महाड बस आगाराची रखडपट्टी
महाड बस आगाराची रखडपट्टीSakal

Raigad News : मुंबई-गोवा महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाड बस आगाराची रखडपट्टी

एका बाजूला नव्या इमारतीचे काम रखडले आहे, तर दुसरीकडे प्रवासी व कर्मचाऱ्यांना जुन्या धोकादायक इमारतीत वावरावे लागत असल्‍याने दररोज असुविधांचा सामना करावा लागतो. महाड बसस्थानक व आगाराची इमारत पन्नास वर्षे जुनी आहे.

महाड : मुंबई-गोवा महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाड एसटी आगाराच्या नव्या इमारतीचे काम सहा वर्षांपासून सुरू असून अद्याप पूर्ण झालेले नाही. त्‍यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.

एका बाजूला नव्या इमारतीचे काम रखडले आहे, तर दुसरीकडे प्रवासी व कर्मचाऱ्यांना जुन्या धोकादायक इमारतीत वावरावे लागत असल्‍याने दररोज असुविधांचा सामना करावा लागतो.
महाड बसस्थानक व आगाराची इमारत पन्नास वर्षे जुनी आहे.

बसस्थानकाच्या इमारतींमध्ये असणारे उपहार गृह, बुक स्टॉल, स्नॅक्स दुकाने, आरक्षण कक्ष, कर्मचारी कक्ष तसेच चालक व वाहक यांच्यासाठी विश्रामगृह या इमारतीत आहेत. परंतु आता ही इमारत धोकादायक बनली आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील महाड आगार व बस स्थानक हे मध्यवर्ती ठिकाण आहे. स्थानकातून दररोज शेकडो गाड्यांची ये-जा होते. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई तसेच विविध ठिकाणी जाणाऱ्या बस या ठिकाणी थांबतात.

रायगड किल्ला, शिवथरघळ आणि चवदार तळे या स्थळांना भेट देण्यासाठी वर्षभर लाखो पर्यटक महाडमध्ये येत असतात. महाड आगारात गाड्यांचीही दुरुस्ती होत असते. परंतु आगाराची जुनी इमारत धोकादायक झाल्याने प्रवासी व कर्मचाऱ्यांच्या जिवास धोका निर्माण झाला आहे.

इमारतीचे बांधकाम नव्याने करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर सहा वर्षांपूर्वी नव्या इमारतीचे भूमिपूजन तत्कालीन खासदार अनंत गीते यांच्या हस्ते करण्यात आले.
नव्या इमारतीच्या बांधकामासाठी चार कोटी ४७ लाख रुपये अंदाजित खर्च असून चांगल्या दर्जाचे बसस्थानक व आगाराची इमारत या ठिकाणी होणार आहे.

परंतु ठेकेदाराला उर्वरित रक्कम व त्याने केलेल्या कामाची रक्कम मिळत नसल्याने काम कधी ठप्प तर कधी संथ गतीने सुरू आहे. एका बाजूला सरकार स्वच्छ व चांगल्या बस स्थानकासाठी लाखो रुपयांची बक्षीस योजना जाहीर करत आहे परंतु दुसरीकडे अपूर्णावस्‍थेत असलेल्‍या बस स्थानकांच्या बांधकामासाठी निधी पुरवला जात नाही.

विश्रामगृहाची दुरवस्‍था

महाड बसस्थानक व आगाराची सद्यःस्थितीतील इमारत जुनी, जीर्ण झाल्‍याने धोकादायक बनली आहे. या धोकादायक इमारतीमध्येच कर्मचाऱ्यांना आपली कामे करावी लागत आहेत. दररोज हजारोंची वर्दळ असलेल्‍या प्रवाशांनाही गाड्यांची वाट पाहत याच स्थानकात ताटकळत राहावे लागते. याच इमारतींमध्ये चालक, वाहकांसाठी विश्रांती गृह आहे, परंतु त्याचीही दुरवस्था झाली आहे.

नवीन बांधकाम मुंबईतील अभियांत्रिकी विभागाकडे

नवीन इमारत बांधली जाणार असल्याने जुन्या इमारतीच्या देखभाल व दुरुस्तीवर खर्च करण्यास महामंडळ तयार नाही. नव्या इमारतीचे बांधकाम मुंबईतील एसटी अभियांत्रिकी विभाग यांच्याकडे आहे. मात्र सहा वर्षांपासून काम रखडल्‍याने आणखी किती वर्षे वाट पाहावी लागणार, असा प्रश्‍न प्रवासी तसेच कर्मचारी वर्गाला पडला आहे. याबाबत तेथील उपअभियंत्‍यांशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.

आगारातील रेलचेल

दररोजच्या फेऱ्या - २७६
चालक, वाहक - १९०
प्रवासी संख्या - ८०००
उत्पन्न - सव्वा पाच लाख
बस संख्या - ६२
लांब व मध्यम पल्ल्याच्या गाड्या - ३४

महाड एसटी आगारातून दररोज हजारो नागरिक प्रवास करतात. यात विद्यार्थी, कामगारांसह पर्यटक, लांबपल्‍ल्‍याच्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. सध्या आगाराची दुरुस्ती सुरू असून प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी बांधकाम विभागाला सूचना केल्‍या आहेत. तसेच नवीन इमारतीच्या कामाबाबतही पत्रव्यवहारही सुरू आहे.
- दीपक घोडे, वाहतूक नियंत्रक, रामवाडी-पेण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com