
INDW vs AUSW : गार्डनेरने भारताच्या तोंडचा घास पळवला; पहिल्या सामन्यात भारताचा पराभव
Birmingham Commonwealth Games 2022 : राष्ट्रकुल स्पर्धेतील पहिल्या महिला क्रिकेट टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा तीन विकेट्सनी पराभव केला. भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 155 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 7 फलंदाजांच्या मोबदल्यात 19 षटकात पार केले. ऑस्ट्रेलियाकडून अॅश्लेघ गार्डनेरने नाबाद 52 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. तिला 20 चेंडूत 37 धावा करून ग्रेस हॅरिसने चांगली साथ दिली. भारताकडून रेणुका सिंहने 4 तर दिप्ती शर्माने 2 विकेट घेत चांगली झुंज दिली.
भारताने ठेवलेल्या 155 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरूवात खराब झाली. भारताच्या रेणुका सिंहने भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाची टॉप ऑर्डर उडवली. तिने अॅलिसा हेले (0), मेघ लेनिंग(8), बेथ मूनी (10), ताहलिया मॅग्राथ(14) यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. दिप्ती शर्माने रिचेल हायनेसला 8 धावांवर बाद करत ऑस्ट्रेलियाचे अर्धशतक पूर्ण होण्यापूर्वीच पाचवा धक्का दिला.
ऑस्ट्रेलियाची अवस्था 5 बाद 49 धावा झाली असताना ग्रेस हॅरिसने अॅश्लेघ गार्डनेरच्या साथीने संघाला 12 षटकात 91 धावांपर्यंत मजल मारून दिली. मात्र मेघना सिंहने 20 चेंडूत 37 धावांची खेळी करणाऱ्या ग्रेस हॅरिसला बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर जेस जोनासेन देखील 3 धावांची भर घालून माघारी परतली.
हेही वाचा: CWG2022 INDW vs AUSW : पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव
दुसऱ्या बाजूने अॅश्लेघ गार्डनेरने आक्रमक फलंदाजी करत झपाट्याने धावा केल्या. तिला अॅना किंगने 16 चेंडूत 18 धावा करत चांगली साथ दिली. या दोघींनी आठव्या विकेटसाठी 47 धावांची नाबाद भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाला 19 व्या षटकात विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी, राष्ट्रकुल स्पर्धेतील पहिल्या टी 20 क्रिकेट स्पर्धेचा पहिला सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला संघात होत आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र स्मृती मानधना 24 धावा करून बाद झाली.
यानंतर शेफाली वर्माने आक्रमक फलंदाजी करत संघाला अर्धशतक पार करून दिले. मात्र यस्तिकाने 8 धावा करून तिची साथ सोडली. 33 चेंडूत 9 चौकारांसह 48 धावा करणाऱ्या शेफाली वर्माला जोनासेनने बाद केले. यामुळे भारताच्या धावगतीला ब्रेक लागला.
जोनासेनने भारताला पाठोपाठ धक्के देत भारताची अवस्था 5 बाद 115 धावा अशी केली. मात्र कर्णधार हरमनप्रीत कौरने दमदार अर्धशतकी खेळी करत भारताला 150 टप्पा पार करून दिला. कौरने 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. या जोरावर भारताने 20 षटकात 8 बाद 154 धावा करत ऑस्ट्रेलियासमोर 155 धावांचे आव्हान ठेवले.
Web Title: Birmingham Commonwealth Games 2022 Women Cricket Australia Defeat India In First Match
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..