

Asian Games Athletics
esakal
नागोया : आशियाई क्रीडा स्पर्धेत ॲथलेटिक्सच्या शर्यतींना आजपासून सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी भारताला एक रौप्य आणि एक ब्राँझपदक मिळाले. ४ बाय ४०० मीटर मिश्र रिलेत यंदाही भारताने रौप्यपदक मिळवले, तर सीमा कुमारीने १० हजार मीटर शर्यतीत देशासाठी ऐतिहासिक ब्राँझपदक जिंकले.
पूवाम्मा राजू, विशाल तेन्नारासू, विथ्या रामराज आणि मनू टी.एस. हे ४ बाय ४०० मीटर मिश्र रिलेतील रौप्यपदक विजेते धावपटू आहेत. त्यांनी ३ मिनिटे १४.४६ सेकंद अशी वेळ नोंदवली. २०२३ मध्ये हांगझोऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही त्यांनी रौप्यपदक मिळवले होते.
आज झालेल्या या शर्यतीच्या अंतिम टप्प्यात विथ्या रामराजने चांगला वेग दाखवला. त्यामुळे भारताला रौप्यपदक मिळवता आले. या शर्यतीत बहरीनच्या संघाने ३ मिनिटे १२.८७ सेकंद अशी वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले.
महिलांच्या १० हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत ब्राँझपदक मिळवताना सीमाने ३२ मिनिटे ५०.०५ सेकंद अशी वेळ नोंदवली. या शर्यतीत तब्बल १६ वर्षांनंतर भारताला पदक मिळाले आहे. बहरीनच्या विनफ्रेड यावीने ३२ मिनिटे ३९.१८ सेकंद अशी वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले, तर जपानच्या तानाका नाझोमीने ३२ मिनिटे ४१.५४ सेकंद अशी वेळ नोंदवत रौप्यपदक मिळवले.
प्रतिष्ठेच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताचे वेगवान धावपटू अनिमेश कुजुर आणि गुरिंदरवीर सिंग यांनी आपापल्या हिटमध्ये अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळवत उपांत्य फेरी गाठली. पहिल्या हिटमध्ये अनिमेशने दुसरा क्रमांक मिळवताना १०.३६ सेकंद अशी वेळ नोंदवली. ही हिट थायलंडच्या पुरिपॉल बोन्सनने ९.९५ सेकंद अशी वेळ नोंदवत जिंकली. चीनचा झेंग केली १०.२२ सेकंद अशी वेळ नोंदवत दुसरा आला. हीट सुरू झाल्यानंतर कुजुर पहिल्या ५० मीटरमध्ये चौथ्या क्रमांकावर होता; मात्र अंतिम क्षणी त्याने वेग वाढवला आणि दुसऱ्या स्थानापर्यंत मजल मारली.
चौथ्या हिटमध्ये धावताना गुरिंदरवीर सिंगने १०० मीटर अंतर पार करण्यासाठी १०.३८ सेकंद अशी वेळ नोंदवली. गुरिंदरवीर सिंग हा भारतातील सर्वांत वेगवान धावपटू आहे. गेल्या मे महिन्यात रांची येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्याने १०.०९ सेकंद अशी वेळ नोंदवत इतिहास घडवला होता. त्या तुलनेत आजची १०.३८ सेकंदांची वेळ अधिक आहे. या आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक मिळवायचे असेल, तर गुरिंदरवीर सिंगला आपल्या वेळेत मोठी सुधारणा करावी लागणार आहे.
आजच्या चौथ्या हिटमध्ये ओमानच्या मलहाम अल बालुशीने १०.२९ सेकंद अशी वेळ नोंदवत पहिला क्रमांक मिळवला. इराणचा हसन ताफ्टियन १०.४६ सेकंद अशी वेळ नोंदवत तिसरा आला आणि तोही उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.