रायगडावरील घोषणाबाजीमुळे उफाळून आला वाद; शिवसेना आमदाराची माफी

टीम ई-सकाळ
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

समाधी आणि गडाचे पावित्र्य राखणे ही जनतेची नव्हे, राजकीय नेत्यांची जबाबदारी असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी म्हटले आहे.  

महाड : सध्या राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू असल्याने सर्वत्र राजकीय नेते आणि कार्यकर्ते विविध यात्रा काढत आहेत. मात्र, काल (ता.18) शिवसेनेच्या काही राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांनी रायगडावर जाऊन घोषणाबाजी केल्याने नवा वाद सुरू झाला.

- पंतप्रधान मोदींच्या सभेत सगळे बोलले पण खडसे... 

काय आहे नेमके प्रकरण?
स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड ही महाराष्ट्राची अस्मिता आणि गौरवभूमी म्हणून ओळखली जाते. मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष असणारा हा अभेद्य गड. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी याच गडावर आहे. मात्र, शिवसेनेच्या काही राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांनी या पवित्रस्थळी जाऊन राजकीय घोषणा दिल्या. त्यामुळे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विटवरून पुन्हा कोणत्याही राजकीय पक्षाने अशा पद्धतीचे वर्तन करू नये, अशी विनंती केली आहे. 

महाडमधील शिवसेनेचे आमदार भरत गोगावले आणि त्यांचे कार्यकर्ते काल किल्ले रायगडावर गेले होते. त्यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीस्थळावर चढून राजकीय घोषणा दिल्याची चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर कोणत्याही राजकीय पक्षांनी राजकीय घोषणाबाजी करण्यासाठी छत्रपतींच्या समाधीस्थळाचा वापर करू नये, अशी घोषणाबाजी करणे योग्य नाही. तसेच समाधी आणि गडाचे पावित्र्य राखणे ही जनतेची नव्हे, राजकीय नेत्यांची जबाबदारी असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी म्हटले आहे.  

- ‘मेगाभरती’ नोकरीची नव्हती तर पक्षाची... : धनंजय मुंडे

सेना आमदाराचा माफीनामा
राजसदर आणि शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी शिवसैनिकांनी राजकीय घोषणाबाजी केल्यामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. खासदार छत्रपती संभाजीराजे आणि शिवभक्तांनी या प्रकारावर आक्षेप नोंदविल्यानंतर शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी बुधवारी (ता.18) सायंकाळी आपला माफीनामा सादर केला होता. 

कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. मीदेखील एक शिवभक्त आहे आणि नेहमी रायगडावर जाऊन नतमस्तक होत असतो. उत्साहाच्या भरात कार्यकर्त्यांनी राजकीय घोषणा दिल्या त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. 
- भरत गोगावले, आमदार, शिवसेना

- 'मोदी खोटारडे हे आज पुन्हा एकदा सिद्ध'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena MLA Bharat gogavale apologizes after controversy at Raigad