सायबाच्या धरणाचे काम साठ टक्के पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सायबाच्या धरणाचे काम साठ टक्के पूर्ण

राजापूर : सायबाच्या धरणाचे काम साठ टक्के पूर्ण

राजापूर : गेली कित्येक वर्षे राजापूर शहराला नैसर्गिकरीत्या कमी खर्चामध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या कोदवली येथील सायबाच्या धरणाच्या येथील नव्या धरणाच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. सद्यःस्थितीला सुमारे साठ टक्के धरण बांधकाम पूर्ण झाले आहे. या धरणामध्ये सध्याच्या पाण्याच्या सातपट पाणीसाठा होण्याचा अंदाज आहे. या नव्या धरणामुळे पाणी वितरणाच्या खर्चामध्ये बचत होणार असून त्याचवेळी गेल्या कित्येक वर्षांपासूनचा राजापूरवासीयांचा बारमाही मुबलक पाणीपुरवठ्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी सुटणार आहे.

राजापूर शहराला पाणीपुरवठा होण्यासाठी ब्रिटिशांच्या काळामध्ये कोदवली येथे सायबाच्या धरणाची उभारणी करण्यात आली. नोव्हेंबर, १८७८ मध्ये कामाची सुरवात होऊन काही वर्षामध्ये बांधकाम पूर्ण झाले. पाणी पाइपलाइनद्वारे वितरित करण्यात येऊ लागले. त्यानंतर गेल्या १४२ वर्षाहून अधिक काळ हे धरण शहराच्या पाणीपुरवठ्याचा मुख्य जलस्त्रोत आहे. कोणताही खर्च न करता नैसर्गिकरित्या पाइपलाइनद्वारे या धरणातील पाणीसाठा शहराच्या विविध भागामध्ये वितरित केले जात आहे.

हेही वाचा: अमरावती वगळता सर्व ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात - गृहमंत्री

गेल्या काही वर्षापासून धरणाची भिंत ढासळून त्याच्या मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. धरणामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साठला आहे. त्यामुळे कमी प्रमाणात पाणीसाठा होत असल्याने त्याचा प्रतिकूल परिणाम पाणीपुरवठ्यावर होतो. एप्रिल महिन्यापासून शहराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.

ही समस्या दूर करण्यासाठी माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाकडे नव्या धरणाच्या बांधकामासाठी निधीची मागणी केली होती. त्याची दखल घेऊन फडणवीस यांनी सुमारे दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्या निधीतून सध्या नवे धरण बांधण्यात येत आहे. सुमारे साठ टक्के बांधकाम पूर्ण झाल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

हेही वाचा: बारामती सहकारी बँकेच्या निवडणूकीचे बिगुल वाजले

दृष्टिक्षेपात धरण

  • धरणाची लांबी ५० मी.

  • धरणाची उंची ६.४८ मी.

  • भिंतीची रुंदी २.५ मी.

  • झडपे वा गाळे १७

  • सद्यःस्थितीत पाणीसाठा ११ सहस्र घनमीटर

  • संभाव्य पाणीसाठा ६५६ सहस्र घनमीटर

  • अंदाजपत्रक सुमारे १० कोटी रुपये

loading image
go to top