सिंधुदुर्ग हवाई नकाशावर; पण...

सिंधुदुर्ग गोव्याला जितका जवळ तितकाच इथला निसर्ग, बऱ्याच प्रमाणात लोकजीवन यात साधर्म्य आहे.
Kokan
KokanSakal

सावंतवाडी : चिपीत (ता. वेंगुर्ले) विमान उतरले आणि सिंधुदुर्गात पर्यटन विस्ताराचे स्वप्न आणखी ठळक झाले. हवाई नकाशावर सिंधुदुर्गाचे नाव कोरल्यामुळे अर्थातच आता परदेशी पर्यटक जिल्ह्यात येण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला. खऱ्या अर्थाने सिंधुदुर्गाने गोव्याच्या पर्यटन विश्‍वाशी स्पर्धा करण्यासाठीचे पाऊल टाकले. अर्थात सिंधुदुर्गाच्या पर्यटन विस्तारासाठी महाराष्ट्र शासनाने स्वतंत्र आणि लवचिक धोरण अवलंबले तरच गोव्याशी स्पर्धा करणे शक्य होणार आहे. यातही गोव्याला सिंधुदुर्ग पर्याय म्हणून उभा करायचा की तिथले पर्यटनच इथपर्यंत विस्तारायचे याचाही या पर्यटन धोरणात विचार व्हायला हवा. त्यावरच पुढच्या प्रवासाची दिशा ठरणार आहे.

सिंधुदुर्ग गोव्याला जितका जवळ तितकाच इथला निसर्ग, बऱ्याच प्रमाणात लोकजीवन यात साधर्म्य आहे. अगदी संस्थान काळातही गोव्याचा बराचसा भाग तत्कालीन सावंतवाडी संस्थानच्या अधिपत्याखाली होता. यामुळे नातीगोती, परंपरा याचेही ऋणानुबंध या दोन प्रांतांशी जोडलेले आहेत. असे असूनही गोवा पर्यटनाबाबत खूप आधीपासून जगाच्या नकाशावर पोहोचला; पण लगतच्या सिंधुदुर्गात पर्यटनातला ‘प’ पण पोहोचला नाही. याचे मुख्य कारण होते पायाभूत सुविधांचा अभाव आणि सरकारी धोरणातली तफावत. सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर केल्यापासून ते शनिवारी (ता.९) झालेल्या चिपी विमातळाच्या उद्‍घाटनापर्यंतचा प्रवाह हा याच तृटी दुरूस्त करण्याचा प्रयत्न म्हणता येईल; पण इतके होवूनही सिंधुदुर्ग गोव्याला पर्यटन पर्याय ठरू शकतो का हे सांगणे मात्र धाडसाचे ठरेल. चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळ उद्‍घाटनाचा बहुचर्चित सोहळा झाला. यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापासून ते नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांच्यापर्यंत सर्वच नेत्यांनी सिंधुदुर्गात पर्यटन वाढावे, अशी अपेक्षा आणि संकल्प व्यक्त केला. यात अर्थातच गोव्यातील पर्यटन सिंधुदुर्गापर्यंत पोहोचावे, असा मुद्दा आवर्जुन मांडला गेला.

मुळात सिंधुदुर्गात पर्यटन विकासाचे स्वप्न गोव्याला डोळ्यासमोर ठेवूनच पाहिले गेले. साधारण ९०च्या दशकात इथे पर्यटन विकासाचे वारे वाहायला लागले. टाटा कन्सल्टन्सीकडून महाराष्ट्र शासनाने सिंधुदुर्गाच्या पर्यटन विकासाचा एक अहवाल बनवून घेतला. नंतर सिंधुदुर्ग देशातला पहिला पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर झाला. पायाभूत सुविधांवर काम सुरू झाले. महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने (एमटीडीसी) तारकर्ली, आंबोली आदी पर्यटनस्थळे विकसीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. हे करत असताना गोव्यातील पर्यटन सिंधुदुर्गापर्यंत यावे हा ‘हिडन अजेंडा’ कायमच राहिला. याला काही प्रमाणात यशही आले. विशेषतः महाराष्ट्रांतर्गत पर्यटकांना काही प्रमाणात सिंधुदुर्ग हा पर्यटनासाठीचा पर्याय वाटू लागला. मध्यमवर्गीय पर्यटक सिंधुदुर्गात स्थिरावू लागले. यातून मालवण, वेंगुर्ले, आंबोली आदी स्थळांवर पर्यटन विस्तार दिसू लागला. अर्थात धोरणातील लवचिकतेचा अभाव, प्रयत्नांमधील सातत्याचा अभाव, स्थानिक मानसिकता, वाहतूक व्यवस्थेतील दोष, पायाभूत सुविधांची कमतरता, स्थानिकांना पर्यटनात आणण्यासाठी बळ देण्यात आलेले अपयश आदी कारणामुळे हा पर्यटन विकास मर्यादितच राहिला. गोव्यातील पर्यटन अर्थकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या परदेशी पर्यटकांना येथे आकर्षित करण्यात सिंधुदुर्ग कमी पडला. आता हा जिल्हा स्वतंत्रपणे हवाई नकाशावर आल्याने या परदेशी पर्यटन विश्‍वात सिंधुदुर्गाला आपले नाव कोरण्याचा मार्ग दिसू लागला आहे.

Kokan
संगमनेर : रक्षाबंधनाच्या दिवशीच युवतीची छेडछाड; महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली

मुळात सिंधुदुर्ग हवाई वाहतुकीसाठी गोव्याच्या दाभोली विमानतळावर अवलंबून होता. चिपीमुळे हे अवलंबत्व बऱ्याच प्रमाणात कमी होणार आहे. चिपीचे हे विमानतळ

किनारपट्टी भागात आहे. मालवण, वेंगुर्ले पासून ते जवळ आहे. या भागात गेल्या काही वर्षांत पर्यटन सुविधांमध्ये वाढ झाली आहे. काही तारांकित हॉटेल्सही सुरू झाली आहेत. आता हवाई मार्गाने आणखी पर्यटक येवू लागले तर इथे तारांकित पर्यटन प्रॉपर्टी वाढू लागतील. तशा हालचालीही इथे आहेत. याच भागात वायंगणी (मालवण) येथे ‘सी वल्ड’ प्रकल्प प्रस्तावित आहे. तो साकारला तर ‘हाय प्रोफाईल’ पर्यटनाला ते एक आकर्षण ठरणार आहे.

गोव्यात किनाऱ्यावरील गजबज वाढली आहे. अमली पदार्थांचा विळखा, गुन्हेगारी कृत्य, यामुळे गोव्याच्या किनाऱ्यांवर असुरक्षिततेची झालर तयार होत आहे. या तुलनेत सिंधुदुर्गाचे किनारे स्वच्छ, बऱ्याच प्रमाणात गजबजाटापासून दूर आहेत. इथे आजही अनेक ‘अन टच’ किनारे शांतता आणि प्रदूषण विरहीत पर्यटन शोधणाऱ्यांसाठी आकर्षण ठरू शकतात. इको टुरिझमकडे वळणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यात हाय प्रोफाईल वर्गाचा जास्त समावेश आहे. गोव्यात यासाठी मर्यादीत पर्याय आहेत. यामुळे सिंधुदुर्गात इको टुरीझम वाढवायचा धोरणात्मक निर्णय झाला तर खूप चांगले पर्याय उभे राहू शकतील. आंबोली हे यासाठीचे उदाहरण घेता येईल. इथे वर्षभर निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी, त्याचा अभ्यास करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या गेल्या दहा वर्षांत वाढली आहे. याचा थेट परिणाम इथल्या अर्थकारणावर दिसत आहे. अर्थात हा प्रवास इतका सोपा पण नाही.

Kokan
RCBचं कर्णधारपद सोडल्यानंतर विराट झाला भावूक, म्हणाला

केवळ विमानतळ झाला म्हणून सिंधुदुर्ग गोव्याला पर्याय ठरू शकत नाही. कारण मुळात गोवा हे पर्यटनाचे ‘इंटरनॅशनल हब’ आहे. तिथे राज्याच्या अर्थकारणावर थेट प्रभाव टाकणारा घटक म्हणून याकडे पाहिले जाते. त्यामुळे गोव्याची पर्यटन धोरणे लवचिक आहेत. शिवाय इथे पर्यटन विकासाची मानसिकता आणि खूप मोठी व्यवस्थाही आहे. तेथील पायाभूत सुविधांचे जाळे अधिक मजबूत आहे. या तुलनेत महाराष्ट्राचे पर्यटन धोरण कायमच ‘रिजीड’ राहिले आहे. सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा असूनही यासाठी वेगळी स्थानिक परिस्थितीचा विचार करून बनवलेली पर्यटन धोरणे बनवली गेली नाहीत. उलट वेगवेगळे लावलेले निकष पर्यटनात अडसरच ठरले. स्थानिक मानसिकता बदलण्यासाठी फारसे प्रभावी प्रयत्न झाले नाहीत. अनेक योजना कागदावरच राहिल्या. या सगळ्यातून ‘हाय प्रोफाईल’ पर्यटकांना आवश्यक सुविधा, रस्ते, यंत्रणा विस्ताराला मर्यादा आल्या. अलिकडे मात्र यात थोडे बदल होताना दिसत आहेत. अनेक वर्षे रखडलेले पंचतारांकीत हॉटेल प्रकल्प सुरू करण्यासाठी शासनाकडून सकारात्मक पावले उचलली जात आहेत. अनेक तरुण पर्यटनात उतरताना दिसत आहेत. विशेषतः किनारपट्टी भागात स्थानिक मानसिकता झपाट्याने बदलत आहे. याला बळ मिळाले तर सिंधुदुर्गाचा पर्यटन विकास अधिक गतीमान होवू शकतो. गोवा आणि सिंधुदुर्ग हे दोन्ही प्रांत निसर्ग आणि भौगोलीक रचनेबाबत बरेच साधर्म्य असलेले आहेत. त्यामुळे गोव्याच्या पर्यटनाशी सिंधुदुर्ग कसा जोडला जातो यावर इथला विस्तार, विकास अवलंबून आहे.

गोव्याशी स्पर्धा करून तिथला पर्यटक इथे पळवून आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले तर ते फार कठीण आहे. कारण पर्यटन हब असलेल्या गोव्याची मक्तेदारी मोडीत काढण्याची ताकद आजच्या घडीला तरी इथे नाही. त्यातही धोरणात्मक निर्णयाच्या मर्यादा आहेतच. गोव्यात फक्त बीच टुरीझमसाठी पर्यटक येतो असे नाही. तेथे इतर अनेक क्षेत्र, पर्याय उपलब्ध आहेत. ते सगळ येथे निर्माण करणे खूप अवघड आहे. यापेक्षा गोव्याच्या हातात हात घालून तिथल्या पर्यटन क्षेत्राचा सिंधुदुर्गापर्यंत विस्तार करण्याचे धोरण ठरवल्यास खूप मोठे बदल होवू शकतात. आता चिपीला विमानतळ झाला तरी सिंधुदुर्गातील बराचसा भाग गोव्याच्या विमानतळापासून अधिक चांगल्या प्रभावी वाहतूक व्यवस्थांनी जोडलेला आहे. त्यामुळे गोव्यातील वाहतूक व इतर सुविधांचाही सिंधुदुर्गाच्या पर्यटन विकासासाठी वापर करून घ्यायला हवा. चिपी विमानतळासारखे पर्याय तयार होतीलच; पण आहे ही यंत्रणाही वापरता येईल.

Kokan
'महाराष्ट्र बंद'ला भाजपचा विरोध; जबरदस्तीनं दुकानं बंद केल्यास...

बीच टुरीझम किंवा गोव्यात आधीच उपलब्ध पर्यटन व्यवस्थेचे सिंधुदुर्गात डुप्लीकेशन झाले तर पर्यटक ओरीजिनल गोष्टींनाच प्राधान्य देतील. त्या ऐवजी गोवा जिथे कमी पडतो तिथे सिंधुदुर्गाने पर्यटन पर्याय उभे केल्यास खऱ्या अर्थाने इथे विकास होवू शकतो. सिंधुदुर्गाचे पर्यटन धोरण ठरवतात गोव्याला पर्याय म्हणून नाही तर गोव्याच्या पर्यटनाची ‘अदर साईड’ म्हणून विकास करायला हवा.

तरच अधिक चांगले रिझल्ट

एकूणच गोवा आणि सिंधुदुर्ग यात पर्यटन स्पर्धेपेक्षा एकमेकांच्या हातात हात गुंफून सुरवात झाली तर ती जास्त प्रभावी ठरू शकेल. यात महाराष्ट्र आणि गोवा सरकारने एकत्र येवून काम केले तर अधिक चांगले रिझल्ट दिसू शकतील. यात दोन्ही प्रांतांचा पर्यटन विकासात फायदा होईल. गोव्याच्या पर्यटनातील काही क्षेत्रात आलेल्या मर्यादा यातून दूर होतील. गोव्यात येण्यासाठी सिंधुदुर्ग हे एक वेगळ पॅकेज ठरेल आणि सिंधुदुर्गाला गोवा मार्गे पर्यटनाचा राजमार्ग मिळू शकेल.

पर्यटन जगात गोवा हे अजूनही ब्रँड नाव आहे. ते कमवायला गोव्याला ४० वर्षे लागली. चिपीमुळे कोकणात पर्यटक निश्‍चित वाढतील, पण गोव्याची जागा घेण्यासाठी त्यांना अनेक वर्षे लागतील; मात्र टॅक्सी चालकांकडून होणारी लुबाडणूक व पोलिसांकडून होणारी सतावणूक थांबली नाही तर पर्यटक कोकणाकडे वळतील.

- नीलेश शहा, गोवा टूर्स अँड ट्रॅव्हल्स संघटनेचे अध्यक्ष

बहुतांश पर्यटक गोव्यात येतात ते निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्याबरोबरच दारू पिण्यासाठी. गोव्यात जशी स्वस्त दारू मिळते, तशी महाराष्ट्रात मिळणे कठीण आहे. त्यामुळे पर्यटकांसाठी गोवा हेच मुख्य आकर्षण असेल. महाराष्ट्राने गोव्यासारखी काहीशी मोकळी संस्कृती अंगीकारली तरच गोव्यात येणारा पर्यटक कोकणाकडे वळेल.

- सेराफिन कोता, लहान आणि मध्यम हॉटेल्सचालक संघटनेचे अध्यक्ष, गोवा

आता पर्यटकांना ‘अनएक्स्प्लोअर’ साईट, आकर्षित करतात. निसर्ग पर्यटन, सांस्कृतिक, पारंपरिकता दाखवणाऱ्या पर्यटनात गोवा सध्या कमी पडतो. याचे पर्याय सिंधुदुर्गात उभे करणे शक्य आहे. तशी क्षमताही येथे आहे. तेरेखोल, तिलारी आदी नद्या सिंधुदुर्गातून गोव्यात वाहतात. तेथील लोकजीवनही सिंधुदुर्गाशी साधम्य असलेले आहे. त्यामुळे निसर्गसंपन्न गोवा, पारंपरिक गोवा, सांस्कृतिक गोवा पाहण्याची भूक असलेल्या पर्यटकांना सिंधुदुर्ग पर्यटन पर्याय देवू शकतो. या गोष्टी आधीच येथे आहेत. त्याला केवळ कनेक्ट करण्याची गरज आहे.

- प्रसाद गावडे, पर्यटन अभ्यासक, सिंधुदुर्ग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com