आता रिफायनरीवर सेनेची भूमिका काय ?

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 January 2021

विविध सामाजिक, व्यावसायिक संघटनांनी प्रकल्प समर्थनार्थ दंड थोपटले असून 'रिफायनरी प्रकल्प राजापुरात झालाच पाहिजे.

राजापूर (रत्नागिरी) : नाणार प्रकल्पाला लोकांचा विरोध असेल तर शिवसेनेचा विरोध, अशी शिवसेना संघटना पातळीवर भूमिका घेणारे उद्धव ठाकरे रिफायनरीचे वाढलेले समर्थन आणि त्यासाठीची मागणी लक्षात घेऊन रिफायनरीबाबत सकारात्मक भूमिका घेणार का ? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

विरोधामुळे चर्चेत आलेल्या तालुक्‍यातील नाणार परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पच्या समर्थनाचा आवाज गेल्या महिनाभरापासून अधिक तीव्र होऊ लागला आहे. तालुक्‍यासह जिल्ह्यातील विविध सामाजिक, व्यावसायिक संघटनांनी प्रकल्प समर्थनार्थ दंड थोपटले असून 'रिफायनरी प्रकल्प राजापुरात झालाच पाहिजे', अशी आग्रही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

हेही वाचा - गेल्या काही दिवसांमध्ये आठ पक्षी मृतावस्थेमध्ये सापडले आहेत

लाखो रुपयांच्या गुंतवणुकीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणारा रिफायनरी प्रकल्प नाणार परिसरामध्ये प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादन करण्याची शासनाकडून जारी करण्यात आलेल्या नोटिशीची शेतकरी, मच्छीमार अन्‌ प्रकल्प विरोधकांनी होळी करून प्रकल्प विरोध सुरू झाला. त्यानंतर, शेतकऱ्यांसह विरोधकांनी गांधीगिरी करीत भूसंपादन रोखून धरले. 

छोट्या-मोठ्या प्रकल्पाविरोधी बैठकांमधून नाणार विरोधाचा मुद्दा चर्चेत राहिला. तालुक्‍यातील चाळीसहून अधिक संस्थांनी प्रकल्प समर्थनार्थ एकजूट केली. जिल्ह्यातील सामाजिक आणि व्यावसायिक अशा पन्नासहून अधिक संघटनाही प्रकल्प समर्थनार्थ एकत्रित आल्या आहेत. रिफायनरी राजापुरात झालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी या संघटनांनी केली आहे. प्रकल्प समर्थनाचा आवाज शासन दरबारी पोहचविण्यासाठी प्रकल्प समर्थकांना मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भेटीची आस लागली आहे. 

प्रकल्प समर्थन मोठ्या प्रमाणात 

यापूर्वी प्रकल्प विरोध दिसत होता. आता प्रकल्प समर्थन मोठ्या प्रमाणात दिसत आहे. प्रकल्प समर्थनाच्या वाढत्या रेट्यातून रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्‍यामध्ये का गरजेचा आहे? याचे महत्व अधोरेखित होत आहे. 

हेही वाचा - १ फेब्रुवारी २०२१ पासून सर्व मतदारांना ही सेवा उपलब्ध होणार आहे

प्रकल्प समर्थन वाढत चालले

प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पासाठी भूसंपादनाचा अध्यादेश रद्द केल्याची घोषणा शासनाने लोकसभा निवडणुकीपूर्वी केली. या घोषणेनंतर प्रकल्प रद्द झाल्याचे चर्चिले जाऊ लागले. तोपर्यंत प्रकल्प विरोधाचीच चर्चा होत होती; मात्र कोरोनातील लॉकडाउनच्या काळात मोठ्या संख्येने मुंबईकर गावाला आले. त्यापैकी अनेकजण बेरोजगार झाले. त्यातून रिफायनरीची मागणी जोर धरू लागली होती. अशा स्थितीमध्ये आमदार राजन साळवी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना नाणारसंबंधित सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रकल्प समर्थकांना त्या वक्तव्याने बळ मिळाले. प्रकल्प समर्थन वाढत चालले आहे. 

एक दृष्टिक्षेप

  • 40 हून अधिक संस्थांची समर्थनार्थ एकजूट 
  • पन्नासहून अधिक संघटनाही आल्या एकत्रित 
  • समर्थनाचा आवाज शासन दरबारी पोचवण्याचा प्रयत्न 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: refinery project demand by rajapur and konkani people in ratnagiri