महामार्गाचे प्रलंबित प्रश्‍न सोडवण्याचे आदेश ; सामंतानी दिली प्रशासनाला डेडलाईन

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 November 2020

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या आढाव्याबाबत घेण्यात आलेल्या बैठकी दरम्यान त्यांनी या सूचना दिल्या.

ओरोस (रत्नागिरी) : कुडाळ तालुक्‍यामध्ये महामार्गाच्या मोबदल्याची सुमारे २३ प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यांचा प्रश्‍न डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मार्गी लावण्यासाठीचे नियोजन करा, अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या आढाव्याबाबत घेण्यात आलेल्या बैठकी दरम्यान त्यांनी या सूचना दिल्या.

यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, कोकण विभागाच्या उपायुक्त, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, कणकवलीच्या प्रांत वैशाली राजमाने, कुडाळच्या प्रांत वंदना खरमाळे, निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी जयकृष्ण फड यांच्यासह जिल्ह्यातील संबंधित अधिकारी उपस्थित होते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता नवले आणि सलिम शेख व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभागी होते.

हेही वाचा - बिबट्याची झलक कॅमेऱ्यात कैद

कुडाळ प्रांत कार्यालयात ४ डिसेंबरला शिबिर घ्यावे, अशी सूचना करून सामंत म्हणाले, ‘‘प्रश्‍न प्रलंबित असलेल्या लोकांना शिबिरासाठी निमंत्रण द्यावे. खासदार, आमदार, विभागीय आयुक्त, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व जिल्ह्यातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे. ठेकेदारासही बोलवले. या सर्व २३ लोकांचे म्हणणे ऐकून घेऊन जागेवरच त्यांचे प्रश्‍न मार्गी लावावेत. त्याने महामार्गाचे काम व्यवस्थित सुरू होईल. ही प्रकरणे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकू नयेत, यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत. रस्ता तातडीने पूर्ण व्हावा, ही माझी भूमिका आहे. शिबिरामध्येच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महामार्गाला जोडणारे रस्ते, घोडगे-सोनवडे मार्ग ज्या ठिकाणी महामार्गाला जोडणार आहे, त्या ठिकाणचा रस्ता व पावशी अंडरपास यासह बस थांब्यांबाबत अंतिम निर्णय घ्यावा.’’ 

यावेळी खासदार राऊत यांनी महामार्गात जमिनी गेलेल्या लोकांना मोबदला देण्याच्या कामाबाबत तातडीने निर्णय घेण्याच्या सूचना केल्या. कुडाळ प्रांत यांच्या जागी नवीन अधिकारी नेमावा, लोकांच्या तक्रारी हा गंभीर विषय असून त्याबाबत प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावेत. ठेकेदाराने काम थांबवले, तर त्याची जबाबदारीही जिल्हा प्रशासनाची राहील, असे स्पष्ट केले. आमदार वैभव नाईक यांनीही भूमिका मांडली.

हेही वाचा - सावधान! पन्हळे धरणाच्या भेगांचा आकार वाढतोय -

‘क्‍लिन चीट’चीही चौकशी करा

कुडाळ प्रांतांविरोधात तक्रार आल्यानंतर जिल्हास्तरावर अप्पर जिल्हाधिकारी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली होती. या समितीने कुडाळच्या प्रांत वंदना खरमाळे यांना क्‍लिन चीट दिली आहे. या चौकशी समितीने दिलेल्या ‘क्‍लिन चीट’चीही चौकशी करण्याच्या सूचना पालकमंत्री सामंत यांनी आज कोकण विभागाच्या उपायुक्त यांना दिल्या. महामार्गाच्या मोबदला वाटपाचीही संपूर्ण चौकशी करण्याच्या सूचनाही सामंत यांनी दिल्या.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: uday samant said complete working of highway in sindhudurg decision making in meeting