रत्नागिरी : दापोलीत ‘दिवाण कोट चर्च’ भग्नावस्थेतच!

इतिहास अभ्यासक महेश कदमांनी वेधले लक्ष
kokan
kokansakal

रत्नागिरी : लष्करी हालचाली सुरळीत व्हाव्यात, या उद्देशाने ईस्ट इंडिया कंपनीने १८१८ ते १८५० च्या दरम्यान कोकणातील एकमेव कॅम्पची निर्मिती दापोली येथे केली होती. त्याची साक्ष देणारी पाश्चात्य गाथिक वास्तूशैलीचा उत्कृष्ट नमुना असणारे ऐतिहासिक ''दिवाण कोट चर्च'' आजही दापोलीत उभे आहे. दुर्लक्ष झाल्यामुळे त्याची दूरवस्था झाली असून, ती वास्तू जतन केल्यास पर्यटनाला चालना मिळू शकते. इतिहास अभ्यासक महेश कदम यांनी ठिकाणांना भेटी देऊन त्याकडे लक्ष वेधले.

दापोली तालुक्यात दाभोळ बंदर, पन्हाळेकाझी लेणी, सुवर्णदुर्ग किल्ला अशी ठिकाणे वैभवशाली इतिहासाचे साक्षीदार आहेत. ईस्ट इंडिया कंपनी सरकारच्या काळात दापोली हे महत्त्वाचे लष्करी ठाणे होते. त्याला ’दापोली कम्प’ असेही म्हटले जायचे. कोकणातील एकमेव कॅम्पची निर्मिती कंपनी सरकारने १८१८ ते १८५० च्या दरम्यान लष्करी हालचाली जलद व्हावी, या उद्देशाने केली होती. दापोली कॅम्पमध्ये घोडदळाच्या लष्करी तुकड्या असून सैन्य व कुटुंब यांच्या सोयीसाठी कचेरी, शाळा, चर्च यासह लष्करी कॅम्पकरिता लागणाऱ्‍या सर्व वास्तूंची उभारणी केली होती.

त्यातील काही इमारती कालवश झाल्या तर काही सुमारे १८० वर्षांपासून ब्रिटिशकालीन इतिहासाची साक्ष देत आजही उभ्या आहेत. दिवाण कोट चर्च हे सध्या हे अत्यंत दुर्लक्षित असून त्याच्या भिंतीवर अनेक झाडे उगवली आहेत. या झाडांची मुळे भिंतीत सर्वत्र पसरल्यामुळे मूळ वास्तू कमकुवत होऊन नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. ऐतिहासिक ब्रिटिशकालीन चर्चचे योग्यरित्या संवर्धन करणे आवश्यक असल्याचे कदम यांनी सांगितले.

ती घंटा सध्या कुठे आहे,..?

पाश्चात्य गाथिक वास्तूशैलीचा उत्कृष्ट नमुना असणारे ऐतिहासिक ''दिवाण कोट चर्च’ आजही दापोली शहराच्या मध्यवर्ती भागात उभे आहे. बाहेरून पाहिले असता, छोट्या ब्रिटिश किल्ल्यासारखी याची रचना आहे. त्याला दिवाण कोट चर्च म्हणत असावेत. प्रार्थनेवेळी करण्यात येणाऱ्‍या येथील मोठ्या घंटेचा आवाज दापोली शहरात घुमत असल्याचे संदर्भ पुढे आले आहेत; मात्र ती घंटा सध्या कुठे आहे, याची माहिती मिळालेली नाही.

वास्तूशैलीची वैशिष्ट्ये

दिवाण कोट चर्चच्या वास्तूशैलीचे सारभूत वैशिष्ट्य म्हणजे आडव्या कमानींचा वापर करून चर्चचा घुमट उभारणे. सडसडीत स्तंभ व निरुंद तीर यांच्या साह्याने दगडी परांची उभारणी केली जात होती. दोन स्तंभांतील अंतर निमगोल कमानींनी सांधले असता, घुमट ठराविक उंचीपेक्षा जास्त वर चढवता येत नाही; तिथे अनेकदा साग्र कमानींची योजना अधिक उपयुक्त ठरत असे. दापोली चर्चची रचनाही याच धर्तीवर केलेली दृष्टीस पडते. आजही त्याच्या अवशेषावरून तत्कालीन भव्यतेची कल्पना येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com