तरुण मुलाच्या हत्येचे दुःख सहन करीत आईवडील झाले कोरोन्टाईन...

Suffering from the murder of a young child the parents become quarantined ...
Suffering from the murder of a young child the parents become quarantined ...
Updated on

मंडणगड (रत्नागिरी) : आपल्या एकुलत्या एक तरुण मुलाचा अनपेक्षित झालेली निर्घृण हत्या, त्याचा देह घेऊन त्याचे अंत्यसंस्कार करण्यासाठी मूळगावी आल्यानंतर अनुभवायला आलेले विविध मानवी कंगोरे, त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करीत आई, वडील, बहीण आणि चुलते मंडणगड येथे विलगिकरण कक्षात कोरोन्टाईन झालेत. चोहू बाजूने कोसळले दुःख सहन करीत संघर्षमय परिस्थितीला सामोरे जात आहेत. अत्यंत हृदयद्रावक असणारी ही परिस्थिती पाहून नियम माणसांसाठी की माणूस नियमांसाठी हा प्रश्न निर्माण होतो आहे.


  मंडणगड तालुक्यातील गुडेघर येथील हरेश शिगवण हे पत्नी हर्षदा, मुलगी कोमल व मुलगा करण यांच्यासमवेत मुंबईतील कुरार व्हिलेज मालाड येथे वास्तव्यास आहेत. ता.१५ एप्रिल रोजी त्यांच्या आयुष्यात असा प्रसंग घडला की त्यांचे मनोधैर्य उद्धवस्त झाले. त्यांचा अठरा वर्षांचा मुलगा करण शिगवण याला कबुतर पाळण्याची प्रचंड आवड. त्यात तो रममाण होत असे. कबुतरांमध्ये रमणारा करण त्यांना जीवापाड जपत असे. मात्र त्याचे एक कबुतर अचानक गायब झाले.

माहिती घेतल्यानंतर त्याला समजले की त्याचे कबुतर त्याच परिसरात राहणाऱ्या अन्य मुलांनी चोरले आहे. त्याने त्यांच्याकडे त्याची पुन्हा देण्याची मागणी केली. करण घरी असताना त्याला फोन करून त्या तरुणांनी बाहेर बोलावून घेतले. कबुतर परत देतो पण त्याबदल्यात पैशाची मागणी केली. त्याला करणने नकार देत माझेच कबुतर आहे मी पैसे देणार नाही असे सांगितले. त्यावेळी त्यातील तिसऱ्या एका मुलाने त्याच्यावर चाकूने वार करीत त्याला जखमी केले. करण तेथेच कोसळला. ही घटना समजताच कुटुंबाने घटनास्थळी धाव घेतली, त्याला रुग्णालयात आणण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. झाल्या प्रकाराबत मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून तीनही आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यात दोन अल्पवयीन मुले असल्याचे समोर येत आहे.

आजी आजोबांना मुख दर्शन व्हावे म्हणून गावी आले
  मुलाच्या मृत्यूने दुःखाच्या दरीत कोसळले शिगवण कुटुंब पुरते हादरून गेले. कोरोनामुळे मानवी मदत संचार बंदीत अडकून पडलेली. गावी असणाऱ्या आजी आजोबांनी आग्रह धरला आपल्या नातवंडाचे मुख दर्शन तरी व्हावे. त्यातच आजोबा वृद्धापकाळाने जाग्यावरच खिळलेले. मनाची तयारी आणि परिस्थितीला तोंड देत मुलाचा निष्प्राण देह अंत्यसंस्कारासाठी मंडणगड तालुक्यातील गुडेघर या गावी रुग्णवाहिकेमधून आणण्यात आला. आजी आजोबांना ओझरते मुख दर्शन देत रात्रीच त्याच्यावर शेवटी अंत्यसंस्कार करण्यात आले. कबूतरासाठी आपल्या मुलाचा जीव घेण्यात आला हे सत्य कुटुंबियांच्या मनावर ओरखडे काढत आहे.

कोरोनाच्या नियमांमुळे घराऐवजी शाळेत नंतर विलगिकरण कक्षात
 देशभरात लॉक डाऊन आणि जिल्हा बंदीचे नियम यामुळे मुंबईतून आलेल्या या कुटुंबाला कोरोन्टाईन होणे क्रमप्राप्त असल्याचे स्थानिक संबंधित यंत्रणा आणि प्रशासनाचे म्हणणे असल्याचे त्यांच्यापर्यंत पोहचवण्यात आले. कठोर झालेली नियती पाठ सोडायला तयार नसल्यागत परिस्थिती. आरोग्य सुरक्षेचा उपाय म्हणून गावातील घराऐवजी शाळेत थांबलेल्या आणि आधीच दुःखाने पिचलेले हे कुटुंब प्रशासनाला सहकार्य करीत मंडणगड शहरातील विलगिकरण कक्षात ता.१७ एप्रिल पासून कोरोन्टाईन झालेय.

भाऊ रमेश सोबत गावी आल्याने त्यांनाही कोरोन्टाईन व्हावे लागले. एका बाजूला या कठीण काळात अनेक प्रसंगातून मानवतेची जपवणूक होत असताना काही प्रसंगात माणुसकी हरवत असल्याचेही दिसून येते. मात्र अशा गंभीर दुःखी प्रसंगात कर्तव्य कठोरतेत माणुसकी हरवतेय का? कशासाठी? कुणासाठी? असे असंख्य अनुत्तरित प्रश्न मात्र निर्माण होत आहेत. अंत्यविधींनंतर करण्यात येणारे धार्मिक सोपस्कार बाकी आहेत, घरातील कर्तेच कोरोन्टाईन झाले असल्याने ते करताही येत नाहीत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com