Rohit Sharma - Rishabh Pant |  India vs Ireland | T20 World Cup
Rohit Sharma - Rishabh Pant | India vs Ireland | T20 World CupX/BCCI

T20 WC, India vs Ireland: टीम इंडियाची विजयी सलामी, आयर्लंडला केलं चारीमुंड्या चीत; कर्णधार रोहितचे शानदार अर्धशतक

IND vs IRE T20 World cup 2024 LIVE score updates: टी20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने आयर्लंडविरुद्ध दणदणीत विजय मिळवत आपल्या मोहिमेला सुरूवात केली आहे.

T20 World Cup, India vs Ireland:

टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत भारत आणि आयर्लंड संघात बुधवारी सामना झाला. न्युयॉर्कला झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने 8 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारताने या स्पर्धेतील आपल्या मोहिमेची सुरुवात केली.

हा रोहित शर्माचा कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील 43 वा विजय ठरला. त्यामुळे त्याने भारताचा कर्णधार म्हणून सर्वाधिक टी20 विजय मिळवण्याच्या यादीत 42 विजय मिळवणाऱ्या एमएस धोनीला मागे टाकले आहे.

या सामन्यात आयर्लंडने भारतासमोर 97 धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य भारताने 12.2 षटकात 2 बाद 97 धावा करत पूर्ण केले.

भारताकडून रोहित शर्माने 52 धावांची शानदार खेळी केली. आयर्लंडकडून मार्क एडेअर आणि बेंजामिन व्हाईट या दोघांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

तत्पुर्वी आयर्लंडच्या संघाला प्रथम फलंदाजी करताना 16 षटकात सर्वबाद 96 धावा करता आल्या होत्या.

या सामन्यात भारताच्या वेगवान गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. त्यांनी सुरुवातीलाच दिलेल्या धक्क्यांनंतर आयर्लंडला सावरता आले नाही. आयर्लंडकडून सर्वाधिक 26 धावा गॅरेथ डेलेनीने केल्या.

भारताकडून गोलंदाजीत हार्दिक पांड्याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, तसेच अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

India vs Ireland Live Score: टीम इंडियाची विजयी सलामी, आयर्लंडला केलं चारीमुंड्या चीत

सूर्यकुमार बाद झाल्यानंतर 13 व्या षटकात दुसऱ्याच चेंडूवर ऋषभ पंतने शानदार षटकार ठोकला आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताने 12.2 षटकात 2 विकेट्स गमावत 97 धावांचे लक्ष्य पूर्ण केले. ऋषभ पंत 26 चेंडूत 36 धावांवर नाबाद राहिला.

India vs Ireland Live Score: सूर्यकुमार यादव स्वस्तात बाद

या सामन्यात सूर्यकुमार यादव फार काही खास करू शकला नाही. त्याला 2 धावांवर 12 व्या षटकात बेंजामिन व्हाईटने बाद केले. त्याचा झेल जॉर्ज डॉकरेलने घेतला.

India vs Ireland Live Score: अर्धशतकानंतर रोहित शर्मा रिटायर्ड हर्ट

अर्धशतक केल्यानंतर रोहित शर्मा मैदानातून बाहेर गेला. यावेळी फिजिओ देखील मैदानात होते. त्यामुळे नक्की रोहितला काय झाले, याबाबत चर्चा सुरू असून अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.

तो रिटायर्ड हर्ट झाल्याने ऋषभ पंतला साथ देण्यासाठी सूर्यकुमार यादव मैदानात आला आहे. रोहितने 37 चेंडूत 52 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने 4 चौकार आणि 3 षटकार मारले.

India vs Ireland Live Score: कर्णधार रोहित शर्माचे शानदार अर्धशतक, भारताची विजयाच्या दिशेने वाटचाल

रोहित शर्माने या सामन्यात शानदार फलंदाजी करताना 36 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्यामुळे या टी20 वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी पहिले अर्धशतक करण्याचा विक्रम रोहितच्या नावावर झाला. यासह भारताने 10 षटकातच 70 धावांचा टप्पा पार केला आहे.

India vs Ireland Live Score: रोहितचा टी20 क्रिकेटमध्ये मोठा विक्रम

या सामन्यात रोहित शर्माने 26 वी धाव काढताच मोठा विक्रम केला. त्याने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 4000 धावा पूर्ण केल्या आहेत. तो आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये 4000 धावा पूर्ण करणारा विराट कोहली आणि बाबर आझम यांच्यानंतरचा तिसराच फलंदाज ठरला आहे.

India vs Ireland Live Score: भारताला मोठा धक्का! विराट कोहली तिसऱ्याच ओव्हरमध्ये झाला आऊट

भारताकडून 97 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीला रोहित शर्मा आणि विराट कोहली उतरले. मात्र तिसऱ्या षटकात विराट कोहलीला मार्क एडेअरने बाद केले. विराटचा झेल शॉर्ट मॅन क्षेत्रात बेंजामिन व्हाईटने घेतला. विराटने 1 धाव केली.

India vs Ireland Live Score: टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांपुढे आयर्लंडची उडाली भंबेरी, अवघ्या 96 धावांत ऑलआऊट

आयर्लंडचा संघ सुरुवातीपासूनच संघर्ष करताना दिसला. वरच्या आणि मधल्या फळीला भारताच्या वेगवान गोलंदाजांनी माघारी धाडल्यानंतर अक्षर पटेलने 12 व्या षटकात बॅरी मॅककार्थीला आपल्याच गोलंदाजीवर झेल घेत बाद केले. मॅककार्थीला भोपळाही फोडता आला नाही.

त्यानंतर 15 व्या षटकात जोशुओ लिटीलला जसप्रीत बुमराहने त्रिफळाचीत केले. लिटीलने 14 धावा केले.

अखेरीस गॅरेथ डेलेनीने झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र 16 व्या षटकाच्या शेवटचा चेंडू अर्शदीपने नोबॉल टाकल्याने आयर्लंडला फ्री हिट मिळाली होती. मात्र, फ्री हिटवर डेलेनी 26 धावांवर धावबाद झाला. त्यामुळे आयर्लंडचा डाव 16 षटकात 96 धावांवर संपुष्टात आला.

India vs Ireland Live Score: मार्क एडेअरही स्वस्तात बाद

आयर्लंडने सातवी विकेटही स्वस्तात गमावली. भारताचा उपकर्णधार हार्दिक पांड्याने 11 व्या षटकात मार्क एडेअरला 3 धावांवरच बाद केले. त्याचा झेल शिवम दुबेने घेतला.

India vs Ireland Live Score: 10 ओव्हरच्या आतच आयर्लंडचा अर्धा संघ गारद

भारताने सुरुवातीला दिलेल्या मोठ्या धक्क्यातून आयर्लंडचा संघ सावरला नाही. त्यांनी पाचवी विकेटही 9 व्या षटकात गमावली. हार्दिकने कर्टिस कँम्फरला 12 धावांवर ऋषभ पंतच्या हातून झेलबाद केले.

त्यानंतर 10 व्या षटकात जॉर्ज डॉकरेललाही मोहम्मद सिराजने माघारी धाडले. डॉकरेलचा जसप्रीत बुमराहने 3 धावांवर झेल घेतला.

India vs Ireland Live Score: बुमराहचा आयर्लंडला चौथा धक्का

आयर्लंडचा चौथा धक्का जसप्रीत बुमराहने दिला. त्याने आठव्या षटकात हॅरी टेक्टरला अवघ्या 4 धावांवरच बाद केले. त्याचा झेल विराट कोहलीने पकडला. त्यामुळे आयर्लंडची अवस्था 8 षटकात 4 बाद 36 धावा अशी झाली.

India vs Ireland Live Score: भारताची शानदार सुरुवात; अर्शदीप-हार्दिकने आयर्लंडला दिले मोठे धक्के

अर्शदीपने एकाच षटकात आयर्लंडच्या सलामीवीरांना मागे धाडल्यानंतर हार्दिक पांड्याने यष्टीरक्षक फलंदाज लोर्कन टकरला 7 व्या षटकात त्रिफळाचीत केले. टकरने 10 धावा केल्या.

India vs Ireland Live Score: दुसऱ्याच षटकात अर्शदीपने आयर्लंडला दिले दोन धक्के; दोन्ही सलामीवीर परतले माघारी

प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या आयर्लंड संघाकडून अँड्र्यु बलबर्नी आणि पॉल स्टर्लिंग सलामीला फलंदाजीला उतरले होते. मात्र दुसऱ्याच षटकात भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने कर्णधार स्टर्लिंगला पहिल्या चेंडूवर बाद केले. स्टर्लिंगचा झेल यष्टीरक्षक ऋषभ पंतने घेतला.

त्यानंतर याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर उपकर्णधार बलबर्नीला अर्शदीपने बाद केले. अर्शदीपने बलबर्नीला 5 धावांवर त्रिफळाचीत केले.

India vs Ireland Live Score: रोहित शर्माने जिंकला टॉस; भारत-आयर्लंड प्लेइंग-11 जाणून घ्या

टी20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत भारत आणि आयर्लंड संघात बुधवारी सामना होत आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्लेइंग इलेव्हन -

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज

आयर्लंड: पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्र्यू बलबर्नी, लॉर्कन टकर (यष्टीरक्षक), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलेनी, मार्क एडेअर, बॅरी मॅककार्थी, जोशुआ लिटल, बेंजामिन व्हाइट

India vs Ireland Live Score: भारत विरुद्ध आयर्लंड हेड टू हेड रेकॉर्ड

भारत आणि आयर्लंड हे दोन्ही संघ या सामन्यातून टी20 वर्ल्ड कपमधील आपली मोहिम सुरू करतील.

भारत आणि आयर्लंड या दोन संघात आत्तापर्यंत 7 टी20 सामने झाले आहेत, या सर्व सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला आहे.

T20 World cup 2024, IND vs IRE Live Score update: टी20 वर्ल्ड कपचे नववे पर्व वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे खेळवले जात असून भारतीय संघाचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध बुधवारी (5 जून) हा सामना होणार आहे. हा सामना स्थानिक वेळेनुसार सकाळी 10.30 वाजता, भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होईल.

हा सामना न्यूयॉर्कमधील नव्याने बांधण्यात आलेल्या नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.

दरम्यान, बुधवारी न्युयॉर्कमधील हवामान सकाळी ढगाळ असण्याची शक्यता आहे. तसेच पावसाची शक्यताही अत्यंत कमी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com