esakal | पर्यटकांनी घेतला कोरोनाचा धसका ; गणपतीपुळेत 30 टक्केच प्रतिसाद
sakal

बोलून बातमी शोधा

tourist decred in konkan ratnagiri due to corona fear

रत्नागिरी तालुक्‍यातील गणपतीपुळे पर्यटनस्थळावर तुलनेत तीस टक्‍केच पर्यटकांचा राबता सुटीत दिसून आला.

पर्यटकांनी घेतला कोरोनाचा धसका ; गणपतीपुळेत 30 टक्केच प्रतिसाद

sakal_logo
By
राजेश कळंबटे

रत्नागिरी : सलग तीन दिवस जोडून सुट्या आल्या तरीही कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या आणि लॉकडाउनची शक्‍यता वर्तविली गेल्याचा परिणाम कोकणातील पर्यटन व्यवसायावर झाला आहे. पर्यटकही सावध पवित्रा घेत असून चौकशी करूनच फिरण्यासाठी बाहेर पडत आहेत. रत्नागिरी तालुक्‍यातील गणपतीपुळे पर्यटनस्थळावर तुलनेत तीस टक्‍केच पर्यटकांचा राबता सुटीत दिसून आला.

राज्यातील काही जिल्ह्यात कोरोनाने डोके वर काढले आहे. कोरोना वाढू लागल्यामुळे भीतीचे चित्र निर्माण झाले असून त्याचा परिणाम पर्यटन व्यवसायावर झाला आहे. शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शासकीय सुटी होती. त्यानंतर शनिवार, रविवारी अशा सलग तीन दिवस जोडून सुट्या आल्या. पर्यटनासाठी हा दुग्धशर्करा योग होता; परंतु लॉकडाउनच्या भीतीने पर्यटकांकडून सावध पवित्रा स्वीकारण्यात आल्याचे दिसत आहे. कोरोनातील टाळेबंदी नोव्हेंबर महिन्यात उठली. त्यानंतर सुरवातीला जशी स्थिती होती तसंच काहीसं चित्र गणपतीपुळे पर्यटनस्थळावर पाहायला मिळत आहे. किनाऱ्यांवरील गर्दीही कमी झालेली आहे. 

हेही वाचा - मुख्यमंत्री कोरोना जाऊ देणार नाहीत; फक्त महाराष्ट्रात पसरतो कारण मुख्यमंत्री यांना घरीच बसायला आवडतं -

सुरवातीला ४ ते ५ हजार पर्यटक प्रतिदिन गणपतीपुळेत येत होते. त्यानंतर हा आकडा वाढला. चतुर्थीच्या दिवशी आठ हजार पर्यटकांची नोंद झाली. गेल्या चार दिवसांत पर्यटकांची संख्या रोडावली असून सध्या तीस टक्‍केच पर्यटक गणपतीपुळेत दाखल झाल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. लॉकडाउन केल्यानंतर किंवा बंधने आणल्यानंतर अडकून राहावे लागू नये यासाठी निवासव्यवस्थेची चौकशी करूनच पर्यटक मुक्‍कामासाठी येत आहेत. गणपतीपुळेत येणारा पर्यटक हा पश्‍चिम महाराष्ट्रातील आहे. दुचाकी, चारचाकी गाड्या घेऊन ते निवास न करताच निघून जात आहेत. मुंबई, पुण्यातील लोकांचा जोर ओसरलेला आहे.

"कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या बातम्या गेले चार दिवस सुरू आहेत. लॉकडाउनची शक्‍यता व्यक्‍त होत आहे. त्याचा परिणाम गणपतीपुळे पर्यटनस्थळावर झाला आहे. हॉटेल बंद आहे की सुरू, याची चौकशी केली जात आहे. पर्यटकांकडून सावध पवित्रा घेण्यात येत आहे."

- भालचंद्र नलावडे, हॉटेल व्यावसायिक

"लॉकडाउन उठल्यानंतर सुरवातीला किनाऱ्यावर तशी तुरळक गर्दी होती. तसेच काहीसे चित्र सध्या गणपतीपुळे किनाऱ्यावर आहे. पर्यटकांची गर्दी कमी झालेली आहे."

- किसन जाधव, व्यावसायिक

हेही वाचा -  कोकणात तीन धरणांसाठी 54 कोटींचा निधी -

संपादन - स्नेहल कदम