esakal | रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना वेगाने पसरतोय; एका महिन्याची आकडेवारी धक्कादायक

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना वेगाने पसरतोय; एका महिन्याची आकडेवारी धक्कादायक
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना वेगाने पसरतोय; एका महिन्याची आकडेवारी धक्कादायक
sakal_logo
By
राजेश कळंबटे/

रत्नागिरी : करोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका राज्याच्या अन्य भागांप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यालाही बसला आहे. एप्रिल महिन्यात नवीन बाधित रुग्णांच्या संख्येने दहा हजारांचा टप्पा पार केला आहे. गेल्या वर्षी करोनाच्या पहिल्या लाटेत रत्नागिरी जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या काही हजारांपर्यंत मर्यादित राहिली होती. पण गेल्या मार्चपासून ही संख्या हळूहळू वाढू लागली आणि एप्रिल महिन्यात नवीन विक्रम प्रस्थापित केला.

या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ८ एप्रिलपर्यंत नवीन बाधितांची संख्या दररोज सुमारे १०० ते १५० ने वाढत होती. पण ९ एप्रिल रोजी ती एकदम सुमारे शंभराने वाढून २५१ झाली. त्यानंतर जेमतेम ४ दिवस ती २०० ते २५० पर्यंत मर्यादित राहिली. पण १३ व १४ एप्रिल रोजी ३०० च्या पुढे गेली आणि १५ एप्रिलला तर ४०० चा टप्पा (४१७) ओलांडला. त्यापुढील तीन दिवस वेगाने ही संख्या पाचशेवर (१८ एप्रिल - ५५५) गेली.

हेही वाचा: झक्कास! गोंधळाला फाटा देणारा लसीकरणाचा दापोली पॅटर्न

१९ एप्रिल रोजी त्यामध्ये तात्पुरती घट (२५९) दिसली, पण दुसऱ्याच दिवशी (२० एप्रिल) हा आकडा सहाशेवर (६८५) पोचला. त्यानंतरचे चार दिवस जिल्ह्यात दररोज ४५० ते ५५० करोनाबाधित रुग्ण आढळून येत होते. २५ एप्रिल रोजी तो पुन्हा सहाशेवर (६१५) गेला. त्यानंतर एक दिवस वगळता जिल्ह्यात दररोज सहाशेपेक्षा जास्त बाधित रुग्ण आढळून येत आहेत. गेल्या बुधवारी तर तब्बल ७९१ रुग्ण सापडल्याने दैनंदिन आकडेवारीचा नवा उच्चांक गाठला गेला आणि त्याचबरोबर अवघ्या २9 दिवसात जिल्ह्यात 10,666 कोरोना रुग्ण नोंदवले गेले.

पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेमध्ये संसर्ग होण्याचे प्रमाण जास्त आहे. या वाढीमागील हे मुख्य कारण असले तरी अनेक ठिकाणी अज्ञान, गैरसमज किंवा भितीपोटी संशयित रुग्ण चाचणीसाठी उशिरा जात असल्यामुळे अधिक फैलावत आहे. काही वाड्या-वस्त्यांवर तर पोलिस प्रमुखांना चाचण्या कराव्या लागल्या आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने चाचण्यांचे प्रमाण वाढवल्यामुळेही रुग्ण निष्पन्न होण्याचे प्रमाण वाढले आहे.

हेही वाचा: मुंबई-गोवा हायवेवर 1 कोटी 60 लाखाची दारू जप्त

'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहीम

राज्यातील करोनाविषयक निर्बंध गुरुवारी आणखी १५ दिवस वाढवण्यात आले आहेत. या काळात जिल्ह्यात 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहीम पुन्हा एकवार राबवण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन तपासणी करणार आहेत. जिल्ह्यातील करोनाची लाट नियंत्रणात आणण्यासाठी या मोहिमेचा चांगला उपयोग होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.