रत्नागिरी : दीपकळ्यांनी कातळ उजळला

साडवली ते विघ्रवली या पट्ट्यात बहर
kokan
kokan sakal

रत्नागिरी : कास पठारावरील फुलांचा अभ्यास आणि निरीक्षण करणाऱ्या विद्वानांसह येथील सौंदर्याच्या आकर्षणापोटी जाणाऱ्या साऱ्यांची पावले साडवलीपासून विघ्रवलीपर्यंत पसरलेल्या सड्यावर चार महिन्यांसाठी वळू शकतील. अत्यंत रंगीबेरंगी आणि संपन्न जैवविविधतेचा दाखला देणारी निसर्गसंपत्ती या सड्यावर पसरली आहे. सध्या विविध गवतांसह काही एकरावर पसरलेल्या दीपकाडीच्या पट्ट्यामुळे आणि जोडीला असलेल्या फुलांमुळे काही किलोमीटरच्या या कातळाला दीपकळ्यांनी उजळून टाकले आहे.

देवरूखनजीकच्या साडवली ते विघ्रवली या दोन ते तीन किलोमीटरच्या पट्ट्यात दीपकाडीला बहर आलेला आहे. त्यामुळे सध्या तेथे पांढऱ्या शुभ्र फुलांच्या जोडीने वेगवेगळ्या फुलांनी आरास मांडल्याचे चित्र पाहायला मिळते. येथील स्थानिक लोकांनी शेती करताना अथवा जनावरे चरवताना येथील जैवविविधतेला हात लावलेला नाही. ते स्थानिक शहाणपणच मानावे लागेल, असे जैवविविधतेचा अभ्यास करणारे प्रतीक मोरे यांनी सांगितले. फक्त सौंदर्यापुरती दीपकाडी मर्यादित नाही.

या पंधरा दिवसांच्या हंगामात हजारो फुले डोलत असतातच, त्याचबरोबर त्यावर लाखो मधमाश्या नांदत असतात. या काळात त्यांना इतर फार कमी फुले उपलब्ध असतात. त्यामुळे मधमाश्या या फुलांवर घोंघावतात आणि परागीभवनाला त्यांचा महत्त्वाचा उपयोग होतो. याचा फायदा आजूबाजूच्या फळझाडांना आमि वनस्पतींना होतो. या फुलाच्या जवळ गेल्याशिवाय त्याचा गंध जाणवत नाही, इतका तो मंद असतो. नागपंचमीला या फुलाचे गजरेही करतात. बगळ्यासारखे दिसत असल्यामुळे त्याला डोकाचे फुलेही म्हणतात, तर गुलछडी आणि एकदांडी ही त्याची वेगळी नावे आहेत.

दीपकाडीबाबत माहिती देताना मोरे यांनी सांगितले की, १८७० मध्ये दीपकाडीचा उल्लेख आढळतो. त्यानंतर दीर्घ काळ गेला. १९८५ च्या दरम्यान दीपकाडी पूर्णपणे नष्ट झाली, असे वाटू लागले होते. मात्र, १९८५ ते ९३ या काळात गोव्यातील डॉ. आलमेडा यांनी अभ्यास करून ती वनस्पती नष्ट झाली नसल्याचे दाखवून दिले.

रत्नागिरीनजीक शिवाजीनगर येथे त्यांना ही वनस्पती आढळली. संशोधनाअंती २२ ठिकाणी एककाडी आपला नजारा दाखवत असते. त्यात साडवली हे प्रमुख. या माळावर सध्या दीपकाडीला बहर आला असून कातळाच्या अंगाअंगावर निसर्गाची रंगीबेरंगी रूपे पाहायला मिळत आहेत. याकडे अजून पर्यटकांची पावले वळलेली नाहीत. सड्याची ही संपत्ती कोकणात ठिकठिकाणी विखुरली आहे.

कातळाला वेगळे सौंदर्य

रत्नागिरी जिल्ह्यात साडवली ते विघ्रवली या परिसरात दीपकाडी आपल्या शुभ्रफुलांनी कातळाला वेगळेच सौंदर्य देते. यासह राजापूरचा सडा प्रामुख्याने जैतापूर येथील अणुऊर्जा प्रकल्पाचा परिसर अर्थात जैतापूरचे पठार, देवाचेगोठणे, रत्नागिरीनजीकचा विमानतळ परिसर, चंपक मैदान यासह संगमेश्वरनीकच्या कोळंबे येथे दीपकाडी मोठ्या प्रमाणावर आढळते. इतर ठिकाणीही ती डोकावत असतेच.

दोन आठवड्यांत बिया गायब

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात दीपकाडीला बहर येतो. आणखी दोन आठवड्यात त्याच्या बिया गायब होतात. जमिनीखालील कंद शिल्लक राहतो. मग बिया रुजण्यासाठी पडतात. त्या पुढील वर्षी फुलताना दिसतात. प्रतिकूल परिस्थितीत ती वाढतात. हा नजारा १५ ते २० दिवसच असतो.

एक नजर...

फक्त सौंदर्यापुरती दीपकाडी मर्यादित नाही

पंधरा दिवसांच्या हंगामात हजारो फुले डोलतात

त्यावर लाखो मधमाश्या नांदत असतात

नागपंचमीला या फुलाचे गजरेही करतात

बगळ्यासारखे दिसते; डोकाचे फुलेही ओळख

गुलछडी आणि एकदांडी ही त्याची वेगळी नावे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com