esakal | पिवळ्याधमक फुलांनी बहरले सिंधुदुर्ग; 'तिळा'च्या शेतीने फुलली गावे
sakal

बोलून बातमी शोधा

पिवळ्याधमक फुलांनी बहरले सिंधुदुर्ग; 'तिळा'च्या शेतीने फुलली गावे

जिल्ह्यातील तरूणांनी रोजगारासाठी मुंबई-पुण्याकडे धाव घेतल्‍यानंतर मात्र तीळ व इतर शेती करण्याचेही प्रमाण कमी झाले.

पिवळ्याधमक फुलांनी बहरले सिंधुदुर्ग; 'तिळा'च्या शेतीने फुलली गावे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खारेपाटण : खारेपाटण, वैभववाडी ते राजापूर परिसरातील अनेक गावांमध्ये तिळाची शेती बहरली आहे. रेल्‍वे मार्ग, महामार्ग तसेच गावातील अंतर्गत मार्ग दुतर्फा असलेले हे तिळाच्या पिवळ्या धम्‍मक फुलांचे मळे पर्यटकांचेही लक्ष वेधून घेत आहेत. नवरात्रोत्‍सवानंतर या तिळाच्या शेतीची कापणी केली जाणार आहे. जिल्ह्यात तिळाची शेती सध्या कमी होत असली तरी खारेपाटण, वैभववाडी, राजापूर परिसरातील शेतकऱ्यांनी मात्र तिळाची शेती अनेक वर्षापासून सुरू ठेवली आहे.

सिंधुदुर्गात तथा कोकणातील अनेक गावांत तीस ते चाळीस वर्षापूर्वी भात शेतीबरोबरच तिळाचीही शेती मोठ्या प्रमाणात होत होती. गावोगाव तिळाचे घाणे असत. बैल हा घाणा ओढायचे. तीळ गाळून झाल्यावर उरलेली पेंड गुरांना उपयोगी पडत असे. जिल्ह्यातील तरूणांनी रोजगारासाठी मुंबई-पुण्याकडे धाव घेतल्‍यानंतर मात्र तीळ व इतर शेती करण्याचेही प्रमाण कमी झाले. शेतकऱ्याला आर्थिक स्थैर्य देण्याची क्षमता असलेल्‍या तीळ शेतीशी प्रामुख्याने डोंगर उताराच्या तसेच पडीक जमिनीवर लागवड केली जात आहे.

हेही वाचा: विदेशी भाजीपाल्यातून महिन्याला लाखोंची कमाई

पुढील काही दिवसांत होणाऱ्या नवरात्रोत्‍सवात तिळाच्या फुलांच्या हाराला मोठी मागणी असते. त्‍याबरोबर खाद्यपदार्थ आणि औषध निर्माण प्रक्रियेमध्ये ही तिळाच्या तेलाचा वापर होत असल्‍याने तिळाला अजूनही मोठी मागणी आहे. तसेच धार्मिक कार्यासाठीही तीळ मोठ्या प्रमाणात वापरले जात असल्‍याची माहिती आखवणे (ता.वैभववाडी) येथील गेल्‍या अनेक वषार्पासून तिळाची शेती करणारे शेतकरी वसंत काशीराम नागप यांनी दिली.

खते, कीटकनाशकांची विनाच शेती

खरीप हंगामात डोंगर उतारावर, पठारावर एक दोनदा नांगरणी करून तीळ पेरला की ना बेणणी करावी लागत, ना खताची मात्रा द्यावी लागते, ना कीटकनाशकांची फवारणी करावी लागते. अशा या तीळ पिकाची पिवळीधमक फुलं झाडावरच सुकली की ती फुले कापून अंगणात आणावयाची आणि झोडून काळं सोनं टिपायचं, अशी जुन्या शेतकऱ्यांची पद्धत होती. पूर्वीच्या काळात या काळ्या तिळाचे तेल गावातीलच घाण्यातून काढले जात असे. हे तेल स्वयंपाकात वापरले जात असे तर पेंड गुरांना खायला घातली जात असे.

प्रतिकिलोला १२० ते १५० रूपये दर

सिंधुदुर्गात डोगर उताराच्या पडीक जमिनीमध्ये तीळ शेतीची लागवड व्हावी यासाठी कृषि विभागाकडून सतत प्रयत्‍न केले जात असल्‍याची माहिती कृषि सहाय्यक धनंजय गावडे यांनी दिली. सध्या तिळाला बाजारपेठेत १२० ते १५० रूपये प्रतिकिलो असा दर आहे. तसेच तिळाला राज्‍याबाहेर मोठी बाजारपेठ आहे, तसेच स्थानिक व्यापाऱ्याकडूनही तिळ खरेदी केले जात असल्‍याचे गावडे म्‍हणाले.

हेही वाचा: Live : नंदुरबारमध्ये काँग्रेसची सत्ता कायम; भाजपची पिछेहाट

"तीळ पिकाला उष्ण, दमट हवामान मानवते. मात्र इथे अतिपाऊस असल्‍याने उतारावरील हलक्या व उत्तम निचऱ्याच्या जमिनीवर हे पीक फायद्याचे ठरते. जिल्ह्यामध्ये भात , किंवा नाचणी या पिकासमवेत आंतरपिक घेता येते. देवगड, परुळे या सड्यावरील कोरड्या जमिनीतसुद्धा खरिपामध्ये हे पीक फायद्याचे ठरणारे आहे. बहुगुणी अशा तिळाच्या लागवडीस भर दिल्यास आर्थिक फायदा मिळून जमिनीची धूप रोखणे शक्य होते."

- धनंजय गावडे, कृषि सहाय्यक

"पचंवीस-तीस वर्षापूर्वी सिंधुदुर्गात व्यापारी दृष्‍टीकोन तसेच उत्पन्नाचे साधन म्‍हणून तिळाची शेती केली जायची. मात्र शेतीकडील तरूणवर्ग नोकरी धंद्यानिमित्त मोठ्या शहरांत गेला. तसेच शेतीमध्ये वन्य आणि पाळीव प्राण्यांचा उपद्रव वाढला. त्‍यामुळे तिळाच्या शेतीचे प्रमाण लक्षणीय कमी झाले आहे. मात्र तिळाचे व्यावसायिक महत्‍व अजूनही अबाधित आहे. बचतगट आणि तरूणांनी व्यावसायिक दृष्‍ट्या तिळाची शेती केली तर मोठे आर्थिक उत्पन्न मिळवून देणारे हे पीक आहे."

- वसंत नागप, शेतकरी

हेही वाचा: 'ड्रामा'पेक्षा 'बिझनेस डील' जास्त महत्वाची, जेनेलियाच्या टिप्स

loading image
go to top