esakal | Tauktae Cyclone Effect : कोकणातील आंबा बागायतदारांचे कोट्यावधीचे नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

Tauktae Cyclone Effect : कोकणातील आंबा बागायतदारांचे कोट्यावधीचे नुकसान

Tauktae Cyclone Effect : कोकणातील आंबा बागायतदारांचे कोट्यावधीचे नुकसान

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

रत्नागिरी : ‘तौक्ते’ (tauktae cyclone) चक्रीवादळाचा तडाखा रत्नागिरी हापूसला (ratnagiri hapus) बसला आहे. यंदा हंगाम लांबल्यामुळे शेवटच्या टप्प्यात आंबा अधिक तयार होण्याची शक्यता असतानाच आलेल्या वादळासह मुसळधार पावसाने (heavy rain) झाडावरील आंबा खाली पडला. सुमारे चाळीस टक्के पिक वाया गेले असून बागायतदारांचे करोडोचे (caror rupees) नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

2016 साली झालेल्या अवकाळीपेक्षाही यंदाची परिस्थिती भीषण असून बागायतदारांचे कंबरडेच मोडले आहे. हंगामाच्या सुरवातीलाच वातावरणातील बदलांचा परिणाम झाला. पहिल्या टप्प्यात उत्पादन आलेच नाही. खर्‍या अर्थाने 10 एप्रिलपासून आंबा बाजारात दिसू लागला होता. गेल्या पंधरा दिवसात वाशी बाजारातही दिवसाला 30 हजार पेटी दाखल होत होती. मोहोर उशिराने आल्याने 15 ते 31 मे या कालावधीत उत्पादन हाती येईल अशी शक्यता होती; मात्र अचानक अरबी समुद्रात (arabian sea) निर्माण झालेल्या तौक्ते वादळाने बागायतदारांच्या इच्छा आकांक्षांवर पाणी फेरले.

रविवारी पहाटेपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात (sindhudurg district) वादळाने धुमाकुळ घातला. दुपारी हे वादळ रत्नागिरी जिल्ह्यात (ratnagiri ratnagiri) दाखल झाले. गोल गोल फिरणार्‍या ताशी 55 किलोमीटर वेगवान वार्‍यांनी हापूसच्या बागाच्या बागा पिळवटून टाकल्या. झाडावरील आंबे टपाटप जमिनीवर कोसळत होते. काढणीयोग्य आंब्यापासुन ते कैरीपर्यंतची सर्वच फळं खाली पडली. बागांमध्ये सडाच्या सडा पहायला मिळत आहेत. बागांमधील झाडेच कोसळल्याने शेतकरी कायम उत्पन्नाला मुकला आहे. घोंघावत्या वादळात शेतकरी हताश झाला होता. या वादळात शेवटच्या टप्प्यातील आंब्यांची पूर्णतः वाताहात झाली. आंबा पडून आपटल्यामुळे कॅनिंगलाही तो घेतला जाणार नाही. त्यामुळे कोट्यवधीचे नुकसान बागायतदारांना सहन करावे लागणार आहे.

हेही वाचा: Good News : रत्नागिरीत भाजप उभारणार कोविड सेंटर; बाधितांना मोठा दिलासा

"तौक्ते वादळामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. झाडावरील बहुतांश फळ खाली पडून वाया गेली आहेत. झालेल्या नुकसानीची पंचनामा त्वरित करावा. तसेच बागायतदारांना याची भरपाई कशी देता येईल यासाठी समिती नेमून उपाययोजना करण्याची गरज आहे."

- प्रसन्न पेठे, आंबा बागायतदार

"अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. पंधरा दिवसांचा आंबा गळून गेला आहे. सरकारने शेतकर्‍यांना जगवण्यासाठी मदतीचा हात दिला पाहिजे. यासाठी शासनाला पत्र सादर करण्यात येणार आहे."

- प्रदीप सावंत, अध्यक्ष आंबा उत्पादक संघ

"झाडावरील आंबा उतरवायचा शिल्लक असलेले सुमारे 15 टक्के क्षेत्र शिल्लक असावे. त्यातील फळगळ झाली असून वादळामुळे फळझाडे मोडून नुकसान झाले आहे. दोन्ही प्रकारच्या नुकसानीचे पंचनामे करा, असे आदेश दिले आहेत."

- शिवराज घोरपडे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी

हेही वाचा: 'तू फिरकीपटू आहेस, धाडसी असायला हवं'; सांगलीच्या तरणजीतला धोनीचा गुरुमंत्र

"आंबा बागायतदार यांना विशेष मदत मिळवून देण्यासाठी मी अर्थ मंत्र्याकडे चर्चा केली आहे."

- उदय सामंत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री