Konkan Tourism
Konkan Tourismesakal

Konkan Tourism : समृद्ध पक्षीजीवनातून पर्यटन व्यवसायाला मोठी संधी!

अभिरूचीसंपन्न जीवनशैलीमध्ये पक्षीनिरीक्षण अधिकाधिक लोकांच्या आवडीचा छंद तसेच अभ्यासाचा विषय झाला आहे.
Summary

सावंतवाडीतील व्यासंगी पक्षी अभ्यासक प्राध्यापक डॉ. गणेश मर्गज यांनी केलेल्या १७ वर्षांच्या अभ्यासातून सिंधुदुर्गात ४०९ प्रकारचे पक्षी आढळत आहेत.

-राजीव लिमये कर्ले, रत्नागिरी (Rajeev.limaye१९५७@gmail.com)

अभिरूचीसंपन्न जीवनशैलीमध्ये पक्षीनिरीक्षण अधिकाधिक लोकांच्या आवडीचा छंद तसेच अभ्यासाचा विषय झाला आहे. बर्डिंग आणि बर्ड फोटोग्राफीची आवड झपाट्याने वाढत आहे. निसर्गप्रेम, पर्यावरणाविषयी संवेदनाशीलता हे याचे विलोभनीय पैलू आहेत. कोकणच्या (Konkan) पक्षीवैविध्याचा कल्पकतेने, येथील पर्यटन वाढवण्यासाठी उपयोग करता येईल. रत्नागिरी जिल्ह्यात मोजक्याच जाणकार व्यक्तींनी याचा व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी उपयोग केला आहे. यामध्ये अजूनही अगणित संधी कशा आहेत, याची पक्षीनिरीक्षकांशी बोलून घेतलेली नोंद.

पक्षीनिरीक्षणामध्ये पक्ष्यांची घरटी बांधण्याच्या विशिष्ट जागा, झाडे, ते कूठून येतात, त्यांची नावे, प्रकार, वैशिष्ट्ये, त्यांचे वेगवेगळे आवाज असे अनेक बारकावे जाणकार पक्षी अभ्यासक उलगडतात. गुहागर तालुक्यातील आबलोली गावामधील एक होम स्टे खास पक्ष्यांसाठी खूपच लोकप्रिय झाले आहे. चिपळूणमधील (Chiplun) एक खासगी जंगलही यासाठी लोकप्रिय आहे. माचाळ परिक्षेत्रातील गावेही आता ठळकपणे पक्षीनिरीक्षण गावे म्हणून मान्यता पावत आहेत. अशा काही गावांनी रोजगारासाठी मधुमक्षिकापालनाची जोड खादी ग्रामोद्योग खात्याच्या सहकार्यातून दिली आहे.

Konkan Tourism
Women Health News : स्त्रियांमध्ये उद्भवणारा श्वेतप्रदर अर्थात अंगावरून पांढरे जाणे; जाणून घ्या लक्षणे

ही ठळक उदाहरणे, पक्षीनिरीक्षणावर आधारित रिसॉर्ट, होम स्टे व्यावसायिकदृष्ट्या यशवी होऊ शकतात, ही बाब अधोरेखित करतात. रत्नागिरीच्या प्रसाद गोखल्यांसारखे जाणकार सांगतात, पक्षीनिरीक्षक, बायोडायव्हर्सिटी असलेल्या पारंपरिक बागांमध्ये अशी सुविधायुक्त पक्षीनिरीक्षण केंद्रे पर्यटकांना नक्कीच आकर्षित करतील. पर्यटकांना पक्षीनिरीक्षणासाठी आचारसंहिता, पर्यावरणाविषयी जागरूकता, पक्षीजीवनाविषयी संवेदनाशीलता या विषयी जाणीवपूर्वक माहिती दिली पाहिजे, असा त्यांचा आग्रह आहे. पक्षीजीवनाची आवड असणाऱ्या तरुणांना रिसॉर्ट किंवा होमस्टे सुरू करण्यास चांगला वाव आहे. पक्षीनिरीक्षणातील गाईड तसेच यशस्वी उद्योजक होण्यासाठी पक्ष्यांविषयी आत्मियता, पक्षीजीवनपद्धतीविषयी जाण हवी याबरोबर कोकणातील वृक्षसंपदेविषयी सखोल माहिती करून घ्यावी, असे गोखलेंसह या विषयातील जाणकार योगेश पेडणेकर सांगतात.

कोकणातील पक्षीवैविध्याविषयी माहिती देताना ते स्थलांतरित पक्षी कोकणच्या समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या तीन-चार प्रकारच्या सीगल्सचे त्याचबरोबर सॅन्डपायपर, फ्लोव्हर्स प्रजातीचे पक्षी, तीन-चार जातीचे टर्न प्रजातीचे पक्षी अशी विविध उदाहरणे देतात. त्याचबरोबर खाडीपट्ट्यात नॉर्दन शॉव्हेलर, नॉर्थन पीनटेल, गार्गेनी, कॉमन टील असे स्थलांतरीत बदक प्रजातीचे पक्षी आढळून येतात. रत्नागिरी भागामध्ये पावसाळ्यामध्ये दिसणारा तांबोटी खंड्या, नीलकर्णी खंड्या असे विविध खंड्या पक्षी आढळतात. त्याचबरोबर खंड्यांपैकी स्टॉर्क बाइल्ड किंगफिशर, पाइड किंगफिशर, कॉमन किंगफिशर, ओरिएंटल ड्वार्फ किंगफिशर, ब्लू इअर्ड किंगफिशर, व्हाइट थ्रोटेड किंगफिशर असे वैविध्य आढळते. तीन प्रकारचे धनेशही दिसतात. खाडीपट्ट्यामध्ये ओहोटीच्या वेळी शिकारीसाठी येणारा ब्लॅककॅप्ड किंगफिशरही तुरळक का होईना; परंतु दिसतो.

Konkan Tourism
'तडीपार अंतू आयुष्य जगून गेला, अनेक भलीबुरी कामं केली; पण..'

पावसाळ्यात कोकणच्या कातळसड्यांवर फुलणाऱ्या विविधरंगी फुलांबरोबर पक्षीदेखील विपुल असतात. कातळ सड्यांवर येणाऱ्या स्थलांतरीत पक्ष्यांमध्ये पेरेग्रिन फाल्कन हा शिकारी पक्षी युरेशियन हॉबी, अमूर फाल्कन, मार्श हॅरियर, पॅलिड हॅरियर, मोन्टेग्यू हॅरियर, कॉमन बझार्ड, बुटेड ईगल अशा प्रकारचे येणारे विविध पक्षी महत्वाचे आहेत. त्याचबरोबर सड्यावर आढळणारी जैवविविधता यामध्ये सोनेपे सुहागा ठरते. सोशिएबल लॅपविंग या दुर्मिळ पक्ष्याची रत्नागिरीमध्ये २०२२ ला नोंद झाली आहे. रत्नागिरीतील पाणथळ जागी असेच पक्षीवैविध्य आढळते. खाडीचे भरती-ओहोटीच्या दलदलीच्या क्षेत्राच्या अधिवासामध्ये ग्लॉसी आयबिस, ब्लॅकहेडेड आयबिस, बगळे जातीतील विविध प्रजाती आढळून येतात.

सावंतवाडीतील व्यासंगी पक्षी अभ्यासक प्राध्यापक डॉ. गणेश मर्गज यांनी केलेल्या १७ वर्षांच्या अभ्यासातून सिंधुदुर्गात ४०९ प्रकारचे पक्षी आढळत असून, धामापूर लेक, शिरोडा सॉल्ट पॅन्स, मॅन्ग्रुव्ह वने आदी पाणथळ स्थळांच्या ठिकाणी १५४ प्रकारचे पक्षी आढळतात, अशी नोंद केली आहे. लांजा तालुक्यातील लघुपाटबंधारे धरण क्षेत्रातील जैवविविधतेचा, पक्षीजीवनाचा अभ्यास तेथील कॉलेजचे प्रोफेसर लवाटे यांनी केला. तेथे जंगली प्राणीही आढळले आहेत. अशा व्यासंगी प्राध्यापकांकडून कोकणातील बायोलॉजी झूलोजीचे विद्यार्थी आणि हौशी पक्षीनिरीक्षकांनी जरूर प्रेरणा घ्यावी. पक्षीवैविध्य आणि जैवविविधतेने समृद्ध असणारी ठिकाणे समाजाच्या सहभागाने संरक्षित करणे महत्वाचे असल्याचे मत निसर्गसोबतीच्या संस्थापिका निकिता शिंदे व्यक्त करतात. अशा संरक्षित ठिकाणांमध्ये पक्षीनिरीक्षणासाठी पर्यटकांना नियंत्रित प्रवेश दिल्यामुळे पक्षीजीवन बहरून शाश्वत पर्यटनाला चालना मिळेल, असे त्यांचे प्रतिपादन आहे.

Konkan Tourism
Eye Disease : 'काचबिंदूचे वेळेत निदान नाही झाले, तर कायमचे अंधत्व येऊ शकते!'

अशा प्रकारे काही ठिकाणे शासनाच्या मदतीने संरक्षित, नियंत्रित करून स्थानिक पर्यटन उद्योजकांनी आपले हितसंबंध जपावेत. वनखात्याचे मॅन्ग्रुव्ह सेलच्या अखत्यारित असलेल्या मॅन्ग्रुव्ह वनांमधील ठराविक भागात अनुमतीने वॉटरसफारी आयोजित करण्याचा विचार व्हावा, असे त्या सुचवतात. जैवविविधतेने समृद्ध असणाऱ्या खाडी व धरण क्षेत्रांमध्ये वॉटरस्पोर्टस् साहसी पर्यटन यावर बंधने रेग्युलेशन असणे हितकारक असल्याचे निसर्गप्रेमींचे मत आहे. या विचारसणीला दुजोरा देताना भाट्ये खाडीच्या मुखाजवळील मॅन्ग्रुव्हचे बेट सागरी संरक्षित क्षेत्रात समाविष्ट करावे जेणेकरून त्या ठिकाणच्या जैवविविधतेचा, पक्षीजीवनाचा अभ्यास आणि संवर्धन तसेच नियंत्रित पर्यटनाद्वारे स्थानिकांसाठी रोजगार निर्मितीकरिता उपयुक्त ठरेल, असे मत डॉ. केतन चौधरी यांनी व्यक्त केले. राज्य शासनाचे लघु पाटबंधारे खाते, वनखात्यातील वन्यजीवन विभाग आणि पर्यटन खाते या तिघांनी एकत्रितपणे पर्यटनवृद्धीसाठी प्रोत्साहन योजना आखावी.

नैसर्गिक पाणवठ्याच्या जागी धरणक्षेत्रांमध्ये अनेक पक्षी येत असतात. कृत्रिम पाणवठ्याच्या जागा निर्माण करून त्या ठिकाणी येणाऱ्या पक्ष्यांच्या निरीक्षणाकरिता सोइस्कर हाईड्स निर्माण केल्यास पर्यटकांसाठी पक्षीनिरीक्षणाकरिता अनुकूल ठरतील. खाडीपट्ट्यांमध्ये असणारी विविधता दाखवण्यासाठी पर्यटकांना बोटिंगने नेता येईल. खाडीतील कांदळवनामध्ये असणारे पक्षीजीवन पक्षीप्रेमी पर्यटकांना आकर्षित करेल. रत्नागिरी शहराच्या जवळच्या कर्ले खाडीतील जलपर्यटनामध्ये संजीव लिमये कांदळवनामधील पक्षीजीवनाची झलक दाखवतात. ऑर्निथॉलॉजी म्हणजे पक्षीशास्त्रातील अल्पमुदतीचे कोर्सेस बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी आयोजित करते. येथील ऑटोनॉमस महाविद्यालयांनी, शिक्षणसंस्थानी अशाप्रकारचे शॉर्ट टर्म कोर्सेस सुरू केल्यास विद्यार्थ्यांना माहिती मिळून तयार झालेल्या जाणिवांतून पर्यटन व्यवसायाकडे वळण्यास मदत होईल. याकडे हॉटेल व्यावसायिक सुनील वणजू यांनाही वाटते.

Konkan Tourism
Health News : पित्ताअभावी अन्नपचन अशक्य असतं!

जलपर्यटनात, खाड्यांमध्ये, खाजणक्षेत्रात फोटोग्राफीसाठी उपयुक्त अशा सपाट तळ असलेल्या बोटी आवाज टाळण्यासाठी वल्हवल्या जाणाऱ्या मानवचलित नौका सुरक्षासाधनांसह उपलब्ध करणे महत्त्वाचे ठरते, असे साहसी बोटींचे जाणकार व्यावसायिक आदेश चव्हाण सुचवतात. पक्षी निरीक्षणाच्या सुविधा उपलब्ध झाल्यावर मोठ्या शहरातील टूर ऑर्गनायझर्स, प्रवासी कंपन्या कोकणच्या प्रवास नियोजनात पक्षीनिरीक्षणाचा समावेश करू शकतील. यामुळे चोखंदळ पर्यटक तीन-चार दिवस येथे राहण्यासाठी प्रवृत्त होईल. जिल्हा पर्यटन आराखड्यामध्ये अशा नवीन आयामांचा विचार व्हावा.

(लेखक पर्यटन क्षेत्राचे अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com