
पुजाराच्या सिक्सवर चाहते फिदा; पाकिस्तानचा शाहीन पाहतच राहिला!
Cheteshwar Pujara: भारतीय कसोटी क्रिकेट संघातून वगळलेल्या चेतेश्वर पुजाराची बॅट कौंटी क्रिकेटमध्ये जोरदार बोलत आहे. या मोसमात ससेक्सकडून खेळणाऱ्या पुजाराने चौथ्या सामन्यात चौथे शतक झळकावले आहे. पुजाराचे या मोसमातील चौथे शतक मिडलसेक्सविरुद्ध आले असून त्याने या मोसमात ससेक्ससाठी यापूर्वीच दोन द्विशतके ठोकली आहेत. त्याच्या शतकादरम्यान पुजाराने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीच्या चेंडूवर अप्पर कट शॉटच्या मदतीने सिक्स मारला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रंचड व्हायरल होत आहे. (Cheteshwar Pujara Upper Cut Six Shaheen Afridi)
चेतेश्वर पुजाराने पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीच्या चेंडूवर षटकार मारून चाहत्यांची मने जिंकली आहे. चाहते या शॉटचे सोशल मीडियावर जोरदार कौतुक करत आहेत. शाहीनने पुजाराच्या हातून षटकार खाण्यापूर्वी एक विकेट घेतली होती. सोशल मीडियावर व्हिडिओ पाहिल्यानंतर 'दिल जीत लिया पुजी पाजी..' असे एका यूजरने लिहिले आहे.
पुजाराला पहिल्या डावात विशेष काही करता आले नाही. त्याने केवळ 16 धावा करून बाद झाला. दुसऱ्या डावात मात्र शानदार शतक झळकावून संघाला मजबूत स्थितीत आणले आहे. त्याच्याआधी टॉम अल्सोपने ११३ धावांची शतकी खेळी केली होती. खेळ संपला तेव्हा पुजारा 125 धावांवर नाबाद होता. कौंटी क्रिकेटमध्ये पुजारा ज्या शैलीत फलंदाजी करत आहे, त्यानुसार त्याचे टीम इंडियात पुनरागमन निश्चित मानले जात आहे. भारताला जुलैमध्ये इंग्लंडविरुद्ध त्याच्या घरी कसोटी सामना खेळायचा आहे. त्या कसोटीत पुजारा भारताकडून खेळताना दिसेल अशी अपेक्षा आहे.