सिंधुदुर्गनगरीत नगरपंचायत का गरजेची...?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

सिंधुदुर्गनगरी  प्राधिकरण कार्यक्षेत्रात नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्याचे निश्‍चित करून त्यासाठी आराखडा तयार करण्यात यावा, असा ठराव घेण्यात आला.

ओरोस (सिंधुदुर्ग) :  सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण समितीच्या आज झालेल्या सभेत सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत स्थापना लवकर करण्यात यावी , असा महत्वपूर्ण ठराव घेण्यात आला . हा ठराव लवकरात लवकर कार्यवाही होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविण्याच्या निर्णय घेण्यात आला. प्राधिकरण कार्यक्षेत्रात नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्याचे निश्‍चित करून त्यासाठी आराखडा तयार करण्यात यावा, असा ठराव घेण्यात आला.

जिल्हाधिकारी तथा प्राधिकरण समिती अध्यक्ष डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक पार पडली. यावेळी समिती सचिव तथा अपर जिल्हाधिकारी मंगेश जोशी , जिल्हा परिषद , जिल्हा पोलिस व विविध विभागांचे अधिकारी तसेच अशासकीय सदस्य प्रभाकर सावंत व छोटू पारकर उपस्थित होते. 

 हेही वाचा - जनतेच्या आग्रहाखातर भाजपने यांना दिली उमेदवारी
 

विरंगुळा केंद्राची गरज

बैठकीनंतर सदस्य श्री सावंत व पारकर यांनी याबाबत माहिती दिली . यावेळी सावंत व पारकर म्हणाले की, प्राधिकरण क्षेत्रातील वस्ती वाढली आहे . त्यामुळे येथे अधिकाधिक सेवा-सुविधा उपलब्ध व्हाव्यात अशी मागणी ग्रामस्थांची असून विरंगुळा केंद्र सुरु करण्याचीही मागणी होती. त्यानुसार विरंगुळा केंद्र उभारण्याचे निश्चित करून त्यासाठी आराखडा तयार करण्याचे ठरविण्यात आले. 

 हेही वाचा - निर्माता देता का निर्माता? -

 प्राधिकरण क्षेत्रात लवकरच व्यापारी संकुल

प्राधिकरण क्षेत्रात सुसज्ज बाजारपेठ नाही. लोकांना खरेदीसाठी शहराबाहेर जावे लागते. यासाठी प्राधिकरण क्षेत्रात व्यापारी संकुल उभारण्याची मागणी पूर्वीपासून होत होती. व्यापारी संकुलाच्या आराखड्याला मान्यता देण्यात आली असून लवकरच व्यापारी संकुल उभारण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ पांढरपट्टे यांनी स्पष्ट केले.

 हेही वाचा - गाव - शिवाराला पारखी झाली फुलपाखरं, पण कशामुळे ?
 

शासनांकडून 25 कोटी रूपये मंजूर

सिंधुदुर्गनगरीसाठी राज्य शासनांकडून माजी पालकमंत्री आ दीपक केसरकर यांनी 25 कोटी रूपये मंजूर केले आहेत. या निधीतून रस्ते विकास कामे सुरु आहेत. याच बरोबर पथदिवे बसविणे. भूखंड 103 व 46 भागासाठी विद्युत ट्रान्सफार्मर मंजूरीची मागणी करण्यात आली आहे. कचरा उचलण्यासाठी अजुन दोन अत्याधुनिक गाड्या खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

प्रवेशद्वारावर  शिवाजी महाराज यांचा पुतळा

 आठवड्यातून एकदा कचरा उचलला जातो. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. नवीन वाहने आल्यावर सुका व ओला कचरा असे वर्गीकरण करून कचरा उचलण्या निर्णय यावेळी झाला. यावेळी ओरोस फाटा येथील सिंधुदुर्गनगरी प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे.

 जोरदार तयारी रौप्य महोत्सवाची

रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेणे. रस्त्यांना दुभाजक बसविणे. प्राधिकारण क्षेत्रातील सर्कलचे सुशोभिकरण करणे. स्टॉलधारकांचे पुनर्वसन करणे, आदी विषयावर यावेळी चर्चा झाल्याचे सावंत आणि पारकर यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sindhudurg Why Needed Local Municipal Corporation