'कोरोना कॉलेजला जाऊ देईना अन् बीएसएनएल घरात शिकू देईना'

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 November 2020

हातात मोबाईल घेऊन विद्यार्थी रानोमाळ नेटच्या शोधात फिरत आहेत.

मंडणगड (रत्नागिरी) : पुन्हा एकदा ये रे माझ्या मागल्या, म्हणत देव्हारे येथील बीएसएनएलच्या सेवेचा बोजवारा उडाला असून सर्वसामान्य त्रस्त ग्रामस्थ, महिला आणि व्यावसायिक मंडळीमध्ये आता नव्याने विद्यार्थीवर्गाची भर पडली आहे. विद्यार्थी नेटच्या शोधात फिरत रानोमाळ भटकत आहेत.

लॉकडाउनमुळे कमीअधिक पण बऱ्याच शाळांमधून ऑनलाइन अध्यापन केले जातेय, गृहपाठ दिला जातोय. आतापर्यंत एखादी टाकलेली पोस्ट नेटवर्क प्रॉब्लेममुळे थोड्याफार फरकाने पुढेमागे गेली तरी चालत होते पण आता दिवाळी सुट्ट्यांनंतर महाविद्यालयांतून ऑनलाइन अध्यापन सुरू झाले आहे. पाठोपाठ येथील विद्यार्थीवर्गाची परवडही. हातात मोबाईल घेऊन विद्यार्थी रानोमाळ नेटच्या शोधात फिरत आहेत.

हेही वाचा - सावधान! पन्हळे धरणाच्या भेगांचा आकार वाढतोय -

तालुक्‍यातील कॉलेजचे ऑनलाइन अध्यापन आता नियमित सुरू झाले असले तरी काही तालुक्‍याबाहेरील कॉलेजचे ऑनलाइन अध्यापनसत्र सुरू आहे. त्यांच्या चाचणी परीक्षासुद्धा पार पडल्यात. कोरोना जाऊ देईना... बीएसएनएल शिकू देईना...
घरात रेंज, नेट नाही आणि असले तरी पुरेसा स्पीड नसल्यामुळे असून नसून सारखेच. त्यामुळे कोरोना कॉलेजला जाऊ देईना आणि बीएसएनएल घरात शिकू देईना, अशी येथील विद्यार्थांची अवस्था झाली आहे. नव्याने कॉलेजला प्रवेश घेतलेल्या ११ वीच्या विद्यार्थ्यांना हा जेवणात पहिल्याच घासाला खडा लागावा, असा अनुभव आहे.

"डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात त्यांची प्रथम सत्र परीक्षा होऊ घातली आहे. कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या भीतीने आणि मुंबई-ठाण्यातल्या शैक्षणिक संस्थांबाबत शासकीय घोषणेमुळे काही कुटुंबे पुन्हा गावाकडे स्थलांतरित होण्याच्या मार्गावर आहेत. असे सर्वच विद्यार्थी यात भरडले जाणार आहेत. त्यामुळे समस्त पालकांत चिंतेचे वातावरण आहे. तरी त्वरित सेवा सुरळीत करावी."

- पुंडलिक शिंदे

हेही वाचा -  बिबट्याची झलक कॅमेऱ्यात कैद

"१० डिसेंबरपासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा चालू होणार आहेत. त्यामुळे फोन व वायफाय नेटवर्क व्यवस्थित रहाण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवाण्याच्यादृष्टीने २ डिसेंबरला मंगळवारी बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटणार आहोत."

- जमीर माखजनकर, सामाजिक कार्यकर्ता

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: problem faced by college students due to range problem in ratnagiri