कासवांचे गाव असणाऱ्या वेळासवर आता पोलिसांचे सुरक्षाकवच; मोहीम फत्तेच

कासवांचे गाव असणाऱ्या वेळासवर आता पोलिसांचे सुरक्षाकवच; मोहीम फत्तेच

मंडणगड (रत्नागिरी) : आरोग्ययंत्रणा आपले कर्तव्य पार पाडत असताना त्यांना मदतीचा हात देता यावा, म्हणून आता पोलिसांनी नागरिकांच्या निरोगी आरोग्यासाठी पुढाकार घेतला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांच्या संकल्पनेतून एक गाव दत्तक घेत बाणकोट सागरी पोलिसांनी वेळास येथील नागरिकांच्या शरीरातील ऑक्‍सिजन व तापमान तपासले.

कडक लॉकडाऊननंतरही ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, आता पोलिसांनीही आरोग्य यंत्रणेप्रमाणे घरोघरी जाऊन काम सुरू केले आहे. त्या आधी सर्व पोलिस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली आहे. बाणकोट सागरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उत्तम पिठे यांच्या टीमने बुधवारी (ता. 28) वेळास हे गाव दत्तक घेतले आहे. येथील दांडा परिसरातील ग्रामस्थांच्या घरी जाऊन ग्रामस्थांचे ऑक्‍सिजन व तापमान तपासले .कोरोना संदर्भातील सोशल डिस्टन्सिंग पाहणे, मास्क वापरणे, गावातील लोकांच्या कोरोना चाचण्या वाढवणे, कुणाला सर्दी ताप इ. लक्षणे असतील तर त्याला धीर देत दवाखान्यात पाठवणे अशा प्रकारे जनजागृती केली. तसेच कोरोनापासून घ्यायची दक्षता याबाबत मार्गदर्शन केले. कोरोनासंदर्भातील शासनाच्या नियमांचे पालन कसे करावे, या संदर्भात सूचनाही केल्या.

वेळीच उपचार होण्यास मदत

ग्रामीण भागातील लोक ताप, सर्दी असले तर दवाखान्यात जात नाहीत. त्यामुळे कोरोना संदर्भातील तपासण्या वेळेत होत नाहीत. परिणामी ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे पाहावयास मिळत आहे. पोलिसांच्या या उपक्रमामुळे गावातील लोकांच्या आरोग्या संदर्भातील माहिती शासनाला मिळणार असून वेळीच उपचार होण्यास मदत होणार आहे.

कोविड-19 बद्दल जागरूकता कशी येईल, असे उपक्रम राबवून कोरोना शृंखला तोडण्यासाठी पोलिस स्टेशन स्तरावर प्रयत्न होणे जरूरीचे होते. कारण मॅन टू मॅन संपर्क झाल्याशिवाय हे काम होणार नाही. म्हणून डॉ. गर्ग यांच्या आदेशानुसार वेळास गाव दत्तक घेऊन वेळास दांडा येथील 50 नागरिकांची तपासणी केली. त्यात 1 नागरिक यांची ऑक्‍सिजन लेव्हल 75 आणि टेम्परेचर 101 आढळले. म्हणून त्यांना देव्हारे आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करण्याच्या सूचना दिल्या असून तपासणी मोहीम सुरू आहे.

- उत्तम पीठे, पोलिस निरीक्षक

Edited By- Archana Banage

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com