर्मचाऱ्यांना योग्य दक्षतेची मागणी केली आहे. 

गेले काही दिवस मूर्ती रंगवण्यासाठी लगबग वाढली आहे. हे रंगकाम करण्यासाठी कारागीर मागविण्यात येतात. त्यांना थोडाफार रोजगार मिळतो; मात्र यावर्षी लॉकडाउनमुळे अडकलेल्या युवकांचे सहकार्य लाभले. विजेचा लपंडाव सुरू असल्याने या कामात व्यत्यय येतो. याचा विचार करून महावितरणने कर्मचारी सज्ज ठेवावेत. ज्यामुळे मूर्तीचे रंगकाम सुलभ होईल. 
- प्रवीण रेडकर, मूर्ती रंग कारागीर 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Preparations for Ganeshotsav in konkan Sindhudurg