esakal | प्लास्टिक कंटेनरमध्ये केला भातरोपाचा प्रयोग; शेतकऱ्याची शक्कल
sakal

बोलून बातमी शोधा

प्लास्टिक कंटेनरमध्ये केला भातरोपाचा प्रयोग; शेतकऱ्याची शक्कल

भातपिकाला सध्या चांगला हमीभाव असला तरी भातशेतीच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. या खर्चात बचत करण्यासाठी शिवराम चव्हाण यांनी यंदा अनोखा प्रयोग केला.

प्लास्टिक कंटेनरमध्ये केला भातरोपाचा प्रयोग; शेतकऱ्याची शक्कल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कणकवली (सिंधुदुर्ग) : भात पेरणी (Rice sowing) पूर्वी होणारी मशागत, त्‍यानंतर नांगरणी, पेरणी आदींसाठी होणारा खर्च टाळून प्लास्टिक कंटेनरमध्ये (plastic containers) भातरोप निर्मितीचा (rice seedlings) वेगळा प्रयोग कातवड (ता. मालवण) येथील तरूण शेतकरी शिवराम गोविंद चव्हाण (Shivram Chavan) यांनी केला आहे. प्लास्टिक कंटेनरमध्ये झालेल्‍या भात रोपांची रोवणीही पूर्ण झाली असून या अनोख्या प्रयोगातून भाताचे चांगले उत्‍पादनही निघेल, असा विश्‍वासही चव्हाण यांनी व्यक्‍त केला. भातपिकाला सध्या चांगला हमीभाव असला तरी भातशेतीच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. या खर्चात बचत करण्यासाठी शिवराम चव्हाण यांनी यंदा अनोखा प्रयोग केला.

हेही वाचा: पडवेतील अमितने फुलशेती करुन मिळवली उत्पन्नाची शाश्‍वती

जिल्ह्यात भात पेरणीपूर्वी जमिनीची मशागत केली जाते. यात झाडांच्या फांद्या जाळून जमीन भाजली जाते. पाऊस पडल्‍यानंतर जमिनीची नांगरणी करून भात पेरणी होते. यानंतर रूजलेली भातरोपे काढून पुन्हा लावणीची कामे केली जातात. त्‍यासाठी फार मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागते. या सर्व प्रक्रियेला फाटा देत चव्हाण यांनी यंदा कंटेनरमध्ये भातरोप निर्मितीचा प्रयोग केला.

हेही वाचा: सिंधुदुर्गात डेल्टा प्लसची एंट्री; कणकवली परबवाडीत सापडला बाधीत

श्री. चव्हाण यांची आंबा बागायतही आहे. यात बागेतील आंबे काढणे आणि त्‍यांची ने-आण करण्यासाठी त्‍यांनी प्लास्टिकचे ५० कंटेनर विकत घेतले होते. याच कंटेनरमध्ये त्‍यांनी भात रोपवाटिका तयार केली. भात रोपवाटिका तयार करत असताना, प्रामुख्याने दोन भागात माती आणि उर्वरीत भागात शेणखत भरले. त्‍यावर भात बियाण्याची पेरणी केली. हा प्रयोग करत असताना चव्हाण यांना तालुका कृषी अधिकारी श्री. गोसावी आणि कृषी सहायक धनंजय गावडे यांचे मार्गदर्शन लाभले.

हेही वाचा: कणकवली बालोद्यानसाठी 75 लाखाचा निधी

एका कंटेनरमध्ये ७० ग्रॅम या प्रमाणात श्री. चव्हाण यांनी भात बियाणे पेरले. एका गुंठ्यामागे एक कंटेनर यानुसार ५० कंटेनरमध्ये भात रोप निर्मिती केली. पेरणीनंतर २५ दिवसांनी या कंटेनरमधील भात रोपांची 'श्री' पद्धतीने लागवड केली. या सर्व प्रक्रियेमध्ये श्री. चव्हाण यांचा भातपेरणी पूर्वी होणाऱ्या मशागतीचा खर्च वाचला. त्‍याचप्रमाणे तरवा काढण्यासाठीही मनुष्यबळाची आवश्‍यकता भासली नाही.

हेही वाचा: महामार्ग चाैपदरीकरणः कणकवली शहरासमोर नव्या ओळखीचे आव्हान 

महत्‍वाची बाब म्‍हणजे कंटेनरमध्ये भात रोप निर्मिती झाल्‍याने भातरोपांमध्ये तण उगवले नाही. कंटेनरमध्ये भात पेरणी झाल्‍याने पावसावरचे अवलंबित्‍व कमी झाले. एकसमान रोपनिर्मिती झाली आणि मुख्य म्‍हणजे यासाठी लागणाऱ्या वेळेतही मोठी बचत झाली. पूर्वी तरवा काढणे आणि त्‍याची अन्य भागात नेऊन रोवणी करण्यासाठी खूप वेळ लागत होता. कंटेनरमधील रोपनिर्मितीमुळे हा सर्व वेळ आणि खर्च वाचल्‍याचे चव्हाण म्‍हणाले. कंटेनरमधील रोप निर्मितीमुळे भात बियाणे कमी प्रमाणात लागले. मुबलक पाणी आणि सेंद्रीय खते देता आल्‍याने भाताची वाढ देखील चांगली झाल्‍याचेही ते म्‍हणाले.

हेही वाचा: कणकवली उड्डाणपुलावर वाहतूक रोखली 

कंटेनरमध्ये भात रोपनिर्मिती झाल्‍याने भात लागवडीसाठी नांगरणी, तण काढणे, तरवा काढणे आदींच्या खर्चात आणि वेळेतही मोठी बचत झाली. पुढील काळात भात शेतीमध्ये आणखीही प्रयोग करून कमी खर्चात भात उत्‍पादन घेण्यासाठी प्रयत्‍न सुरू आहेत.

- शिवराम चव्हाण, शेतकरी

पारंपरिक भात रोप निर्मितीमध्ये सुधारणा करत कंटेरनरमध्ये भातनिर्मितीचा प्रयोग कातवड येथील शेतकरी शिवराम चव्हाण यांच्या माध्यमातून केला आहे. या प्रयोगाचे भात उत्‍पादन पाहून पुढील वर्षी ही पद्धत अन्य प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतामध्येही राबविली जाणार आहे.

- धनंजय गावडे, कृषी सहाय्यक

loading image