esakal | Vidhan Sabha 2019 : पालीतील दोन मतदान केंद्रावर तांत्रिक बिघाड; मतदार गोंधळात
sakal

बोलून बातमी शोधा

Pali-Polling-Booths

पाली-सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी दोन्ही मतदान केंद्रांवर येऊन परिस्थिती योग्य प्रकारे हाताळली आणि तेथील प्रश्न मार्गी लावला.

Vidhan Sabha 2019 : पालीतील दोन मतदान केंद्रावर तांत्रिक बिघाड; मतदार गोंधळात

sakal_logo
By
अमित गवळे

पाली : विधानसभा निवडणूक 191 पेण-सुधागड-रोहा मतदारसंघात पालीतील दोन मतदार केंद्रांवर सोमवारी (ता. 21) तांत्रिक घोळ झाला. येथील ग. बा. वडेर हायस्कूल मतदान केंद्र क्रमांक 3 वरील ईव्हीएम मशीन तांत्रिक कारणांमुळे अचानक बंद पडली.

दुसरीकडे राजीप उर्दू शाळा मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅड मशीन देखील तांत्रिक कारणामुळे बंद पडले होते. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी अनुक्रमे अर्धा-पाऊण तास मतदान प्रक्रिया ठप्प होती. या परिस्थितीत मतदानासाठी आलेले मतदार काही काळ गोंधळून गेले होते.

- Vidhan Sabha 2019 : ठाण्यात EVM मशीनवर शाई फेक (Video) 

ग. बा. वडेर हायस्कूल मतदान केंद्र क्रमांक-3 वरील ईव्हीएम मशीन सकाळी अकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास तांत्रिक कारणांमुळे बंद पडले. ते कशामुळे बंद पडले ते कुणालाच कळले नाही. हा बिघाड शोधून नवीन ईव्हीएम मशीन लावेपर्यंत जवळपास पाऊण तास गेला. त्यानंतर जवळपास पाऊण तासांनी दुसरे ईव्हीएम मशीन जोडण्यात आले. ईव्हीएम मशीन बंद पडले, तेव्हा त्यात एकूण 125 मतदारांनी मतदान केले होते. त्यानंतर जोडण्यात आलेल्या मशीनमध्ये 125 पासून पुढे मतदान सुरू करण्यात आले.

राजीप उर्दू शाळा मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅड मशीन देखील काही तांत्रिक कारणांमुळे बंद पडली. व्हीव्हीपॅड मशीन बदलण्यात जवळपास अर्धातास गेला. पालीतील मतदान केंद्रावरील अशा तांत्रिक बिघाडामुळे मतदार गोंधळलेले दिसले. केवळ तांत्रिक बिघाडामुळे त्यांचा बहुमूल्य वेळ वाया गेला. यावेळी पाली-सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी दोन्ही मतदान केंद्रांवर येऊन परिस्थिती योग्य प्रकारे हाताळली आणि तेथील प्रश्न मार्गी लावला.

- Vidhan Sabha 2019 : पुण्यात मतदानाची टक्केवारी कमीच; पण कोथरुडमध्ये...

वोटर स्लिप नाही

पालीतील अनेक मतदारांना मतदानाच्या पावत्या (वोटर स्लिप) देखील पोहोचल्या नव्हत्या. त्यामुळे आपले नाव नक्की कोणत्या मतदान केंद्रावर आहे? हे शोधताना त्यांची खूप गैरसोय झाली. विविध ठिकाणच्या पोलिंग बुथवर त्यांना विनाकारण भटकावे लागले, असे येथील मतदार संजोग शेठ यांनी सांगितले. 

ईव्हीएम मशीन विरोधात आधीच देशभरात संतापाचे वातावरण आहे. आणि पालीत तर चक्क दोन मतदान केंद्रांवर मशीनमध्ये बिघाड झाला. परिणामी ईव्हीएम मशिनवरील संशय अधिक बळावतो आहे. याबाबत गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
- आरिफ मणियार, सामाजिक कार्यकर्ते, पाली

दोन्ही ठिकाणी तांत्रिक बिघाड होऊन ईव्हीएम व व्हीव्हीपॅड मशीन बंद पडल्या होत्या. मात्र याची ताबडतोब दखल घेऊन योग्य उपाययोजना करण्यात आली. यामध्ये काही वेळ गेला असला तरी या केंद्रावर आलेले कोणीही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही, याची आम्ही खबरदारी घेतली आहे. 
- दिलीप रायन्नावार, तहसीलदार, पाली-सुधागड

 - Vidhan Sabha 2019 : मतदानाच्या टक्केवारीत 'हा' जिल्हा आघाडीवर; महानगरांकडून निराशाच