
Australian Open: जोकोविच-त्सित्सिपास अंतिम लढत! महिलांमध्ये रायबाकिनाला सबलेन्काचे आव्हान
Australian Open 2023 : वर्षातील पहिल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेतील पुरुष एकेरीमधील आणि महिलांच्या एकेरीमधील अंतिम स्पर्धक ठरले आहेत. पुरुषांच्या विजेतेपदासाठी नोवाक जोकोविच आणि स्टेफानोस त्सित्सिपास यांच्यात सामना होणार आहे; तर महिलांच्या ऑस्ट्रेलियन ओपन एकेरीच्या विजेतेपदासाठी कझाकस्तानच्या २२ व्या मानांकित एलेना रायबाकिना आणि बेलारूसच्या पाचव्या मानांकित अरिना सबलेन्का यांच्यात लढत होणार आहे.
जोकोविचने काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अमेरिकेच्या टॉमी पॉलचा ७-५, ६-१ आणि ६-२ असा सरळ सेटमध्ये सहज पराभव केला आणि दहाव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. जोकोविचला ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळायला प्रचंड आवडते हे त्याचा आजचा खेळ बघून पुन्हा एकदा लक्षात आले. त्याने अमेरिकेच्या २५ वर्षीय पॉलला संपूर्ण सामन्यात दबावाखाली आणले होते.
आपल्या अनुभवाच्या जोरावर जोकोविचने या सामन्यात आक्रमक खेळ करत फक्त आठच गेम गमावले. पहिल्या सेटमध्ये जोकोविचने ३-० अशी आघाडी घेतली असताना देखील पॉलने पुनरागमन केले, मात्र शेवटी सर्बियाच्या खेळाडूने पहिला सेट ७-५ असा खिश्यात टाकला. पहिल्या सेटमध्ये केलेल्या प्रतिकाराची पुनरावृत्ती पॉलला दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये करता आली नाही. जोकोविचने आक्रमक फोरहँड मारत आणि नेट पॉईंट्स जिंकत पुढील दोन्ही सेट जिंकले.
पुरुषांच्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्याच ग्रीसच्या तिसऱ्या मानांकित स्टेफेनोस त्सित्सिपास याने रशियाच्या १८ व्या मानांकित कॅरेन खाचानोव्ह याचा चुरशीच्या सामन्यात ७-६ (२), ६-४, ६-७(८) आणि ६-३ असा पराभव केला. दोघांमधील सामन्याचा पहिलाच सेट टायब्रेकमध्ये गेल्याने लढत चुरशीची होईल, असे वाटत होते. मात्र पहिल्या सेटमध्ये बिघडलेली लय दुसऱ्या सेटमध्ये परत आणताना ६-४ अशी सहज बाजी मारली. तिसऱ्या सेटमध्ये खाचानोव्ह याने ताकदवान सर्व्हिस करत पुनरागमन केले. त्याने तिसरा सेट टायब्रेकमध्ये ८-६ असा जिंकला. चौथ्यासेटमध्ये मात्र त्सित्सिपासने आक्रमाक खेळ केला आणि सामना जिंकला.