अंत्ययात्रेचा प्रवास कंबरभर पाण्यातून

वरवेली तेलीवाडी, साकवाची अनेक वर्षांची मागणी दुर्लक्षित
Villages in Guhagar area exercise for  funeral in rainy season
Villages in Guhagar area exercise for funeral in rainy seasonSakal

गुहागर - पावसाळ्यात नदीनाले दुथडी भरून वाहू लागले की, वरवेली तेलीवाडीतील एखाद्याचा मृत्यू ही ग्रामस्थांसाठी डोकेदुखी ठरते. शासकीय स्मशानभूमीपर्यंतचा प्रवास नाल्यातून करावा लागतो. या नाल्यावर साकव बांधण्याची मागणी येथील ग्रामस्थ अनेक वर्ष करत आहेत; परंतु तांत्रिक कारणांमुळे प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.

वरवेली तेलीवाडीचे स्मशान एका नाल्याच्या पलिकडे आहे. शासनाने लोकांच्या सोयीकरिता या ठिकाणी चौथरा, पत्र्याची शेड असा खर्चही केला आहे. दरवर्षी पावसाळ्याचे चार महिने या स्मशानभूमीपर्यंत अंत्ययात्रा घेऊन जाण्यासाठी कसरत करावी लागते. नाल्याच्या वेगवान प्रवाहातून कंबरभर पाण्यातून पलीकडे जावे लागते. मुसळधार पाऊस असेल, नाल्याचा प्रवाह धोकादायक असेल तर काहीवेळा अंत्ययात्रेसाठी पाऊस कमी होण्याची आणि पाणी ओसरण्याची वाट पाहावी लागते. अशावेळी वाडीतील व्यवहार ठप्प होतात. मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थांचा खोळंबा होतो. त्यामुळे पावसाळ्यात मृत्यू नको रे बाबा, असे म्हणण्याची वेळ या ग्रामस्थांवर आली आहे.

पावसाळ्यात धोकादायक नाला पार करावा लागू नये तसेच पावसानंतरही नाल्यातील दगडधोंड्यातून जाण्याचा त्रास वाचावा म्हणून कायमस्वरूपी साकव, छोटा पूल बांधावा, अशी मागणी येथील ग्रामस्थ गेली अनेक वर्ष करत आहेत; मात्र स्मशानभूमीकडे जाणाऱ्या पायवाटेची नोंद ग्रामपंचायतीच्या दफ्तरात नाही. ही पायवाट खासगी जागेतून आहे तसेच हा नाला बारमाही वाहत नाही. जून, जुलैमधील पावसाचा भर ओसरला की नाला सहज पार करता येतो. त्यामुळे शासन अनेक वर्षांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आपण आलो तरी ग्रामीण भागातील जनतेला मूलभूत सोयीसुविधांकरिता झगडावे लागते. स्मशानभूमीच्या जागेवर शासनाचा अधिकार आहे. दुसऱ्या बाजूला साकव किंवा पुलावर चढण्यासाठी आवश्यक जागा देण्यास मालक तयार आहे. तरीही ही मागणी पूर्ण होत नाही, हे दुर्दैव आहे.

- गणेश किर्वे, माजी ग्रामपंचायत सदस्य, वरवेली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com