
-अमित गवळे
पाली : साप म्हटले की अनेक जणांची पाचावर बसते. सजीवसृष्टीतील महत्वाचा घटक असलेल्या सापांबद्दल अनेक समज गैरसमज व भीती असल्याने साप दिसला की त्याला मारण्यासाठी काठी शोधली जाते. मात्र गेल्या काही वर्षात सर्पमित्रांचे उल्लेखनीय काम व वन्यजीव रक्षक संस्था आणि वनविभाग यांच्या द्वारे करण्यात आलेल्या जनजागृतीमुळे लोकांचा सापाला मारण्यापेक्षा वाचवण्याकडे कल वाढला आहे. गाव खेड्यांसह वाड्यापाड्यांमध्येही हा अनुकूल बदल दिसून येत आहे. विशेष म्हणजे सापांना त्यांच्या अधिवासात मोकळेपणाने जगण्यासाठी खुले आंदण मिळत आहे.