esakal | अधिकारी, कर्मचार्‍यांच्या बदली प्रक्रिया सुरु मात्र शिक्षकांच्या बदल्यांबाबत अनिश्‍चितता ..सविस्तर वाचा...
sakal

बोलून बातमी शोधा

Process for transfer of Zilla Parishad officers and employees started

जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण सभापती संयुक्त चर्चा करुनच निर्णय घेणार आहेत.

अधिकारी, कर्मचार्‍यांच्या बदली प्रक्रिया सुरु मात्र शिक्षकांच्या बदल्यांबाबत अनिश्‍चितता ..सविस्तर वाचा...

sakal_logo
By
राजेश कळंबटे

रत्नागिरी : जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचार्‍यांच्या बदल्यांसाठी समुपदेशन प्रक्रिया सुरु झाली आहे; मात्र शिक्षकांच्या बदल्यांबाबत अनिश्‍चितता आहे. सुमारे 900 शिक्षकांच्या बदल्या होणार असून त्यांचे समुपदेशन एकाचवेळी घेणे कोरोनाच्या परिस्थितीमुळे अशक्य आहे. त्यामुळे 30 तारखेला घेण्यात येणारे समुपदेशनही पुढे ढकलण्यात आले असून जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण सभापती संयुक्त चर्चा करुनच निर्णय घेणार आहेत.


कोरोनामुळे मे महिन्यातील रखडलेल्या बदल्यांची प्रक्रिया जुलै महिन्यात पूर्ण करावी असे आदेश महिन्याभरापुर्वी आले होते. त्याची अंमलबजावणी सुरु झाली असून जिल्हा परिषदेत प्रशासन, पदाधिकारी यांच्या समन्वयातून समुपदेशन प्रक्रिया सुरु आहे. विविध खात्यांमधील रिक्त पदे लक्षात घेऊन बदल्यांचा निर्णय घेतला जात आहे. यामध्ये नव्याने आलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष रोहन बने योग्य पध्दतीने निर्णय घेताना दिसत आहेत. विविध खात्यातील बदल्यांसाठी येणार्‍या कर्मचार्‍यांची संख्या अल्प असल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगसह सॅनिटायझिंगचा वापर करुन पुढील कार्यवाही करणे शक्य झाले. एकावेळी जास्तीत जास्त 25 कर्मचार्‍यांना बदल्यांसाठी आतमध्ये घेतले जात होते.

हेही वाचा- कारागृह अधीक्षक योगेश पाटील यांना अटक होण्याची शक्यता.... -

मात्र प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या एकाचवेळी करणे अशक्य आहे.जिल्ह्यात सुमारे सहा हजार शिक्षक आहेत. त्यातील 15 टक्केनुसार 900 शिक्षकांच्या बदल्या करणे क्रमप्राप्त आहे. त्याचे नियोजन करताना शिक्षण विभागाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. 30 जुलैला समुपदेशन घेण्यात येणार होते. पण कोरोनामुळे एकाचवेळी सर्व शिक्षकांना सभागृहात सोशल डिस्टन्सिंग ठेवून बसवणे अशक्य आहे. तेवढी क्षमता असलेले दालन रत्नागिरीत उपलब्ध नाही. अर्ध्या-अर्ध्या शिक्षकांना बोलावून ही प्रक्रिया राबवणे अशक्य आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीमधून मार्ग काढण्यासाठी प्रशासनाला क्लुप्ती लढवावी लागणार आहे.

हेही वाचा-रत्नागिरीमध्ये  2 पोलिस, एका नर्ससह 21 जण  कोरोना बाधित.... -

सध्या समुपदेशनाची तारीख निश्‍चित केलेली नाही. काही शिक्षक बदल्या होऊ नयेत यासाठी प्रयत्नात आहे. कोरोनामुळे ही प्रक्रिया थांबली तर त्यांच्या ते पथ्थ्यावर पडणार आहे. समुपदेशन रद्द करायचे की घ्यायचे याचा निर्णय सीईओ डॉ. इंदुराणी जाखड आणि अध्यक्ष बने यांच्यातील चर्चेनंतरच होणार आहे. कोरोना योध्दे म्हणून काम करणार्‍या आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांची गैरसोय होऊ नये म्हणून त्या बदल्या रद्द केल्या आहेत. त्याच धर्तीवर शिक्षकांच्या बदल्याही रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अजुन निर्णय झालेला नसल्यामुळे सध्या तरीही बदल्यांची प्रक्रिया अनिश्‍चिततेच्या गर्तेत आहे.

loading image