Glaucoma Symptoms
Glaucoma Symptomsesakal

Eye Disease : 'काचबिंदूचे वेळेत निदान नाही झाले, तर कायमचे अंधत्व येऊ शकते!'

काचबिंदू (Glaucoma Symptoms) हा डोळ्याचा एक आजार (Eye Disease) आहे. यामध्ये आपल्या डोळ्याची नस (Optic Nerve) बाधित होते.
Published on
Summary

काचबिंदूचे वेळेत निदान नाही झाले तर कायमचे अंधत्व येऊ शकते. हा डोळ्याच्या धोकादायक आजारांपैकी एक आहे.

-डॉ. पल्लवी यादव, नेत्ररोगतज्ज्ञ, रत्नागिरी

काचबिंदू (Glaucoma Symptoms) हा डोळ्याचा एक आजार (Eye Disease) आहे. यामध्ये आपल्या डोळ्याची नस (Optic Nerve) बाधित होते. यामुळे दृष्टी कमकुवत होऊन आंधळेपणा येण्याची शक्यता असते. डोळ्याचा दाब वाढल्याने डोळ्याच्या नसाच्या मज्जातंतूंना हानी पोहोचते. त्यामुळे दृष्टी अधू होऊन आंधळेपणा येण्याची शक्यता असते. त्यामुळे दृष्टी हळूहळू अधू होऊ लागते.

डोळ्याच्या अशा परिस्थितीला काचबिंदू म्हणतात. काचबिंदूचे वेळेत निदान नाही झाले तर कायमचे अंधत्व येऊ शकते. हा डोळ्याच्या धोकादायक आजारांपैकी एक आहे. वेळेत निदान नाही झाले तर उपचाराअभावी दृष्टी गमावण्याची वेळ येऊ शकते; मात्र काचबिंदूचे योग्य आणि वेळेत निदान झाले, वेळेत व नियमित औषधोपचार केले तर दृष्टी टिकवता येते.

Glaucoma Symptoms
थंडीत वारंवार कोरडे होतात डोळे? या पद्धतींनी घ्या डोळ्यांची काळजी

सर्वात सामान्य प्रकारचा काचबिंदू आहे त्याला प्रायमरी ओपन अॅंगल ग्लुकोमा असे म्हणतात. यामध्ये डोळ्याची सभोवतालची दृष्टी (Peripheral Vision) हळूहळू कमी होते. क्वचितप्रसंगी डोके दुखणे, चष्म्याच्या नंबर सारखा बदलणे अशी लक्षणे आढळतात; पण बहुतांशी लोकांमध्ये काहीच लक्षणे दिसून येत नाहीत. नेत्रतज्ज्ञांकडे तपासणीसाठी गेले असता हा रोग लक्षात येतो. बऱ्याचवेळा जेव्हा लक्षणे आढळून येतात. त्या वेळी वेळ निघून गेलेली असते कारण, एकदा का नस कमकुवत झाली तर कोणत्याही उपचाराने दृष्टी परत मिळवता येत नाही. त्यामुळे काचबिंदूला दृष्टीचा मूकचोर (सायलेंट थीफ ऑफ व्हिजन) असेही म्हणतात

आपला रक्तदाब जसा असतो तसाच आपल्या डोळ्याचाही एक विशिष्ट दाब असतो. हा दाब साधारणपणे १०-२० मिमीएचजी(mmHg) या दरम्यान असतो. जर हा दाब वाढला तर डोळ्याच्या नसांचे तंतू (optic nerve fibers) हा दाब सोसू शकत नाहीत व हळूहळू हे तंतू निकामी होतात. या व्यतिरिक्त नेत्रतज्ज्ञ डोळ्याच्या नसाची तपासणी करतात. पेरीमेट्री, ओसीटी या चाचण्यांद्वारे नसाची तपासणी करून काचबिंदूचे मध्ये निदान करणे शक्य असते. या सर्व चाचण्यांद्वारे काचबिंदूचे निदान झाल्यावर औषधोपचार सुरू करणे गरजेचे असते. या औषधांमुळे डोळ्यातला दाब कमी केला जातो त्यामुळे डोळ्याच्या नसांवर होणारा दुष्परिणाम थांबवू शकतो.

Glaucoma Symptoms
Health News : घोरण्याची कारणे नक्की आहेत तरी काय? जाणून घ्या

मात्र, ही औषधे डोळ्यात कायमस्वरूपी व सांगितलेल्या वेळेनुसार घालणे अतिशय गरजेचे असते. त्याचबरोबर नेत्रतज्ज्ञांकडून सांगितल्याप्रमाणे वेळोवेळी तपासण्या (follow up) करून घेणे गरजेचे असते. क्वचितप्रसंगी गरज पडल्यास म्हणजेच डोळ्याचा दाब गरजेप्रमाणे कमी न झाल्यास अथवा डोळ्याच्या नसांचे लोप पावणे थांबत नसल्यास औषधोपचारांमध्ये बदल केला जातो. क्वचितप्रसंगी जर औषधोपचाराने डोळ्याचा दाब कमी होत नसेल तर काचबिंदूसाठी शस्त्रक्रिया करण्याची गरज लागते.

काचबिंदू हा मोतीबिंदूपेक्षा कमी प्रमाणात आढळतो तरी देखील काचबिंदूमध्ये जास्त जागरूकता व अधिक काळजी घेणे गरजेचे असते कारण, काचबिंदूमुळे गेलेली दृष्टी परत मिळवता येत नाही. जेवढी दृष्टी शिल्लक आहे तेवढी टिकवून ठेवणे एवढेच आपल्या हातात राहते. काही काचबिंदूमध्ये पुढील लक्षणे आढळतात. धूसर दिसणे, प्रकाशाभोवती इंद्रधनुष्यासारखे वलय दिसणे, डोळे दुखणे, उलट्या होणे यासारखी लक्षणे आढळतात त्याला अक्युट अॅंगल ग्लुकोमा असे म्हणतात. यामध्ये तातडीचे उपचार करून डोळ्याचा दाब कमी करावा लागतो व त्यामुळे दाब परत वाढू नये म्हणून नियमित औषधोपचार चालू ठेवावा लागतो.

Glaucoma Symptoms
Women Health News : स्त्रियांमध्ये उद्भवणारा श्वेतप्रदर अर्थात अंगावरून पांढरे जाणे; जाणून घ्या लक्षणे

जर आपल्या आई-वडील अथवा भावंडांना काचबिंदू असेल तर अशा लोकांमध्ये काचबिंदू होण्याचा धोका संभावतो. त्याचप्रमाणे स्टिरॉईडसचे दीर्घकाळ सेवन केले, ऱ्हस्व दृष्टी असल्यास, मधुमेह व उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींमध्ये काचबिंदू होण्याचा धोका संभावतो. अशा व्यक्तींनी नियमितपणे नेत्रतज्ञांकडून तपासून घेणे गरजेचे आहे आणि काचबिंदू आढळल्यास नेत्रतज्ञांच्या सल्ल्यानुसार तपासण्या व उपचार करणे गरजेचे आहे. नियमित तपासणी व चाचण्या करून नेत्रतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार चालू ठेवल्यास काचबिंदूवर नियंत्रण मिळवता येते आणि दृष्टीचे रक्षण करता येते.

(डॉ. चिरायू हॉस्पिटल, रत्नागिरी येथे नेत्ररोग तज्ज्ञ आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com