कोरोना मुक्त गाव करायचा आहे मग करा हे उपाय....

सचिन माळी
रविवार, 29 मार्च 2020

कोरोनाला हरविण्यासाठी गावं प्रथम सुरक्षित करा...मिलिंद गोठल; शासनाच्या बदलत्या निर्णयावर नाराजी; आरोग्य यंत्रणेने कठोर निर्णय घ्यावेत...

मंडणगड (रत्नागिरी) : कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वत्र जाणवू लागला असून रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर जागरूक व सुज्ञान नागरिकांनी आधी कोरोना मुक्त असणारी गावे, तालुके, जिल्हे आधी पूर्णपणे लॉकडाऊन करीत सुरक्षित करण्याची मागणी करू लागले आहेत. तसेच शासन या कालावधीत सोशल डिस्टन्स बिघडेल अशा बदलत असलेल्या निर्णयामुळे नाराजीही व्यक्त केली जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील ग्रामीण भागाचा परिसर सद्य स्थितीत सर्वांत सुरक्षित आहे. येथील वातावरण या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनुकूल आहे. सर्वत्र जागरूकता निर्माण झाली असून याबाबत तालुक्यातील सावरी येथील चार्टर्ड अकौंटन मिलिंद गोठल यांनी सकाळशी बोलताना, कोरोनाला हरविणे शक्य आहे मात्र त्यासाठी उलट मार्गाने (Reverse Way) जावं लागेल. त्यासाठी त्यांनी ' कोरोनाची साखळी मागे ओढणे ' या सदराखाली एक ड्रफ्ट तयार केला आहे. पहिल्यांदा, जे चांगलं आहे ते वाचवण्यापासून सुरवात करायला हवी असे सांगत अजुनही शेकडो गावे (ग्रामीण भाग) यापासून अबाधित आहेत. सुरवात तिथून व्हायला हवी अशी अपेक्षा व्यक्त केली.

हेही वाचा- दळवटणेतील त्या आजीसाठी पोलिस बनले देवदूत -

ड्रफ्ट तयार करणे गरजेचे

लॉक काळातही होणारी अत्यावश्यक सेवा वगळता जी वाहतूक आहे तिला चाप लावायला हवा. तालुक्यातील प्रवेश बंद करून महाराष्ट्रातील एकूण रुग्ण, परदेशातून आलेल्या व्यक्ती यांची संख्या, सध्याची स्थिती, त्यांच्या घरातील इतर व्यक्तींची स्थिती यांची माहिती घेवून जे बाधित आहेत त्या सगळ्या रुग्णांना जिल्ह्यातील किंवा त्यांच्या सोयीच्या मोठ्या शहरातील दवाखान्यात हलवावे. बाधित घरातील सगळ्या व्यक्तींना सक्तीने तालुक्यात एका ठिकाणी अलग अलग ठेवावे. दरदिवशी तपासणी करावी. गावात, तालुक्यात परदेशातून आलेल्या आणि १४ दिवस झालेल्या सगळ्यांची पूर्ण तपासणी करावी.

हेही वाचा- कोकण रेल्वे आली आंबा उत्पादकांच्या मदतीसाठी ;  या नंबरवर संपर्क करा

एक एक तालुका मुक्त करता येईल

परदेशातून आलेल्या व्यक्तीं ज्यांना १५ दिवस झाले नाहीत त्यांना १५ दिवस वेगळं सुरक्षित ठेवावे. गावात फक्त स्थानिक, महाराष्ट्रातीलच इतर भागातून आलेले आणि १५ दिवसांवरील परदेशातून आलेल्या व्यक्ती एवढीच लोक राहतील. म्हणजे, गावातील धोका कमी झाला. तरीही, ७ दिवस लॉकडाउन पाळावा जेणेकरून इतर शक्यता टाळता येतील. पुन्हा सगळ्यांची एमबीबीएस, एम डी, डॉक्टर्सकडून तपासणी करून घ्यावी. शक्यता अशी आहे की, १० गावातील ९ गावे संपूर्ण सुरक्षित ठरवता येतील. या गावांचे आतील सर्व व्यवहार नियमित चालू करता येऊ शकतात. असेच सगळ्या गावांसाठी त्याचा फायदा होवू शकतो. अशा रीतीने एक एक तालुका मुक्त करता येईल. काही महिने सगळ राज्य लॉकडाउन ठेवण्याची गरज नाही. त्यामुळे उपासमार, कायद्याचे उल्लंघन, आणि माणुसकीचा बळी जाणे टाळता येऊ शकते असे गोठल यांनी सांगितले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Protect the village first to defeat Corona kokan marathi news