
Bangladesh vs Sri Lanka : अँजेलो मॅथ्यूचंच नशीब इतकं खराब कसं?
Bangladesh vs Sri Lanka, 1st Test: बांगलादेशमध्ये श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात कसोटी मालिका सुरू झाली आहे. पहिल्या कसोटीत श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूजने (Angelo Mathews) दमदार फलंदाजी करत जवळपास द्विशतकी मजल मारली होती. मात्र त्याचे द्विशतक अवघ्या 1 धावेने हुकले. या खेळीत त्याने 19 चौकार आणि एक षटकार मारला. त्याच्या या खेळीच्या जोरावरच पहिल्या डावात श्रीलंकेने 397 धावांपर्यंत मजल मारली. मात्र इतकी दमदार खेळी करून देखील त्याच्या नावासमोर एक नकोसे रेकॉर्ड (Test Record) चिकटले. हे रेकॉर्ड करणारा अँजेलो मॅथ्यूज जगातील पहिला फलंदाज ठरला.
क्रिकेट इतिहासात कसोटीत 99 आणि 199 धावांवर बाद होणारा अँजेलो मॅथ्यूज हा पहिला फलंदाज ठरला. यापूर्वी कसोटीत 99 आणि 199 धावांवर कोणीही बाद झाले नव्हते. मॅथ्यूज 2009 मध्ये भारताविरूद्धच्या कसोटीत 99 धावांवर बाद झाला होता. त्यानंतर आता बांगलादेश विरूद्धच्या कसोटीत 199 धावांवर बाद झाला. तसं पाहिलं तर मॅथ्यूज कसोटीत 199 धावांवर बाद होणारा 12 वा खेळाडू आहे. तर तो 199 धावांवर बाद होणारा श्रीलंकेचा फक्त दुसरा फलंदाज ठरला. मॅथ्यूज बरोबरच मुदस्सर नजर, मोहम्मद अझहरूद्दीन, मॅथ्यू इलियट, सनथ जयसूर्या, स्टीव्ह वॉ, युनिस खान, इयान बेल, स्टीव्ह स्मिथ, केएल राहुल, डीन एल्गरी आणि फाफ ड्युप्लेसिस कसोटीत 199 धावांवर बाद झाले आहेत.
बांगलादेश विरूद्धच्या कसोटी मालिकेबाबत बोलायचे झाले तर मॅथ्यूज व्यतिरिक्त दिनेश चंदीमलने 66 धावांची खेळी केली होती. यातबरोबर कुसल मेंडसने देखील 54 धावांची खेळी केली. बांगलादेशकडून नईम हसनने 5 विकेट घेतल्या. कसोटीच्या दुसऱ्या दिवशी बांगलादेशने 58 धावा केल्या होत्या.