सिंधुदुर्गच्या विकासासाठी सदैव तत्पर

सिंधुदुर्गच्या विकासासाठी सदैव तत्पर
Published on: 

६११६३

सिंधुदुर्गच्या विकासासाठी सदैव तत्पर
पालकमंत्री राणेंची ग्वाहीः सिंधुदुर्गनगरीत जिल्हावासीयांना महाराष्ट्र दिनाच्या शभेच्छा
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २ः सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जिल्हावासियांचे जीवनमान सुकर करण्यासाठी मी पालकमंत्री म्हणून सदैव तत्पर राहीन, अशी ग्वाही राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली. महाराष्ट्र राज्याच्या ६६ व्या स्थापना दिनानिमित्त सिंधुदुर्गनगरी येथील पोलिस परेड ग्राऊंडवर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात जिल्हावासीयांना शुभेच्छा देताना ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी आरती देसाई उपस्थित होते. ध्वजारोहणानंतर जिल्हा पोलीस दल (पुरुष), जिल्हा पोलीस दल (महिला), होमगार्ड (पुरुष व महिला), संयुक्तीक बँड पथक, श्वान पथक यांचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पोलीस बॅन्ड पथकाने राष्ट्रगीत व राज्यगीत वाजविले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत यांनी केले.
पालकमंत्री राणे यांनी आपल्या संदेशात प्रधानमंत्री आवास योजनेच्या उद्दिष्ट मंजूरी व हप्ता वितरण लक्षांक पूर्ततेमध्ये आपला जिल्हा राज्यात प्रथम स्थानी राहिलेला आहे. जिल्ह्यातील ९४ हजार विद्यार्थ्यांचे अपार आयडी अंतर्गत आयडी काढण्यात आले असून यामध्ये देखील आपला जिल्हा प्रथमस्थानी आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योग योजनेअंतर्गत ९० वैयक्तिक लाभार्थी तर १६१ गट लाभार्थी प्रकल्पांना १८ कोटी ४१ लाखांचे कर्ज मंजूर करण्यात आलेलं आहे. २०२४-२५ वर्षामध्ये प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात प्रथम व देशात व्दितीय क्रमांकावर आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात सिंधुदुर्ग जिल्हा वार्षिक योजनेच्या निधी खर्चात राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी २०२५-२०२६ या वर्षांसाठी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण योजनेत २८२ कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर केला आहे, असे सांगितले.
ते पुढे म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील नागरिकांच्या आणि विशेषत: महिलांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य राहणार आहे. जिल्ह्यात काम करत असताना सर्वांनी पारदर्शक आणि लोकाभिमुख काम करावे. दरडोई उत्पन्नामध्ये राज्यातील पहिल्या ५ जिल्ह्यामध्ये आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश व्हावा यासाठी विकासात्मक कामांना मी नेहमीच प्राधान्य देणार आहे. पर्यटन वाढीबरोबरच रोजगाराच्या विविध संधी निर्माण करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात मोबाईल नेटवर्क सक्षम करण्यासाठी देखील अधिकचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या संकल्पनेनुसार राज्यात शंभर दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रम सुरु आहे. आपल्या जिल्ह्यातही या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात स्वच्छतेची चळवळ अधिक प्रभावी करण्यासाठी जिल्हा परिषद ‘कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू’ हे विशेष अभियान राबवत आहे.’’

चौकट
लोकाभिमुख निर्णय
राज्याचा मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री म्हणून काम करत असताना अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत. मत्स्यव्यवसायाला आता कृषीचा दर्जा मिळणार असल्याने या ऐतिहासिक आणि क्रांतीकारी निर्णयामुळे माझ्या मच्छिमार बांधवांना कृषीप्रमाणे सर्व लाभ मिळणार आहेत. नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याचे जहाज बांधणी, जहाज पुनर्वापर धोरण मंजूर करण्यात आले आहे. जहाज उद्योगाविषयी धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. याचबरोबर लखपती दिदी योजनेअंतर्गत २८ हजार महिलांना लाभ मिळाला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकूण १ लाख ९४ हजार पात्र अर्ज जिल्हास्तरावरून राज्यास अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत. लेक लाडकी योजनेअंतर्गत १ हजार २४७ मुलींना लाभ देण्यात आला आहे, असेही मंत्री राणे म्हणाले. शालेय क्रीडा स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भूमी सावंत, अक्सा शिरगावकर, सुरज देसाई, दर्शन पडते या राष्ट्रीय खेळाडूंनी आपल्या जिल्ह्याचे नाव देशभरात गाजवले आहे याचा अभिमान आहे.

चौकट
जिल्ह्यातील प्रकल्पांना चालना
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून एस.टी. कार्यशाळेत ९० जणांना अप्रेंटीस म्हणून नियुक्ती मिळाली आहे. दहिबाव अन्नपूर्णा योजनेच्या दुरुस्तीसाठी साडेनऊ कोटींचा तर सिंधुदुर्ग तसेच इतर किल्ल्यांचा इतिहास जगासमोर आणण्यासाठी देखील निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. वन्यप्राण्यांपासून होणारा उपद्रव रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. चिपी विमानतळ विद्युतीकरणासाठी २ कोटी ३७ लाखांची तरतूद करण्यात आली असून आता विमानतळावर नाईट लँडींग देखील शक्य होणार आहे. कणकवली तहसिल कार्यालयाने ''शाळा तेथे दाखले'' या नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत जवळपास ५०० पेक्षा जास्त दाखल्यांचे वाटप केलेले आहे. जिल्ह्यात शिवडाव येथे जैविक कोळसा निर्मितीबाबतचा प्रकल्प उभा केलेला असून या प्रकल्पामध्ये जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील ७० महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत ३२ पात्र विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे, असे यावेळी मंत्री राणे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com