रत्नागिरीत खुल्या आरक्षणामुळे यांची नावे जि. प. अध्यक्षपदासाठी चर्चेत

राजेश कळंबटे
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

यापुर्वी 2000 मध्ये कोणतेही आरक्षण नव्हते. सर्वसाधारणमधून आबा घोसाळे आणि राजेंद्र महाडिक यांनी अध्यक्षपद भूषवले होते. त्यानंतर एकोणीस वर्षांनी सर्वसाधारण घटकातील सदस्यांना पुन्हा संधी मिळणार आहे.

रत्नागिरी - जिल्हा परिषद अध्यक्ष आरक्षणात रत्नागिरीचा सर्वसाधारणमध्ये (खुला गट) समावेश झाल्यामुळे शिवसेनेत इच्छुकांची भाऊगर्दी होणार हे निश्‍चित झाले आहे. अध्यक्षपदाची कुणाच्या गळ्यात पडणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले असून ज्येष्ठ सदस्यांपासून ते नव्याने निवडून आलेल्या सदस्यांपर्यंत सगळ्यांकडूनच फिल्डींग लावली जाणार आहे. यामध्ये सर्वात आधी ज्येष्ठ सदस्य उदय बने यांचे नाव आघाडीवर जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची आरक्षण सोडत मंगळवारी (ता. 19) मुंबईत सोडत काढण्यात आली. 16 सप्टेंबर 2019 ला विद्यमान अध्यक्षांची मुदत संपुष्टात येणार होती; विधानसभा निवडणुकीमुळे विद्यमानांना चार महिने वाढीव मुदत देण्याचा निर्णय झाला. ती 18 जानेवारीला पूर्ण होणार आहे. सध्या राष्ट्रपती राजवट असल्यामुळे अध्यक्षपदाची निवडणुक मुदत संपल्यानंतरच घ्यावी लागणार आहे. त्यापुर्वी सरकार स्थापन झाले तर नवीन आरक्षणानुसार कार्यवाही होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हेही पाहा - पाहा...स्कूबा डायव्हिंगचा थरार ! (व्हिडिओ) 

राष्ट्रवादीचे सहा सदस्य शिवसेनेच्या वाटेवर

रत्नागिरी जिल्हा परिषदेवर शिवसेनेच वर्चस्व असून 55 पैकी 39 सदस्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे 15 सदस्य असले तरीही नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील घडामोडींमुळे राष्ट्रवादीचे सहा सदस्य शिवसेनेच्या वाटेवर आहेत.

हे आहेत इच्छुक

यापुर्वी 2000 मध्ये कोणतेही आरक्षण नव्हते. सर्वसाधारणमधून आबा घोसाळे आणि राजेंद्र महाडिक यांनी अध्यक्षपद भूषवले होते. त्यानंतर एकोणीस वर्षांनी सर्वसाधारण घटकातील सदस्यांना पुन्हा संधी मिळणार आहे. सर्वसाधारणमधून निवडून आलेल्या सदस्यांची संख्या अधिक आहे. त्यात शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य गटनेते उदय बने, अण्णा कदम यांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ बाळशेट जाधव, रोहन बने, बाबू म्हाप यांची नावे इच्छुकांचा यादीत आहेत.

अण्णांसाठी रामदासभाई ताकद पणाला लावण्याची शक्यता

उदय बने यांनी यापुर्वी संघटनेशी प्रामाणिक राहत आदेशाचे पालन करत उपाध्यक्ष पद निवड झाल्यानंतर काही कालावधीत सोडले होते. त्यानंतर आरक्षणच पडत गेल्यामुळे त्यांच्यासारख्या ज्येष्ठ सदस्याला अध्यक्षपदाची संधी मिळू शकली नाही. ते पाचवेळा जिल्हापरिषदेवर निवडून आले आहेत. अभ्यासू असलेल्या बनेंना संधी दिली जावी, असे चित्र गेले अनेक वर्षे होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी आमदार उदय सामंत यांच्यासाठी चांगले काम करत करबुडे गटातून सर्वाधिक मताधिक्य मिळवून दिले होते. त्यापाठोपाठ माजी पर्यावरणमंत्री तथा शिवसेेनेचे नेते रामदास कदम यांचे भाऊ अण्णा कदम यांचे नावही चर्चेत आहे. पहिल्या अडीच वर्षात जिल्ह्याच्या दक्षिण भागातील लांजा आणि रत्नागिरी अशा दोन तालुक्यांना संधी मिळाल्याने उत्तर भागात अध्यक्षपद मिळावे अशी मागणी राहू शकते. अण्णांसाठी रामदासभाईही ताकद पणाला लावण्याची दाट शक्यता आहे.

रोहन बने दावेदार

रोहन बनेंनी मागील वेळी शिक्षण सभापतीपद नाकारल होते. निकषानुसार आतापर्यंत संगमेश्‍वर तालुक्याला अध्यक्षपदासाठी संधी मिळालेली नाही. त्याचा फायदा घेऊन शिवसेनेचे नेते सुभाष बने रोहनसाठी प्रयत्न करु शकतात. नियोजन सदस्य आणि सभापतीपद भुषवलेल्यांना पुन्हा संधी मिळणार नसल्याचे अडीच वर्षांपुर्वी ठरले होते. त्याची अंमलबजावणी झाल्यास रोहन दावेदार ठरतात. यापलीकडे जाऊन म्हाडाध्यक्ष तथा उपनेते आमदार सांमत यांचे निकटवर्तीय म्हणून बाबू म्हाप ओळखले जातात. आतापर्यंत म्हाप यांच्यासाठी आमदार सामंत यांनी प्रयत्न केले होते. अध्यक्षपदाची माळ गळ्यात घालून जिल्हापरिषद कारभार ते नियंत्रण ठेवू शकतात.

हेही पाहा -  क्रिकेटपटू विरेंद्रची चटका लावणारी एक्‍झिट 

तर विक्रांत जाधवांना संधी

राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले भास्कर जाधव गुहागरमधून तगडी लढत देत निवडून आले. त्यांचे सुपूत्र विक्रांत कदम यांच्यासह सहा जिल्हा परिषद सदस्य त्यांच्याबरोबर आहेत. शिवसेनेत आल्यानंतर विक्रांतला संधी मिळू शकते अशी चर्चा होती. त्याप्रमाणेच पत्ते पडल्यामुळे विक्रांतच्या नावाचीही शक्यता नाकारता येत नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratnagiri ZP Reservation For Open Category