esakal | झक्कास! गोंधळाला फाटा देणारा लसीकरणाचा दापोली पॅटर्न

बोलून बातमी शोधा

झक्कास! गोंधळाला फाटा देणारा लसीकरणाचा दापोली पॅटर्न
झक्कास! गोंधळाला फाटा देणारा लसीकरणाचा दापोली पॅटर्न
sakal_logo
By
चंद्रशेखर जोशी

दाभोळ : लसीकरणासाठी होणारी गर्दी, गोंधळ, त्यावर नियंत्रण आणण्यासाठी अपुरे सरकारी कर्मचारी याबाबत बोटे मोडत न बसता, दापोलीकरांनी लसीकरणात सुसूत्रता आणली असून, हेल्प ग्रुपने या कामी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी संगणकप्रणालीही बनवण्यात आली. यामुळे लोकांची ससेहोलपटही थांबणार आहे. उत्तम व्यवस्था निर्माण केली तर काय होऊ शकते, याचा पडताळा लसीकरणाच्या दापोली पॅटर्नने दिला आहे.

लस घेण्यासाठी रोज सकाळी नागरिकांची गर्दी, लसीविना अनेकांना माघारी जावे लागते, गर्दी नियंत्रण प्रशासनाच्या हाताबाहेर जाऊ लागले होते. अशावेळी हा पॅटर्न उपयोगी पडत आहे, असे दापोली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश भागवत यानी सांगितले. समीर गांधी व त्यांच्या सहकाऱ्यांनी एक फॉर्म बनवला. त्यात लस घेणाऱ्याचे नाव, गाव, पहिली लस घेतली का, ती कोणत्या प्रकारची, लस घेतल्याची तारीख, आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक अशी माहिती भरली जाते. सोहोनी विद्यामंदिर येथे लस घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाकडून हा फॉर्म भरून घेण्यात येतो. जेव्हा लस येईल, तेव्हा मोबाईलवर कळवू, त्या वेळेला लस घेण्यासाठी या, असे सांगण्यात येते.

हेही वाचा: कोरोनाकाळात सोप्या व्यायामाने रहा स्वस्थ; हृदय आणि फुफ्फुस ठेवा तंदुरुस्त

ज्येष्ठ नागरिकांना तसेच पहिली लस घेतलेल्यांना दुसरी लस देण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. काल सायंकाळपर्यंत सुमारे १२०० नागरिकांनी फॉर्म भरून दिले. हेल्प ग्रुपमध्ये धनंजय गोरे, प्रा. डॉ. दीपक हर्डीकर, बाळू भळगट, संतोष विचारे, विपुल पटोलिया, हरेश पटेल, प्रसाद फाटक, महादेव काळे, ॲड. विजयसिंह पवार, ऋषिकेश ओक, करिष्मा भुवड, स्नेहल जाधव, गौरव करमरकर, सुमेध करमरकर, प्रकाश बेर्डे, सुरेश केळकर काम करत आहेत.

दूरध्वनी करून बोलाविणार सोहोनी विद्यामंदिर या केंद्रात किती लस आली. हे या ग्रुपला सांगितले जाईल. लसीच्या प्रकारानुसार तसेच संख्येनुसार पहिली लस घेतलेल्यांना तसेच इतरांना दूरध्वनी करून लस घेण्यासाठी त्यानुसार बोलाविण्यात येणार असल्याचे समीर गांधी यांनी सांगितले.

यापूर्वी होत होते काय...

  • सकाळी ६ वाजल्यापासून रांग

  • लस मिळेपर्यंत नागरिकांची परवड

  • सोशल डिस्टन्सिंगचा पूर्ण बोजवारा

  • गर्दी नियंत्रण प्रशासनाच्या हाताबाहेर

आता होणार काय

  • लसीसाठी ससेहोलपट थांबणार

  • कधी जायचे ते नेमके कळणार

  • प्राधान्यक्रम ठरविणे शक्‍य होणार

  • गडबड, गोंधळ टळून सुसूत्रता

हेही वाचा: मुंबई-गोवा हायवेवर 1 कोटी 60 लाखाची दारू जप्त

संगणक तज्ज्ञाची मदत

गांधी यांचे सहकारी संदीप बागायतकर या संगणक तज्ज्ञाने यासाठी एक संगणक प्रणालीही विकसित केली. फॉर्मवरील माहिती या प्रणालीत भरल्यावर एखाद्याने कोव्हिशिल्डची पहिली लस घेतली असेल तर दुसरी लस कोणत्या मुुदतीपर्यंत घ्यायला पाहिजे, त्याची माहिती या प्रणालीवर येते.