मालवणात उलटली पर्यटक नाैका; मुंबईतील वृद्धा ठार

प्रशांत हिंदळेकर
Thursday, 5 December 2019

ठाणे कल्याण येथील पर्यटकांचा एक समूह देवबाग येथे पर्यटनासाठी दाखल झाला होता. आज सकाळी हे पर्यटक नौकाविहार करण्यासाठी देवबागच्या खाडीत उतरले होते. सकाळपासून वार्‍याचा जोर वाढला होता. यात देवबाग संगम येथे वार्‍यामुळे नौका एका बाजूला उलटली.

मालवण ( सिंधुदुर्ग ) - तालुक्यातील देवबाग संगम खाडीपात्रात नौकाविहार करताना वार्‍यामुळे नौका एका बाजूला कलंडल्याने ती उलटून नौकेतील नऊ पर्यटक पाण्यात फेकले गेले. स्थानिक मच्छीमारांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत सर्व पर्यटकांना बाहेर काढत उपचारासाठी मालवणातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या दुर्घटनेत माया आनंद माने ( वय- 60, रा. आंबिवली, कल्याण) या महिला पर्यटकाचा उपचारापूर्वी मृत्यू झाला. तर अनया अमित अडसुळे (वय - 3, रा. बदलापूर) हिची प्रकृती गंभीर झाली होती. मात्र उपचारानंतर तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ही घटना दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या दरम्यान घडली. 

याबाबतची माहिती अशी - ठाणे कल्याण येथील पर्यटकांचा एक समूह देवबाग येथे पर्यटनासाठी दाखल झाला होता. आज सकाळी हे पर्यटक नौकाविहार करण्यासाठी देवबागच्या खाडीत उतरले होते. सकाळपासून वार्‍याचा जोर वाढला होता. यात देवबाग संगम येथे वार्‍यामुळे नौका एका बाजूला उलटली. त्यामुळे नौकेतील माया आनंद माने (60 रा. आंबिवली कल्याण), लता बाळासाहेब शीलवंत ( रा. डोंबिवली मानपाडा ), नंदा विलास अडसुळे ( रा. बदलापूर ), अनया अमित अडसुळे ( 3, रा. बदलापूर), विहान विशाल अडसुळे (3), सांची विशाल अडसुळे ( 6), स्वाती अडसुळे, अमित अडसुळे, संघमित्रा विशाल अडसुळे हे नऊजण पाण्यात फेकले गेले. हा प्रकार लक्षात येताच स्थानिक मच्छीमारांनी घटनास्थळी धाव घेत या सर्वांना पाण्याबाहेर काढत उपचारासाठी रुग्णवाहिकेतून शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. यात माया माने या वृद्ध महिला पर्यटकाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. यातील अनया अडसुळे या लहान मुलीची प्रकृती गंभीर बनल्याने तिला तसेच विहान व सांची या मुलांना बालरुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. उपचारानंतर अनया अडसुळे हिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. 

हेही वाचा - बेधडक ! हातकणंगले तहसिलने घेतली २१ वहाने ताब्यात 

लाईफ जॅकेट असूनही...

मृत्यू पावलेल्या माया माने हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे. नौकाविहार करताना या सर्व पर्यटकांनी लाईफ जॅकेट घातले होते. त्यानंतरही पाण्यात पडून पोटात पाणी गेल्याने ते अत्यवस्थ बनले. या दुर्घटनेत महिलांचे दागिने पाण्यात वाहून गेल्याची माहिती मिळाली. 
या दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, पंचायत समिती सदस्य मधुरा चोपडेकर, ग्रामसेवक युवराज चव्हाण, मनोज खोबरेकर, देवानंद चिंदरकर, विकास ताम्हणकर, राजन कुमठेकर, सहदेव साळगावकर, वैभव खोबरेकर, जयेश राऊळ, दादा सातोसकर, कांचन खराडे, अन्वय प्रभू, गौरव प्रभू, मनोज चोपडेकर, बाबली चोपडेकर, रमेश कद्रेकर यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी रुग्णालयात धाव घेत मदतकार्यात सहकार्य केले. 

हेही वाचा - तरुण चढला झाडावर अन्... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tourist Boat Accident In Malvan Old Woman Dead