esakal | Ratnagiri : गणपतीपुळेत ‘श्रीं’च्या मुखदर्शनाचा लाभ
sakal

बोलून बातमी शोधा

ganpatipule

Ratnagiri : गणपतीपुळेत ‘श्रीं’च्या मुखदर्शनाचा लाभ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : ‘एक गाव एक गणपती’ची पाचशे वर्षांपूर्वीची परंपरा कायम राखण्यासाठी कोरोनातील नियमांचे पालन करत गणपतीपुळे मंदिरात प्रत्येक गावातील २५ जणांना मुखदर्शन घेण्यास प्रशासनाने परवानगी दिली. त्यानुसार नेवरेतील १७ तर भगवतीनगरमधील १४ ग्रामस्थांनी मुखदर्शन घेतले; परंतु अटी-शर्तींमुळे गणपतीपुळे, मालगुंड, भंडारपुळेतील ग्रामस्थांना दर्शन घेता आले नाही.

गणपतीपुळे येथे ‘एक गाव एक गणपती’ ही अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. गणपतीपुळे, नेवरे, मालगुंड, वरवडे, भगवतीनगर या पाच गावांत ही प्रथा अजूनही सुरू आहे. या पंचक्रोशीत अनेकांच्या घरी गणपती आणला जात नाही. गणपती मंदिरातील गणपती हाच घरातील गणपती मानून त्याचे दर्शन घेतात. मात्र, गेल्या वर्षी कोरोनामुळे या साऱ्‍यांवर बंधन आले होते. यंदाही कोरोनामुळे अजूनही मंदिर बंद ठेवण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर पाच गावांतील प्रत्येकी २५ ग्रामस्थांना गणपतीपुळे मंदिराच्या पश्चिमेकडील दरवाजाकडून दर्शन घेण्यास परवानगी मिळाली. त्या ग्रामस्थांनी फुलोरा आणि तीर्थ घेऊन गावातील अन्य कुटुंबांना द्यायचे होते. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार शुक्रवारी (ता. १०) सकाळी गणपतीपुळे मंदिर व्यवस्थापनाने पश्‍चिमद्वाराकडील दरवाजातून श्री गणरायाच्या मुखदर्शनाची व्यवस्था केली होती.

पाच गावांसाठी प्रत्येक एक तासाचा कालावधी होता. सकाळी ९ ते १२.३० या कालावधीत नेवरे, भगवतीनगर या दोन गावांतील ग्रामस्थांनी दर्शनासाठी उपस्थिती दर्शवली. त्यांना फुलोरा आणि तीर्थ देण्यात आले; परंतु उर्वरित गावांतील लोकांना अटींमुळे दर्शन घेता आले नाही. भंडारपुळे ग्रामस्थांनी एका पत्राद्वारे गावातील प्रत्येक घरातील एका व्यक्तीला मंदिरात जाऊन गणेशाचे स्पर्शदर्शन व देवळातील फुलोरा, तीर्थ घेऊन येण्याची मागितलेली परवानगी प्रशासनाने मान्य केली नव्हती. एवढ्या मोठ्या गावातून पंचवीस जण निवडण्याचे ग्रामपंचायतींपुढे आव्हानच होते.

हेही वाचा: कोकणात दमदार सरींचा अंदाज

गणपतीपुळे दर्शनाविषयीच्या अटी-शर्तींसंदर्भात गणपतीपुळे ग्रामपंचायतीत बैठक झाली. त्यामध्ये जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार २५ ग्रामस्थांची निवड करण्याबाबत चर्चा झाली; पण तेवढेच ग्रामस्थ निवडणे अशक्य होते. या संदर्भात वेगळ्या पद्धतीने नियोजन करणे आवश्यक होते. तसे झाले नाही.

- महेश केदारी, उपसरपंच, गणपतीपुळे

ऑनलाईन दर्शनाचा लाभ

गणपतीपुळेच्या श्रींच्या दर्शनासाठी ऑनलाईन सुविधा देण्यात आली होती. त्यानुसार आज दिवसभरात एक हजारांहून अधिक भक्तांनी ऑनलाईन दर्शनाचा लाभ घेतला. फेसबुकसह अ‍ॅपवर ही व्यवस्था मंदिर प्रशासनाकडून करण्यात आली होती.

loading image
go to top