esakal | विदेशी भाजीपाल्यातून महिन्याला लाखोंची कमाई; 'राजू' ठरले शेतकऱ्यांसाठी रोल मॉडेल
sakal

बोलून बातमी शोधा

विदेशी भाजीपाल्यातून महिन्याला लाखोंची कमाई

पंचतारांकित हॉटेलमधून मोठ्या प्रमाणात विदेशी भाजीपाल्याला यापूर्वीही मागणी होती आणि आजही आहे.

विदेशी भाजीपाल्यातून महिन्याला लाखोंची कमाई

sakal_logo
By
सदानंद पाटील

कोल्‍हापूर : कष्‍ट करायची तयारी आणि हेतू प्रामाणिक असेल तर यश हातात असते, हे कार्यातून सिद्ध केले आहे, कोंडिग्रे (ता. शिरोळ) येथील शेतकरी राजू नांद्रे यांनी. जेमतेम नववी शिक्षण असलेल्या नांद्रे यांनी सुरुवातीस बायोटेक फार्ममध्ये नोकरी केली. मात्र, ४, ५ हजार पगार परवडत नसल्याने आपल्याच २५ गुंठे शेतातून विदेशी भाजीपाला लागवड केली. यात चांगलाच जम बसल्यावर भाड्याने दोन एकर शेती घेऊन त्यात भाजीपाला उत्‍पादन घेतले. आज या भाजीपाला विक्रीतूनच महिन्याला एक लाखावर उत्‍पन्‍न घेणारा राजू अन्य तरुण शेतकऱ्यांसाठी रोड मॉडेल ठरला आहे.

नांद्रे यांनी सुरुवातीला शेतात भेंडी, टोमॅटो, मिरची टोमॅटोचे उत्‍पादन घेतले. मात्र, याचा भाव व्यापारी किंवा घेणाऱ्याच्या हातात असल्याने नुकसान होते. त्यामुळेच इतर भाजीपाला करण्याचा निर्णय घेतला. पंचतारांकित हॉटेलमधून मोठ्या प्रमाणात विदेशी भाजीपाल्याला यापूर्वीही मागणी होती आणि आजही आहे. ही मागणी पुरवण्यासाठी सुरुवातीला काही मोजक्यात शेतकऱ्यांनी या उत्‍पादनास सुरुवात केली. हा विदेशी भाजीपाला केवळ ग्रीन हाउसमध्येच येतो, असा समज असल्याने व ग्रीन हाउसचा खर्च मोठा असल्याने हौशी शेतकऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र, राजू नांद्रे यांच्यासारख्या प्रयोगशील शेतकऱ्याने खुल्या शेतीत विदेशी भाजीपाला घेण्याचा निर्णय घेतला. यासाठी लागणारी रोपे, बियाणे आणायची कोठून?, असा प्रश्‍‍न होता.

हेही वाचा: यंदा असा होणार दसरा मेळावा, संजय राऊत यांनी दिली माहिती

पुणे येथून बियाणे आणण्यावर शिक्‍कामोर्तब केले. तयार रोपांचा खर्च मोठा होता. त्या तुलनेत बियाणांपासून रोपे तयार करण्याचा खर्च कमी होता. रोपांच्या निम्‍म्या किमतीत बियाणापासून रोपे तयार होत होती. त्यामुळे त्यांनी स्‍वत:च रोपे तयार करण्याचा निर्णय घेतला. विदेशी भाजीपाल्यात लेट्यूस, ब्रोकोली, सेलरी याचबरोबर रंगीत ढबू मिरची आदींनी शिवार फुलू लागल्यानंतर व्यापारी, हॉटेल मालक यांनीच संपर्क साधला. कोणकोणत्या ठिकाणी मागणी आहे, याचा अंदाज आला. चांगले दर मिळणाऱ्या बाजारपेठाही मिळत असल्याने चार वर्षे अखंडपणे विदेशी भाजीपाला नांद्रे कुटुंबीयांना दर महिन्याला लाखाचे उत्‍पन्‍न मिळवून देत आहे.

विदेशी भाजीपाला शेतीचे महत्त्व

- सर्व पिकांचा कालावधी ४० ते १२० दिवस

- जास्‍तीत जास्‍ते सेंद्रिय औषधांचा वापर

- गुणवत्ता चांगली असल्याने जागेवर खरेदी

- वर्षभर चांगला दर

हेही वाचा: भाजपला 'जोर का झटका'; मुंडण करत आमदाराची पक्षाला सोडचिठ्ठी

"जास्‍त शिक्षण असेल, तरच आधुनिक शेती करता येते हा गैरसमज आहे. अनुभव, कष्‍ट आणि नेहमी नवीन प्रयोग करण्याची तयारी असेल, तर कोणतीही गोष्‍ट अवघड नाही. विदेशी भाजीपाला उत्‍पादनातील मागणी मोठी असली, तर गुणवत्तेचे उत्‍पादन करणारे शेतकरी कमी आहेत. त्यामुळे प्रामाणिकपणे ही शेती केली तर व्यापारी, ग्राहक जागेवरून भाजीपाला नेतात. काही कंपन्याही तुमच्यासोबत फिक्‍स रेटवर करार करतात."

- राजू नांद्रे, विदेशी भाजीपाला उत्‍पादक.

loading image
go to top