सावधान ! पर्यटक व्यावसायिकांना बसणार 'हा' झटका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

घरगुती विजेचा वाणिज्यिक वापर; महावितरण करणार तपासणी, दोषी आढळल्यास दुप्पट दंड आकारणीची तरतूद 

गुहागर (रत्नागिरी) : महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या न्याहारी आणि निवास योजनेद्वारे पर्यटन व्यवसाय करणाऱ्यांना विजेचा झटका बसण्याची शक्‍यता आहे. घरगुती व्यवसाय दाखवून ज्यांनी स्वतंत्र निवासी संकुले उभारली आहेत, अशा व्यावसायिकांचे वीज वापर वाणिज्यिक आहेत का, याची तपासणी महावितरण करणार आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटकांची संख्या वाढू लागल्यावर त्यांची निवास आणि जेवणाखाणाची व्यवस्था करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. विशेषत: समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या गावांमध्ये असे व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू झाले. अनेकांनी पूर्वीच्या काळी असलेल्या गोठ्यांचे रुपांतर सुसज्ज इमारतीमध्ये केले. काहींनी आपल्या राहत्या घराच्या माळ्यावर आकर्षक खोल्यांचे बांधकाम केले.

हेही वाचा- खेडच्या भूमीवर पाय ठेवला अन्‌ ; तीला जग जिंकल्याचा आनंद झाला...

पर्यटकांचा निवास सुखकर व्हावा...

काहींनी तर घराशेजारील परसावात चिरेबंदी बांधकामे करून निवासाची व्यवस्था उभी केली. पर्यटकांचा निवास सुखकर व्हावा, म्हणून आकर्षक प्रकाश व्यवस्थेसह ए. सी., फॅन, छोटा फ्रीज, पाणी तापविण्यासाठी गिझर आदी विद्युत उपकरणांचा वापर केला गेला. या सुखसोयीमुळे पर्यटकांची संख्या वाढली. स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला. परंतु आता महावितरणची वक्री नजर याच पर्यटन व्यावसायिकांवर पडली आहे. घरगुती मीटरच्या आधारावर वाणिज्यिक वापर करणाऱ्या पर्यटन व्यावसायिकांचे वीज मीटर तपासण्याची व्यवस्था महावितरण करत आहे. 

हेही वाचा- लोकमान्यांच्या या  पत्राची होतेय शताब्दी...

त्यावर दुप्पट दंड आकारणी केली जाणार 
घरगुती वापरापेक्षा वाणिज्यिक वापराचा महावितरणचा दर तिप्पट आहे. वीज मीटरचा वाणिज्यिक वापर ज्या महिन्यापासून सुरू झाला असेल, त्या महिन्यापासून आजपर्यंतचे युनिट महावितरण गृहीत धरणार आहे. तसेच त्यावर दुप्पट दंड आकारणी केली जाणार आहे. त्यातून ग्राहकाने भरलेल्या रक्कमेची वजावट करून बिल दिले जाणार आहे. त्यामुळेच पर्यटन व्यावसायिकांना वीजबिलांचा मोठा झटका बसण्याची शक्‍यता आहे. 

हेही वाचा- तो सारखा करत होता युवतीचा पाठलाग शेवटी...
 
कायद्यानुसार वीज वापरणे आवश्‍यक

केवळ पर्यटन व्यावसायिक महावितरणचे लक्ष्य नाही. जे ग्राहक वीजचोरी करत असतील, विजेचा गैरवापर करत असतील, त्यांच्यावर कारवाई करणे, हे महावितरणचे नित्याचे काम आहे. सर्वच ग्राहकांनी कायद्यानुसार वीज वापरणे आवश्‍यक आहे. 
-गणेश गलांडे, उपकार्यकारी अधिकारी महावितरण, गुहागर  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tourism business commercial use of domestic electricity in guhagar koakn marathi news