रत्नागिरी : बनावट दागिन्यांद्वारे ५० लाखांवर डल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gold Jewelry

रत्नागिरी : बनावट दागिन्यांद्वारे ५० लाखांवर डल्ला

रत्नागिरी : बॅंकेच्या रजिस्टर व्हॅल्युअर असलेल्या सोनाराने बॅंक ऑफ इंडियाला चांगलेच गंडवले आहे. कारवांचीवाडी शाखेतील २२ लाखांच्या बनावट सोनेतारण कर्ज प्रकरणानंतर आता एमआयडीसी मिरजोळे शाखेतही १० जणांच्या मदतीने बनावट सोने ठेचन ५० लाखांची टोपी घातली आहे. सोनेतारण कर्ज प्रकरणे करून बॅंकेची फसवणूक केल्याचे ग्रामीण पोलिसांनी उघड केले. सुवर्णकारच या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिसांनी सांगितले. आणखी काही शाखांमध्ये असे बनावट सोने तारण ठेवून कर्ज प्रकरणे केली आहेत का, याची चौकशी सुरू झाली आहे. ज्यांच्या नावे ही कर्ज प्रकरणे आहेत, ते यात सामिल आहेत, की त्यांचीही फसवणूक झाली आहे, याचा तपास पोलिस करीत आहेत.

प्रदीप श्रीपाद सागवेकर (रा. कोकणनगर, रत्नागिरी) असे बॅंक ऑफ इंडिया बॅंकेचे रजिस्टर व्हॅल्युअर सोनार आहेत. बनावट सोने सुद्धा खरे सोने असल्याच्या त्याच्या प्रमाणपत्रावरून ही सर्व कर्ज प्रकरणे झाली आहेत. दोन शाखांतील आतापर्यंत ७२ लाखांची फसवणूक झाली आहे. यामध्ये सुवर्णकार प्रदीप सागवेकर यांच्यासह सलिम हुसेन निंबल (रा. कोकणनगर), आकाशानी जनार्दन कांबळे (रा. कारवांचीवाडी-रत्नागिरी), शुभम जनार्दन कांबळे (रा. कारवांचीवाडी-रत्नागिरी), तेजस्विनी जनार्दन कांबळे (रा. कारवांचीवाडी), जयवंत सखाराम मयेकर (रा. पोमेंडी-रत्नागिरी), नमिता दिगंबर इंदुलकर (रा. कोकणनगर), संतोष सदाशिव शिंदे (रा. स्वरूपानंदनगर, मजगावरोड-रत्नागिरी), गणेश बाबाजी आंब्रे (रा. कोकणनगर), जबन्ना सिद्धप्पा बिसल (रा. किर्तीनगर-रत्नागिरी), सलीम हुसेन (निंबल) अशी दहा संशयितांची नावे आहेत. त्यांच्या नावे ही सोनेतारण कर्ज प्रकरणे करण्यात आली आहेत. ३१ डिसेंबर २०१८ ते २१ मार्च २०२२ या कालावधीत बॅंक ऑफ इंडियाच्या एमआयडीसी-मिरजोळे शाखेत ही घडली आहेत. यातील सलीन हुसेन हा फरार आहे.

रश्मी दिनेश कुजूर (वय ५४, रा. सिद्धिविनायकनगर, शिवाजीनगर-रत्नागिरी) याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दिली. संशयित दहाजणांकडील सोन्याचे दागिने हे बनावट असल्याचे माहीत असतानाही त्यांनी खऱ्या सोन्याचे असल्याचे प्रमाणपत्र संशयितांना दिले. ते नकली दागिने संशयित दहाजणांनी बॅंक ऑफ इंडियाच्या एमआयडीसी शाखेत गहाण ठेवून एकमेकांच्या संगमताने ४९ लाख ७० हजार रुपयांचे कर्ज घेऊन बॅंकेची फसवणूक केल्याचे ग्रामीण पोलिसांनी सांगितले.

आणखी पाच जणांविरुद्ध गुन्हा

शुक्रवारी (ता. २२) बॅंक ऑफ इंडियाच्या कारवांचीवाडी शाखेत पाचजणांनी २२ लाख ८० हजारांची फसवणूक केली होती. त्या गुन्ह्यातील पाच संशयितांसह आणखी पाच संशयितांनी मिरजोळे शाखेत ४९ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. कारवांचीवाडी शाखेत फसवणूक करणाऱ्या चार संशयितांना न्यायालयाने २७ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या रॅकेटमधील आणखी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका व्यक्तीच्या नावे दोन ठिकाणी कर्ज प्रकरणे केल्याचे उघड झाले आहे.

कर्ज प्रकरण उघडकीस

बॅंक ऑफ इंडियाच्या कारवांचीवाडी आणि मिरजोळे एमयाडीसी शाखेत हे बनावट सोनेतारण कर्ज प्रकरण उघडकीस आले आहे. शहरासह अन्य शाखेतही अशा प्रकारे फसवणूक झाल्याचा पोलिसांचा संशय असून, त्या अनुषंगाने पोलिसांनी तपासाला दिशा दिली आहे. त्यामुळे बनावट सोन्यावर कर्ज प्रकरणे करून ७२ लाखांवर गेलेला हा फसवणुकीचा आकडा आणखी वाढणार आहे.

Web Title: Ratnagiri Extortion Fake Jewellery

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..