सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदी कुणाची वर्णी, बुधवारी फैसला

०

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी बुधवारी (ता. 24) होणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेने शह द्यायचा प्रयत्न केला असला तरी भारतीय जनता पक्षाने आपला एकतर्फी विजय निश्‍चित असल्याचे मंगळवारी स्पष्ट केले. त्याचवेळी शिवसेनेवर पैसे देऊन सदस्य फोडाफोडीचा आरोप केला. अध्यक्षपदासाठी भाजपमध्ये मनस्वी घारे व संजना सावंत यांच्यात चुरस असल्याचे समजते. अर्थात, नारायण राणे यांचे धक्कातंत्रच सत्ताधारी भाजपचा उमेदवार ठरवेल, हे निश्‍चित आहे. 

यांच्यात आहे अध्यक्षपदासाठी चूरस
जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी सत्ताधारी भाजपमध्ये यासाठी चढाओढ सुरू आहे. इतर मागास प्रवर्ग महिलेसाठी पद राखीव असून, किंजवडे मतदारसंघाच्या मनस्वी घारे, इन्सुलीच्या उन्नती धुरी यांच्यासह दीड वर्षापूर्वी अध्यक्ष पदावरून उतरलेल्या नाटळ मतदारसंघाच्या संजना सावंत यांच्यात जोरदार चुरस सुरू आहे. खासदार नारायण राणे यांनी धक्कातंत्राचा वापर करीत नेहमीच्या स्टाईलने निवड केल्यास माजी महिला व बालकल्याण सभापती माधुरी बांदेकर यांचीही वर्णी लागू शकते. मात्र, खरी चुरस मनस्वी घारे व संजना सावंत यांच्यात सुरू आहे. 

असे आहे बलाबल

जिल्हा परिषदेत भाजप 31, तर शिवसेना 19 असे पक्षीय बलाबल आहे. भाजपचे एकतर्फी वर्चस्व आहे. अध्यक्षा समीधा नाईक यांनी राजीनामा दिल्यावर अचानक शिवसेनेने सत्तेसाठी भाजपचे सदस्य फोडण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले. सेनेला सत्तात बसण्यासाठी अजून सात सदस्य आवश्‍यक आहेत. यासाठी शिवसेनेने फिल्डिंग लावली होती. 
शिवसेनेने सत्तांतरासाठी भाजपच्या तीन सदस्यांना पैसे देऊ केले होते. त्यातील मानसी जाधव यांनी शिवसेनेने दिलेले दोन लाख रुपये परत केल्याचा खळबळजनक आरोप आज भाजपतर्फे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केला. त्यामुळे शिवसेना पूर्ण तयारीत होती, हे निश्‍चित. मात्र, भाजपने सावध पवित्रा घेत आपल्या 31 सदस्यांची बैठक नेते खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत काल (ता. 22) सायंकाळी घेतली. बैठकीला 31 पैकी 29 सदस्य उपस्थित होते. 

यानंतर काही सदस्य भाजपने नजरकैदेत ठेवले असल्याची जोरदार चर्चा आहे; परंतु आज जिल्हाध्यक्ष तेली यांनी हा तर्क फेटाळून लावत सर्व भाजप सदस्य एकसंघ आहेत, त्यांचा नारायण राणे यांच्या नेतृत्वावर विश्‍वास आहे, असे स्पष्ट केले. 

शिवसेना भरणार अध्यक्षपदासाठी अर्ज 
अध्यक्षपदासाठी शिवसेनाही अर्ज भरणार आहे. कलमठ मतदारसंघाच्या सदस्या स्वरूपा विखाळे यांना शिवसेनेने उमेदवारी जाहीर केल्याचे समजते. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार नाही, हे निश्‍चित आहे. 

राणेंच्या बैठकीकडे चार सदस्यांची पाठ 
भाजप नेते नारायण राणे यांनी काल (ता. 22) सत्तारूढ सदस्यांची बैठक घेतली होती. या वेळी नुकत्याच पायउतार झालेल्या अध्यक्षा समीधा नाईक अनुपस्थित होत्या. धार्मिक कार्यक्रम असल्याने पल्लवी राऊळ, अपघात झाल्याने महेंद्र चव्हाण, उत्तम पांढरे उपस्थित नव्हते. यातील समीधा नाईक वगळता तिन्ही सदस्यांच्या अनुपस्थितीची कारणे राजन तेली यांनी दिली आहेत. 

संजना सावंत यांना पुन्हा संधी मिळणार का?
समीधा नाईक अध्यक्षपदी विराजमान होण्यापूर्वी अध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव होते. त्यामुळे सौ. नाईक यांच्या अगोदर सौ. संजना सावंत यांना श्री. राणे यांनी संधी दिली होती. आता अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव आहे; परंतु सौ. सावंत माहेरच्या ओबीसी असल्याने त्या स्पर्धेत आल्या आहेत. याच टर्ममध्ये सावंत यांना एकवेळ अध्यक्षपदी बसण्याची संधी मिळाली. त्यामुळे राणे पुन्हा सावंत यांना संधी देतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

आम्हाला कोणताही धोका नाही. आमचे सर्व सदस्य नारायण राणेंचे नेतृत्व मानणारे आहेत. त्यामुळे भाजपचेच अध्यक्ष होतील.
- रणजित देसाई, गटनेते, भाजप 

अशी होणार निवड प्रक्रिया 
दरम्यान, उद्या (ता. 24) भूसंपादन उपजिल्हाधिकारी वर्षा सिंघन यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्षपदाची निवड होत आहे. दुपारी एकपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत असून, तीनला विशेष सभा आहे. एकच अर्ज आल्यास बिनविरोध निवड जाहीर केली जाईल. जास्त अर्ज आल्यास मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यानंतर निकाल जाहीर केला जाईल. या वेळी अध्यक्ष कोण व कोणत्या पक्षाशी सत्ता, हे स्पष्ट होणार आहे. 

संपादन : विजय वेदपाठक


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com