नाणार रिफायनरी महाराक्षसाऐवजी देव कसा झाला - अशोक वालम

हॉटेल विवेकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
Ashok Walam
Ashok WalamSakal
Summary

हॉटेल विवेकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

रत्नागिरी - नाणार रिफायनरी हा प्रकल्प महाराक्षस आणि विषारी आहे. कोकणाची राख होऊ देणार नाही, असे छातीठोक सांगणाऱ्या उद्धव ठाकरे सरकारमध्ये गेल्या २ वर्षांत काय परिवर्तन झाले की त्यांना प्रकल्प विषारी नाही अमृत आणि महाराक्षस नाही तर देव वाटू लागला आहे. रिफायनरी हा विषय आमच्यासाठी संपला म्हणजे मुडदा पडला आहे. मग आता कोणते तंत्रमंत्र म्हणून मुडदा जीवंत केला, याचे उत्तर ठाकरे सरकारला द्यावे लागेल. आमचा विश्वासघात केलेल्या शिवसेनेला या वेळी आम्ही अद्दल घडवणार. सेनेच्या विरोधात प्रचार करू आणि वेळप्रसंगी उमेदवार देऊन जागा दाखवून देऊ; काही झाले तरी अखेरच्या श्वासापर्यंत नाणार प्रकल्पाला विरोध करू, अशा निर्वाणीचा इशारा प्रकल्पविरोधी समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांनी केंद्र, राज्य शासनासह प्रकल्प समर्थकांना दिला.

येथील हॉटेल विवेकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी प्रकल्प विरोधी समितीचे मुळे यांच्यासह अन्य ठिकाणचे पदाधिकारी उपस्थित होते. वालम म्हणाले, कोकणचा आणि कोकणी जनतेची राख करणारा प्रकल्प कोकणात राबवून धनदांडग्या गुजराती, मारवाडी आणि जमीनदलाल, राजकीय नेते त्यांचे पदाधिकारी यांच्या अंगणात रांगोळी काढायला देऊ नका. प्रदूषणकारी नाणार रिफायनरीला सुरवातीपासून आमचा विरोध होता. सेनेचे सुरवातीपासून समर्थन होते; मात्र स्थानिकांचा विरोध वाढल्यामुळे स्थानिक जनतेच्या पाठिशी उभे राहून युती म्हणून सत्तेत असताना शिवसेनेने हा प्रकल्प रद्द केला. त्याची घोषणा करण्यात आली. रद्द झालेला हा प्रकल्प पुन्हा बारसू आणि सोलगाव येथे व्हावा, यासाठी मुख्यमंत्र्यांनी केंद्राला का पत्र दिले? पर्यावरणाचा ऱ्हास होऊ देणार नाही.

निसर्गाचे संरक्षण करा, असे आवाहन शासन करते मग हा निसर्ग नष्ट करणारा प्रकल्प रत्नागिरीत का? प्रदुषणावरून सर्वांचा विरोध होता मग आता २ वर्षांमध्ये काय घडले की, समर्थन देत आहेत. समर्थनासाठी कोणते फंडिंग मिळाले ते जाहीर करावे; मात्र आमचा विश्वासघात केलेल्या शिवसेनेला या वेळी आम्ही अद्दल घडवणार. येणाऱ्या निवडणुकांमध्ये राजापूरसह मुंबई, ठाणे आदी भागात आम्ही शिवसेनेविरोधात प्रचार करणार आहोत. वेळप्रसंगी प्रकल्प विरोधी समितीचा उमेदवार देण्याची तयारी आम्ही ठेवली आहे. या वेळी शिवसेनेला नक्कीच जागा दाखवून देणार. गुजराती, मारवाड्यांनी प्रकल्प होणार म्हणून येथे केलेला जमीन घोटाळा बाहेर काढण्याऐवजी तेथील कष्टकरी शेतकरीच भूमाफिया असल्यासारखे त्यांच्या मुळावर केंद्र व राज्यशासन उठले आहे. ज्यांनी समर्थन दिले आहे ते जमीन खरेदी केलेले काश्मिर, औरंगाबाद, गुजरात आदी भागातील लोक आहेत. स्थानिक फार कमी आहेत. नाणार प्रकल्पाच्या समर्थनार्थ केंद्र व राज्यशासन आहे. त्यामुळे आम्ही शासनाच्या निर्णयाप्रमाणे भूमिका ठरवू; मात्र अखेरच्या श्वासापर्यंत नाणार प्रकल्पाला विरोध करू, असा वालम यांनी इशारा दिला.

दोन कॅबिनेट मंत्र्यांच्या जमिनी

माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांनी येथे मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी केली आहे. कोकणातील दुसऱ्या कॅबिनेट मंत्र्यानेही जमीन खरेदी केली आहे; मात्र त्याच्या विरोधात ठोस पुरावा हाती लागलेला नाही. त्यामुळे त्याचे नाव जाहीर करू शकत नाही; परंतु कोणीही असला तरी पुरावा मिळाल्यावर त्याचे नाव जाहीर करणार, असे वालम यांनी सांगितले.

राजन साळवींना विधानसभेला दाखवून देऊ

राजापूरचे शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांची पहिल्यापासूनच प्रकल्पाच्या बाजूने भूमिका होती; परंतु स्थानिकांनी विरोध केल्यामुळे मतांच्या बेरजेसाठी त्यांनी विरोधात भूमिका घेतली. आता साळवी प्रकल्पाला समर्थन करत आहेत. साळवींची ही दुटप्पी भूमिका असून, विधानसभा निवडणुकीला आम्ही दाखवून देऊ. गेल्या वेळी जी चूक केली ती या वेळी करणार नाही, असा इशाराही वालम यांनी दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com