सिंधुदुर्गच्या पोलिस अधीक्षकपदी राजेंद्र दाभाडे यांची नियुक्ती

विनोद दळवी
Friday, 18 September 2020

पोलिस अधीक्षक दाभाडे हे  मुंबई येथील गुन्हे विभागात उपायुक्त या पदावर कार्यरत होते. 

ओरोस (सिंधुदुर्गनगरी) : सिंधुदुर्गचे पोलिस अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम यांची गुरुवारी रात्री उशिरा सांगली जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जाग्यावर सिंधुदुर्गचे नवीन पोलिस अधीक्षक म्हणून राजेंद्र दाभाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत राज्य शासनानेचे गुरूवारी रात्री उशिरा आदेश निघाले. गेडाम यांचा सिंधुदुर्गतील कालावधी संपल्यानंतर त्यांची बदली झाली आहे. नवीन पोलिस अधीक्षक दाभाडे हे  मुंबई येथील गुन्हे विभागात उपायुक्त या पदावर कार्यरत होते. 

हेही वाचा - सात महिने झालं, करताय तरी काय ? कोकणातील दहा लाख विद्यार्थी विचारत आहेत प्रश्न 

बदली झालेल्या अधीक्षक गेडाम यांचा सहा महिन्या पूर्वीच जिल्ह्यातील कार्यकाळ संपलेला होता. ते बदली होणार या अपेक्षेत असताना राज्यात कोरोना संकट आले. त्यामुळे त्यांची बदली रखडली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या तुलनेत सांगली जिल्हा मोठा आहे. त्यामुळे गेडाम यांना राज्य शासनाने एकप्रकारे चांगली संधी दिल्याचे बोलले जाते. गेडाम यांनी अमोघ गांवकर यांची बदली झाल्यानंतर २९ एप्रिल २०१७ रोजी पदभार स्वीकारला होता.  शांत, संयमी स्वभाव असलेल्या गेडाम यांच्या काळात लोकसभा, विधानसभा या महत्वाच्या निवडणुका शांततेत पार पडल्या होत्या. त्यांच्याच काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाचे सर्व रस्ते सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आले आहेत. तसेच जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या सिंधुदुर्गनगरीत आपले मालकीचे घर असावे, हे जिल्ह्यातील पोलिस कर्मचाऱ्यांचे असलेले स्वप्न गेडाम यांच्यामुळे पूर्ण झाले आहे. 

हेही वाचा - बोगद्याचे काम पूर्ण ; कोकण रेल्वेची वाहतूक झाली सुरु 

खाजगी जागा घेत या ठिकाणी पोलिस कर्मचारी खाजगी संकुल उभारण्यात आले आहे. जिल्ह्यातील पर्यटकांना तपासणीच्या नावाखाली होणारा त्रास कमी करण्यासाठी गेडाम यांनी सीमारेषा नाका वगळता सर्व तपासणी नाके बंद करण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. एकंदरित जिल्ह्यात राजकीय, सामाजिक सलोखा व शांतता राखण्यास त्यांना यश आले होते. 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rajendra Dabhade new Superintendent of Police of sindhudurg district