कोकणात ऊसाचा गोडवा वाढला, राजापुरात उस शेतीत वाढ

गुर्‍हाळांमुळे शेतकर्‍यांना विक्रीसाठी उस कारखान्यामध्ये पाठविण्याऐवजी स्थानिक पातळीवरील गुर्‍हाळांसाठी विक्री करणे अधिक सोयीचे
Rajapur last few years increase in sugarcane cultivation farmer factory
Rajapur last few years increase in sugarcane cultivation farmer factorysakal

राजापूर : घाटमाथ्यावरील काळ्या मातीमध्ये रूजवात होणार्‍या ऊसाचा गोडवा कोकणातील लाल मातीमध्ये बहरत चालला आहे. केवळ बहरत नसून ऊस लागवडीच्या क्षेत्रामध्ये वर्षागणिक होत असलेली लक्षणीय वाढ पाहता तो अधिकच वृद्धींगत होताना दिसत आहे. भातशेतीकडे काहीसे दुर्लक्ष करणार्‍या शेतकर्‍यांचा ऊस लागवडीकडे वाढता कल पाहता त्यातून कोकणच्या कृषीक्षेत्राला भविष्यामध्ये नव्या ओळखीचा वेगळा आयाम मिळण्याचे संकेत त्यातून मिळत आहेत. घाटमाथ्याच्या तुलनेमध्ये कोकणातील ऊस लागवडीखालील क्षेत्र कमी असले तरी, त्याची वर्षागणिक वाटचाल ‘एक पाऊल पुढे’ दिसत आहे. त्याला पिक विम्याचे कोंदण मिळाल्यास ऊसाचा गोडवा अधिकच अविट होण्यास मदत होईल हे मात्र, निश्‍चित.

लहरी पावसावर अवलंबून असलेल्या भातशेतीतून फारसे उत्पन्न मिळत नसल्याने कोकणातील शेतकर्‍यांकडून शेतीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र दिसते. याला केवळ पावसाचा लहरीपणा कारणीभूत नसून खर्चाच्या तुलनेमध्ये न मिळणारे उत्पन्न, जंगली श्‍वापदांकडून होणारी नासधूस, शेती कामे करणार्‍या मजुरांची कमतरता, आधुनिकता अन् व्यवसायिक दृष्टीकोनाचा अभाव आदी विविध कारणांचाही समावेश आहे. अशा स्थितीमध्ये शेतकर्‍यांकडून हमखास उत्पन्न देणार्‍या ऊसाच्या पिकाची निवड करून येथील नव्या पर्यायाचा शोध घेतल्याचे आश्‍वासक चित्र दिसत आहे. त्यातून, दरवर्षी ऊसाच्या पिकाखाली येणार्‍या क्षेत्रफळाची वाढ होत असल्याचे चित्र असून राजापूर तालुक्यामध्ये सुमारे ऐशी शेतकर्‍यांनी ऊसाची लागवड केली आहे.

ऊसाची लागवड असलेली राजापूरची गावे

मूर, पाचल, रायपाटण, गोठणे-दोनिवडे, केळवली, मोसम, मोरोशी, कोळंब, काजिर्डा, जवळेथर, पाजवेवाडी, मांजरेवाडी, सौंदळ, तळवडे, हरळ

ऊस लागवडीखालील सर्वाधिक क्षेत्र असलेली प्रमुख पाच गावे ः पाचल (5.53 हेक्टर), रायपाटण (5.30 हेक्टर), कोळंब (5.20 हेक्टर), तळवडे (5 हेक्टर), मोरोशी (4 हेक्टर)

लागवडीपासून तोडणीपर्यंत ऊसाला नियमित पाणी देणे गरजेचे असते. जेणेकरून ऊसाच्या कांड्याचे वजनही वाढते अन् ते ओलेही राहते. साधारणतः तालुक्यामध्ये मार्च-एप्रिलमध्ये लागवड केली जाते. त्यामुळे सुरूवातीचे दोन महिने आठवड्यातून एकदा असे नियमित शेताला पाणी दिल्यानंतर पुढील पावसाळ्याचे चार महिने नैसर्गिकरीत्या रोपांना पाणी मिळत असल्याने कृत्रिमरीत्या पाणी द्यावे लागत नाही. यामध्ये पाणी देण्यावर होणारा शेतकर्‍याचा खर्च आपोआप वाचतो. असे असले तरी, जमीनीमध्ये नैसर्गिक ओलावा असल्याच्या समजातून पावसाळ्यानंतरचे पुढील सुमारे दोन महिने शेतकर्‍याकडून पाणी देण्याकडे दुर्लक्ष केले जाते. साहजिकच त्याचा फटका बसून तोडणीच्यावेळी ऊसाच्या कांड्याचे अपेक्षित असलेले वजन भरताना दिसत नाही. साहजिकच, एकरी 40-45 टन अपेक्षित असलेल्या उत्पादनामध्ये घट होवून तो 30-32 टनावर येतो. त्याचा शेतकर्‍याला आर्थिक फटका बसत असल्याने शेताला पाणी देण्याबाबत शेतकर्‍यांच्या प्रबोधन आणि मार्गदर्शनासाठी कृषी विभागाकडून पुढाकार घेणे गरजेचे आहे

राजापूरात गुर्‍हाळ गेल्या काही वर्षामध्ये तालुक्यात उस शेतीमध्ये वाढ झाली आहे. या ठिकाणी पिकणारा ऊस बहुतांश शेतकरी पश्‍चिम महाराष्ट्रातील कारखान्यामध्ये विक्रीसाठी पाठवितात. मात्र, वाढता पिकणारा ऊस लक्षात घेवून तालुक्यामध्ये आता गुर्‍हाळे सुरू झाली आहेत. त्यामध्ये तळवडे येथील पितांबरी प्रॉडक्टस प्रा. लि.ने सुरू केलेले गुर्‍हाळ आणि मूर येथील अन्य एका गुर्‍हाळांचा समावेश आहे. या गुर्‍हाळांमुळे शेतकर्‍यांना विक्रीसाठी उस कारखान्यामध्ये पाठविण्याऐवजी स्थानिक पातळीवरील गुर्‍हाळांसाठी विक्री करणे अधिक सोयीचे ठरणार आहे. त्यातून, ऊस विक्रीसाठी स्थानिक पातळीवर पर्याय निर्माण झाला आहे. त्याचवेळी या गुर्‍हाळाच्या माध्यमातून अनेकांना स्थानिक पातळीवर नियमित रोजगारही उपलब्ध झाला आहे.

ऊस उत्पादक शेतकर्‍यांना भेडसावणार्‍या समस्या

  • मजूरांची कमतरता
  • अनेक शेतांमध्ये वीज उपलब्ध नाही
  • शेतीपंप चालविण्यासाठी महागड्या डिझेलचा आधार...त्यातून, खर्चामध्ये नाहक वाढ
  • जंगली श्‍वापदे, डुक्करे यांच्याकडून नासधूस
  • वेळेवर ऊस तोडणीसाठी मजूरांवर करावा लागतो जादा खर्च
  • वणवा लागून आर्थिक नुकसान
  • कोकणातील उस लागवडीचा पिक विम्यामध्ये समावेश नसल्याने त्या फायद्यापासून वंचित

पिक विमा संरक्षण कोंदणाची अपेक्षा

कोकणामध्ये मोठ्याप्रमाणात आंबा, काजू आदींसह भातशेतीची लागवड होत असल्याने केंद्र शासनाच्या पिक विमा योजनेमध्ये या पिकांचा समावेश आहे. मात्र, गेल्या काही वर्षामध्ये ऊस लागवड झपाट्याने वाढत आहे. मात्र, या ऊस लागवडीला पिक विम्याचे संरक्षण मिळत नाही. कोकणामध्ये वणवा लागण्याच्या सर्रास घटना घडत असून त्याचा फटका या ऊस लागवडीलाही बसतो. वणव्याची ऊसाला झळ पोहचल्यास नियमित 3 हजार रूपये टन असा मिळणारा दर 2200 रूपयांवर घसरतो. ऊस जळल्यानंतर त्याची वेळेमध्ये तोड होणे गरजेचे असते. मात्र, काहीवेळा उस तोडणी मजूर उपलब्ध होत नसल्याने उस तोड होत नाही. त्यामध्ये शेतकर्‍याला मोठ्याप्रमाणात आर्थिक झळा पोहचत असल्याने कोकणातील शेतकर्‍यांकडून येथील ऊस लागवडीला पिकविम्याचे संरक्षण मिळणे अशी मागणी केली जात आहे.

दृष्टीक्षेपात राजापूर

वर्ष ऊस लागवडीचे क्षेत्र गावांची संख्या

2018-19 32.18 7

2019-20 35.65 12

2020-21 38.42 15

2021-22 41.23 15

असे आहे ऊसाचे वार्षिक अर्थगणित

अपेक्षित सरासरी प्रत्यक्षात सरासरी

एकरी ऊस उत्पादन 40-45 टन 30-32 टन

एकरी ऊस खर्च 40-45 हजार

एकरी ऊस उत्पन्न 1 लाख रूपये 80 हजार रूपये

महेश विचारे, शेतकरी
महेश विचारे, शेतकरीsakal

“कोकणामध्ये विशेषतः राजापूर तालुक्यामध्ये ऊसाचे पिक चांगले येत आहे. ऊसाचे पिक घेताना शेतकर्‍याला विविध अडचणींचा सामना करावा लागत असला तरी, उत्पन्न समाधानकारक मिळत आहे. गेल्या काही वर्षामध्ये ऊसाच्या लागवडीखालील क्षेत्रामध्ये वाढ होत असल्याचा शासनाने प्राधान्याने विचार करून पिक विमा संरक्षणामध्ये कोकणातील ऊस लागवडीचा समावेश करावा. ”

-विलास हर्याण, शेतकरी, केळवली

“ पहिल्या वर्षानंतर पुढील दोन वर्ष उस लागवडीसाठी फारसा खर्च करावा लागत नाही. त्यातच, उसाची शेती करण्यासाठी फारशी मेहनतही करावी लागत नाही. खर्चाच्या तुलनेमध्ये ऊस लागवडीतून चांगले आणि समाधानकारक उत्पन्न मिळत आहे.

- महेश विचारे, शेतकरी, गोठणेदोनिवडे

“ खर्चाच्या तुलनेमध्ये ऊसाची शेती फायदेशीर ठरत असून ऊसाचा उपयोग करीत पितांबरी प्रॉडक्टस प्रा. लि.ने तळवडे येथे सेंद्रीय गुळाचे उत्पादन करणारे गुर्‍हाळ सुरू केले आहे. सेंद्रीय गुळाला बाजारपेठेमध्ये चांगली मागणीही आहे. या ठिकाणी भविष्यामध्ये सेंद्रीय गुळाचे जादा उत्पादन करण्याचे नियोजनावर भर देण्यात आला आहे. या गुर्‍हाळाच्या माध्यमातून केमिकल विरहीत सेंद्रीय गुळाचे उत्पादन होताना राजापूर तालुक्यातील ऊसाला पश्‍चिम महाराष्ट्रातील कारखान्यांऐवजी विक्रीसाठी नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्याचवेळी स्थानिक पातळीवर अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

- प्रदीप प्रभूदेसाई, शेतकरी, तळवडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com