सुजाण खंबीर पालकत्वामुळे योग्य शिस्त

संगीताचे वडील मला सांगत होते, त्यांची दहावीतीली मुलगी शेजारच्या वयस्कर माणसाच्या प्रेमात पडली होती व त्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत होते.
Shrutika Kotkunde
Shrutika Kotkundesakal

- श्रुतिका कोतकुंडे, चिपळूण

संगीताचे वडील मला सांगत होते, त्यांची दहावीतीली मुलगी शेजारच्या वयस्कर माणसाच्या प्रेमात पडली होती व त्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत होते. त्यांनी तिला चांगला चोप दिला होता; पण आत्ता ती सारखी शाळेत फिट येऊन बेशुद्ध होत होती. त्यामुळे सगळे चिंतित होते. तपासाअंती शरीरात काहीही आजार नसल्याचे आढळले. तिला अभ्यासाचा आणि पालकांमुळे ताण आला होता. संगीताच्या वडिलांना पालकात्वाबद्दल समुपदेशन गरजेचे होते......

सर्वसाधारणतः पालकत्वात प्रामुख्याने अनियंत्रित पालकत्व, खंबीर पालकत्व व हुकूमशाही पालकत्व असे ३ प्रकार आढळतात. अनियंत्रित पालकत्वामध्ये नियंत्रणाचा अभाव दिसतो. काहीच नियम नसल्यामुळे मुले वाममार्गाला लागण्याची शक्यता असते.

अशा मुलांमध्ये भावनिक व वर्तन समस्या निर्माण होण्याची शक्यता असते तसेच हुकूमशाही पालकत्वामध्ये अतिबंधने लादल्यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता किंवा बंडखोरवृत्ती जोर धरू शकते. याच्या विपरित जिथे खंबीर व सुजाण पालकत्व असते तिथे मुलांना आपुलकी, सामंजस्य व परस्पर आदर अनुभवण्यास मिळतो. त्यामुळे मुलांची सर्वांगीण वाढ व्हायला मदत होते व मुल स्वतंत्र विचारांचे व जबाबदार बनायला मदत होते.

खंबीर सुजाण पालक यांच्या बोलण्या-वागण्यामध्ये स्पष्टता असते. मुलांना आदराने वागवत त्यांना समजूतदारपणे नियमांची चौकट ते घालून देतात. मुलांच्या मतांना महत्व देत एकत्रित निर्णय घेण्यास ते प्रोत्साहन देतात. खंबीर पालकत्वामध्ये मुलांना नियमांना रचनात्मक बदल करण्यास मुभा असते व परस्परांच्या भावनांचा आदर असतो. यामुळे मुलाचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. त्याचे आत्मभान वाढते व ते जबाबदारीने निर्णय घेण्यास शिकत जाते.

खंबीर व सुजाण पालक मुलांशी वेळोवेळी स्पष्ट संवाद साधतात. ज्यामुळे मुलाला त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे, हे नीट समजण्यास मदत होते. नियमांची स्पष्ट चौकट असल्यामुळे व नियमांच्या सातत्यामुळे मुलामध्ये सुरक्षेची भावना वाढते व स्वयंशिस्त निर्माण होण्यास मदत होते. खंबीर पालक मुलाला स्वावलंबी बनण्यास प्रोत्साहन देतात. मुलाला निवडीचे स्वातंत्र्य मिळाल्यामुळे त्यांची निर्णयक्षमता वाढते.

खंबीर पालकत्वामध्ये मुलाला योग्य ते मार्गदर्शनाबरोबर स्वानुभवातून शिकण्याची मुभा असते. मोकळा संवाद असल्यामुळे मुलांमध्ये पालकांविषयी विश्वास व आदरयुक्त धाक निर्माण होतो. दोघांना एकमेकांच्या भावना समजायला, एकमेकांची मते समजून घेण्यास व स्वीकारण्यास मदत होते.

खंबीर पालकत्वासाठी घरातील सर्व मोठ्यांनी मुलाचे मनापासून ऐकावे, त्यांचे योग्य गोष्टीसाठी कौतुक करावे व सकारात्मक प्रोत्साहन द्यावे. माणूस टिकेने बदलण्यापेक्षा कौतुकाने बदलतो, हे जाणावे. सोशल मीडिया, गेमिंग, मित्र याबद्दल मतभेद असल्यास खुलेपणाने चर्चा करावी. त्यातील धोके व जोखीम ओळखण्यास मुलाला मदत करावी.

मुलावर चांगला-वाईट शिक्का मारण्यापेक्षा त्याच्या वागण्यावर आक्षेप घ्यावा उदा. ‘तू एकदम वाईट मुलगा आहेस. तुला माझी काहीच कदर नाही’, यापेक्षा ‘तू पसारा करतोस याचा मला त्रास होतो‘, हे जास्त सूचक आहे. असे वागणे पुन्हा होऊ नये याच्यासाठी चर्चेतून समस्येचे निवारण करून योग्य त्या वागण्याची सूचना करावी.

मुलाला घडवताना पालकही घडत असतो. त्यामुळे पालकाने स्वतःच्या व्यक्तीमत्व विकासासाठी प्रयत्न करावा. पालकांनी मुलावर आपले स्वतःचे मत लादू नये. मुलाला वागण्याचा रचनात्मक अभिप्राय द्यायला शिकावा. मुलाच्या वयाबरोबर पालकत्वही बदलणे गरजेचे असते. बालवयातील पालकत्वापेक्षा कुमारवयातील पालकत्व जास्त लवचिक असावे.

पौगंडावस्थेतील वाढत्या स्वातंत्र्याची गरज लक्षात घेता मुलाच्या स्वायत्तत्तेला महत्व द्यावे. स्वातंत्र्य व जबाबदारी याचे तारतम्य सांभाळण्यास मदत करावी. यामुळे पालकांनाही मुलाचे बदलते मन समजून घेण्यास मदत होते. मुलांसाठी स्वतः निर्णय घेणे टाळावे. मुलाला आधाराचे वातावरण द्यावे. मूल जेव्हा ठराविक चौकटीत राहून प्रयोग करेल, चुका करेल, त्या चुकातून शिकेल तेव्हाच ते जबाबदार होत जाईल.

सुजाण पालकत्व हे सातत्याने बदलांशी जुळवून घेणारी प्रक्रिया आहे. मूल जसे वाढत जाते तसे परिस्तिथीशी जुळवत बदल होत जाणे महत्वाचे ठरते. असे जिथे होताना दिसते तिथे मूल आणि पालकांमध्ये विश्वास दृढ होत जातो व आदरयुक्त भागीदारीचा पाया रचला जातो. यामध्ये मूल व पालक दोघेही एकमेकांचे अवकाश मोठे करत जातात व हा प्रवास आनंदाचा व समृद्धीचा होत जातो. खंबीर व सुजाण पालकांनी स्वतःलाही जपावे.

उत्तम पालक बनण्यासाठी उत्तम माणूस बनणे महत्वाचे असते. आपल्या व्यक्तीमत्वातले दोष ओळखून आपल्यात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करावा. पालकांनी आदर्श बनण्याची गरज नाही; पण आदर्श वागण्याकडे वाटचाल करण्याचा त्यांचा प्रवास त्यांच्या मुलांनाही प्रेरणादायी ठरेल.

पालक शांत व समंजस असेल तर ते त्यांची मते जास्त स्पष्टपणे, ठामपणे, मोकळेपणाने व परिणामकारक पद्धतीने मुलांकडे मांडू शकतील. मुलांच्या समस्या निवारण करताना वादाच्या मुळाशी जाण्याची प्रयत्न करावा, चर्चा करावी व एकत्रितपणे समस्येचे निवारण करावे. घरात शांततेचे व प्रसन्नतेचे वातावरण राहिल्यामुळे मुलांना सुरक्षित वाटते व त्यामुळे मुलांची भावनिक वाढ व मानसिक आरोग्य अबाधित राहते.

त्यामुळे पालकांनी आपल्या ताणाचे नियोजन करावे, स्वतःच्या व्यक्तीमत्वातील कमजोर बाबी ओळखून त्यावर उपाय शोधावा कारण, जर पालकच आनंदी नसेल तर ते आनंदी मूल कसे घडेल? संगीताच्या वडिलांना समुपदेशनातून तिला कसे मायेने समजावावे, हे कळल्यामुळे मोठा अनर्थ टळला. तिच्या फिट येणे बंद झाले व ती मनापासून अभ्यासाला लागली.

(लेखिका मनोविकार व मानसोपचारतज्ज्ञ आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com