esakal | कोरोनाकाळात सोप्या व्यायामाने रहा स्वस्थ; हृदय आणि फुफ्फुस ठेवा तंदुरुस्त

बोलून बातमी शोधा

कोरोनाकाळात सोप्या व्यायामाने रहा स्वस्थ; हृदय आणि फुफ्फुस ठेवा तंदुरुस्त
कोरोनाकाळात सोप्या व्यायामाने रहा स्वस्थ; हृदय आणि फुफ्फुस ठेवा तंदुरुस्त
sakal_logo
By
सुयोग घाटगे

कोल्हापूर : कोरोनाचा संसर्ग वाढत असताना प्रत्येकाला स्वस्थ राहण्याची गरज आहे. यासाठी आहाराबरोबरच व्यायामालाही अधिक महत्त्व आहे. लॉकडाउन असतानाही आपण घरीच काही सोपे व्यायाम करून आपले शरीर अधिक कार्यक्षम आणि सुदृढ बनवू शकता. असेच काही सहज आणि सोपे व्यायाम ज्यामुळे हृदय आणि फुफ्फुस यांची कार्यक्षमता अधिक वाढेल. शिवाय, श्वसनाच्या त्रासापासून मुक्तता शक्‍य होईल. कोरोनापासून स्वतःला वाचविण्यासाठी याचा अधिक फायदा होईल.

हल्ली व्यायाम म्हटला, की आपल्यापैकी बहुतेकांच्या मनात जिम येते. अत्याधुनिक मशिन्स, डंबेल्स आदी व्यायामाची साधने आवश्‍यक आहेत, हे खरं; पण त्याशिवाय व्यायाम होऊच शकत नाही, असे नाही. घरी २० ते ३० मिनिटे नित्याने व्यायाम करून आपण कोरोनासारख्या रोगावरही मात करू शकतो. व्यायामाची सुरवात वॉर्मअपने करू शकता. यासाठी आपण शालेय जीवनापासून करीत आलेले कवायतीचे प्रकार करू शकता. मुख्यत्वेकरून पाय, खांदे, कंबर आणि मान मोकळी होईल, याकडे लक्ष द्या. यानंतर पारंपरिक व्यायामाच्या पद्धतीचा अवलंब अधिक फायदेशीर आहे. त्यात सूर्यनमस्कार सर्वोत्तम पर्याय आहे. सोबतच जोर-बैठका हा पर्याय ठरू शकतो. याही पुढे जात पुढील व्यायाम प्रकार हे अधिक प्रभावी आहेत.

हेही वाचा: मुंबई-गोवा हायवेवर 1 कोटी 60 लाखाची दारू जप्त

अपजंप

दोन्ही हात व पाय जुळवून उभे राहा. जागेवर उडी मारत हात खांद्याच्या रेषेला, तर पाय एकमेकांपासून लांब करीत बाहेर घ्या. पुन्हा उडी मारून पूर्वस्थितीत असे २० वेळा करा.

माउंटन क्‍लाइम्बर्स

नियमित मारणारे जोर थोडे रोचक आणि अधिक प्रभावी बनविण्यासाठी हा व्यायाम प्रकार आहे. पुशअप्स (जोर)पासून सुरवात करा. यानंतर प्रत्येक जोर मारताना एक पाय हाताजवळ आणा आणि परत तो होता त्या स्थितीत ठेवा. हा प्रकार पुन्हा दुसऱ्या पायासोबतही करा. हा प्रकार शक्‍य तितक्‍या वेगात करा.

लंग्ज (फुफ्फुस)

हा सर्वाधिक महत्त्वाचा आणि प्रभावी व्यायामप्रकार आहे. सरळ उभे राहत हात कमरेवर ठेवा. प्रथम उजवा पाय गुडघ्यात वाकवून पुढे न्या. गुडघा पायाच्या अंगठ्याच्या रेषेपेक्षा पुढे गेला पाहिजे. मागचा पाय गुडघ्यात थोडा वाकवा. पूर्वस्थितीत या आणि आता हीच क्रिया दुसऱ्या पायासोबत करा.

बिअर क्रॉल्स

पायात अंतर घेऊन पुशअप्स या पद्धतीने सुरवात करा. यानंतर डावा पाय आणि उजवा हात पुढे आणत एक स्टेप पुढे जा. आता उजवा पाय आणि डाव्या हाताने पुढची स्टेप घ्या. असे किमान २० वेळा करा.

हेही वाचा: लस घ्यायची आहे! पाहिला डोस, दुसरा डोस घेताना ही घ्या दक्षता

ज्येष्ठ नागरिकांनी करावयाचे व्यायाम

ज्येष्ठ नागरिकांच्या शारीरिक क्षमतेचा विचार केल्यास त्यांच्यासाठी कवायतीचे प्रकार अधिक फायदा आणि आराम देणारे आहेत. यात खडे कवायत प्रकार आणि बैठे कवायत प्रकार असे दोन प्रकारे हे करणे शक्‍य आहे. अधिकतर हाताच्या हालचालीच्या साहाय्याने श्वसनावर नियंत्रण आणि फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढविण्याचे काम होते.

"व्यायामातील सातत्याने कोणत्याही व्याधीवर नियंत्रण मिळविणे शक्‍य होते. म्हणूनच व्यायाम अधिक महत्त्वाचा आहे. कोरोनाच्या कालावधीत घरीच राहून हे सहज करता येणारे व्यायाम केल्यास याचा चांगला फायदा होईल. आपली शारीरिक क्षमता ओळखूनच व्यायाम करावा."

- अनुराधा भोसले, व्यायाम सल्लागार