देवगड हादरलं! जेवण न दिल्याच्या रागातून वृद्ध आई आणि भावाची हत्या | Devgad double murder | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devgad Murder Case
पान एक-बापार्डेत दुहेरी हत्याकांड

देवगड हादरलं! जेवण न दिल्याच्या रागातून वृद्ध आई आणि भावाची हत्या

देवगड : जेवण देत नसल्याच्या रागातून दांड्याने मारहाण करून मोठा भाऊ आणि वयोवृद्ध आईचा खून केल्याचा प्रकार बापार्डे-बौद्धवाडी येथे घडला. शोभा मुरारी सकपाळ (वय ७०) आणि त्यांचा मुलगा महेंद्र (५६) अशी मृतांची नावे आहेत. हा प्रकार मंगळवारी सकाळी उघड झाला. या प्रकरणी पोलिसांनी संशयित भारत मुरारी सकपाळ (४९) याला ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील बापर्डे-बौद्धवाडी भागात सकपाळ कुटुंब राहते. घरात संशयितासह त्याची आई शोभा आणि मोठा भाऊ महेंद्र होते. सोमवारी सायंकाळी शोभा तसेच महेंद्र यांना स्थानिकांनी पाहिले होते. ते राहत असलेल्या घराच्या आजूबाजूला काही बंद घरे असल्याने फारशी वर्दळ नव्हती. एरवी शोभा तसेच महेंद्र पहाटे उठायचे; मात्र आज बराचवेळ झाला तरीही दोघेही घराबाहेर दिसले नसल्याने स्थानिकांनी त्यांच्या घराजवळ जाऊन पाहिले. खिडकीतून पाहिले असता दोघेही अंथरूणावर निपचित पडलेले दिसले. याची माहिती स्थानिकांनी पोलिसपाटील नितीन नाईकधुरे यांना दिली. त्यांनी पोलिसांना कळवले.

घटनेची माहिती मिळताच निरीक्षक नीळकंठ बगळे, नाईक प्रशांत जाधव, अमित हळदणकर, काँस्टेबल स्वप्नील ठोंबरे, गणेश चव्हाण आदींनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी दोघेही अंथरूणावर मृतावस्थेत पडलेले होते. दोघांच्या डोक्यावर तसेच तोंडासह शरीरावरील अन्य भागावर मारहाणीच्या खुणा होत्या. चेहऱ्‍यावर राख फासलेली होती. त्यामुळे चेहरे नीटसे ओळखता येत नव्हते.

पोलिसांनी पंचनामे करून मृतदेह विच्छेदनासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. बांबूच्या दांड्याने केलेल्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. यातील मृत महेंद्र यांची पत्नी आणि मुले मुंबई येथे असतात. पोलिसांनी मारहाणीसाठी वापरण्यात आलेला दांडा ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी संशयावरून भारत सकपाळ याला ताब्यात घेतले आहे. त्याने खुनाची प्राथमिक कबुली दिल्याची माहिती निरीक्षक बगळे यांनी दिली. त्याच्याविरुद्ध पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान, अप्पर अधीक्षक नितीन बगाटे, उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे, ओरोस येथील स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे निरीक्षक संदीप भोसले यांनी घटनास्थळी भेट दिली. ओरोस येथील न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेचे पथक घटनास्थळी आले होते. त्यांनी घटनास्थळावरील नमुने तपासणीसाठी घेतले.

पत्नीच्या खुनाचाही होता आरोप
भारत मुरारी सकपाळ याच्या पत्नीचा २००७ मध्ये खून झाला होता. या खुनाचा आरोप भारत याच्यावर होता. पोलिसांनी त्याला अटकही केली होती. २०११ ला त्याची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली होती. त्याची मुले नातेवाईकांकडे असतात. आता त्यानेच आईसह भावाचाही खून केल्याची घटना घडली असल्याचे पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :crimeDevgad