काहीही करा आता माघार नाही....!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 डिसेंबर 2019

अन्नपूर्णा कोरगावकर म्हणाल्या मी आता माघार घेणार नसून, जनता पाठीशी असल्याने, विजयही निश्‍चित आहे.

सावंतवाडी  (सिंधूदुर्ग) : 'मला सावंतवाडी शहरातील घराघरात पक्ष पोहोचवायचा होता. यासाठी नगराध्यक्षपदासाठी मी सक्षम उमेदवार असतानाही पक्षाने तिकीट नाकारले. याचे मला दु:ख आहे. कोणाला चॅलेंज करण्यासाठी व आकसापोटी मी ही निवडणूक लढवीत नाही,' अशी स्पष्टोक्‍ती प्रभारी नगराध्यक्षा तथा अपक्ष उमेदवार अन्नपूर्णा कोरगावकर यांनी आज येथे दिली. कारवाई करण्यासाठी पक्षाचे एकही पद माझ्याकडे नाही. त्यामुळे शिस्तभंगाची कारवाई त्यांनी करावी.

मी आता माघार घेणार नसून, जनता पाठीशी असल्याने, विजयही निश्‍चित आहे, असा आशावादही कोरगावकर यांनी व्यक्त केला. येथील आपल्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत कोरगावकर बोलत होत्या. यावेळी श्‍यामकांत काणेकर, प्रसाद कोरगावकर, ऐश्‍वर्या कोरगावकर, अखिलेश कोरगावकर, विराग मडकईकर, शिवम सावंत, रामचंद्र पवार, रोहित पवार, निसार शेख, ओंकार सावंत आदी उपस्थित होते.

हेही वाचा - गर्ल्स... ब्री ब्रेव्ह ऍण्ड गो अहेड...! वू आर विथ यू

पक्ष जो देईल त्या उमेदवाराचे काम करण्याची ईच्छा

कोरगावकर म्हणाल्या, 'गेली पाच वर्षे भाजपात काम करत आहे. सावंतवाडीकरांना माहीत आहे, ज्यावेळी बबन साळगाकरांनी राजीनामा दिला, त्यावेळी पक्षाच्या वरिष्ठांना नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे सांगितले होते. त्यानंतर माडखोल येथे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी इच्छुक उमेदवारांची बैठक घेत, पक्ष जो देईल त्या उमेदवाराचे काम करण्याची सूचना केली होती ; मात्र पक्षाने दिलेल्या उमेदवाराचे काम करण्याचा होकार दिलेला नव्हता. 

 हेही वाचा - चक्क...अमेरिकेत एमएच-10 पासिंग...!

 पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आदर्श

2016 मध्ये नगरसेवक म्हणून संधी मिळावी अशी, पक्षाकडे अपेक्षा ठेवली असताना ऐनवेळी तिकीट कापले गेले. हा कटू अनुभव होता. त्यामुळे अपक्ष उमेदवारी भरली आणि यावेळीही पक्षाने संधी दिली नाही. आजही पक्षाची प्रामाणिक कार्यकर्ती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आदर्श आहे. असे असताना वरिष्ठांनी डावलले याची खंत आहे.'' 

हेही वाचा - फ्रेंच  आर्ट’ च्या  मैत्रीचे कंगोरे

 आता माघार नाही

कोरगावकर म्हणाल्या, 'अपक्ष उमेदवारी दाखल केली म्हणून कारवाईची भाषा करत आहेत ; मात्र माझ्याकडे असलेली सर्वच पदे पक्षाने काढून घेतली. त्यामुळे कारवाईसाठी एकही पद राहिले नाही. आता काहीही करा, माघार नाही.'

हेही वाचा - ते  धरणग्रस्त अधांतरीच.....! ​

आता जनतेची सेवक 
नगराध्यक्षपदाची खुर्ची ही मानाची नाही ; तर ती एक नैतिक जबाबदारीची खुर्ची आहे, या जबाबदारीची जाणीव आहे. त्यामुळे यावेळी निवडून आल्यास कुठल्या पक्षासोबत जाणार नाही; तर जनतेची नगराध्यक्षा म्हणून, जनतेची सेवक म्हणून काम करणार, असे कोरगावकर यांनी सांगितले. 

हेही वाचा - नांदेडच्या एका कार्यकर्त्याने निष्ठा साकारली हातावर  

सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांची जाण 

कोरगावकर म्हणाल्या, 'सावंतवाडीत शून्यातून विश्‍व निर्माण केले आहे. एक गृहिणी, उद्योजिका, उपनगराध्यक्षा ते प्रभारी नगराध्यक्षा अशी वाटचाल आहे. तीन वर्षांत सर्वसामान्यांचे प्रश्‍न जाणले आहेत. शहरात ड्रेनेजची व्यवस्था कोलमडलेली आहे, जीर्ण जुन्या नाल्यांचा प्रश्‍न आहे. पार्किंगची समस्याही आहे. युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबर बचत गटांचे सबलीकरण, महिला सक्षमीकरण, हा उद्देश आहे. त्यामुळे या निवडणुकीत निश्‍चितपणे विजयी होणार.' 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Savantwadi Political Elections Do Nothing Back Now